शेतीमध्ये तण नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचे तसेच खर्चिक व कष्टाचे काम आहे. तणे पिकांसोबत अन्नद्रव्ये, पाणी, प्रकाश व जागेसाठी स्पर्धा करतात, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. पारंपरिक हाताने कोळपणी किंवा निंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासते. या पार्श्वभूमीवर पॉवर वीडर हे यंत्र आधुनिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पॉवर वीडर हे पेट्रोल, डिझेल किंवा बॅटरीवर चालणारे, ओळीतील पिकांमध्ये (Inter-row) तण काढण्यासाठी वापरले जाणारे यांत्रिक साधन आहे. हे यंत्र तण उपटण्याबरोबरच माती सैल करणे, हवा खेळती ठेवणे व ओलावा टिकवणे ही कामे एकाच वेळी करते.
पॉवर वीडरचे मुख्य भाग
• इंजिन / मोटार
• ट्रान्समिशन प्रणाली (गिअर / बेल्ट ड्राइव्ह)
• फिरती पाती (ब्लेड / टाईन्स)
• मुख्य चौकट (फ्रेम)
• हाताळणी दांडा व नियंत्रण यंत्रणा
• चाके (रबर / केज / लोखंडी)
• खोली नियंत्रक यंत्रणा
पॉवर वीडरचे प्रकार
शक्तीनुसार
• पेट्रोल चालित पॉवर वीडर
• डिझेल चालित पॉवर वीडर
• बॅटरी / विद्युत चालित पॉवर वीडर
रचनेनुसार
• ढकलण्याचा प्रकार (Push Type)
• स्वयं चालित (Self-Propelled)
• हलका / मिनी पॉवर वीडर
• भातशेतीसाठी ओलसर जमिनीतील पॉवर वीडर
कार्यपद्धती
इंजिनमधील शक्ती गिअर किंवा बेल्टद्वारे फिरत्या पात्यांपर्यंत पोहोचवली जाते. यंत्र पुढे सरकत असताना:
पाती फिरून तणे उपटली जातात, माती भुसभुशीत होते, तणे मातीखाली गाडली जातात किंवा बाजूला फेकली जातात, कामाची खोली पिकाच्या ओळीतील अंतरानुसार समायोजित करता येते.

पॉवर वीडरसाठी योग्य पिके
पॉवर वीडर खालील पिकांमध्ये उपयुक्त आहे:
• धान्य पिके: मका, ज्वारी, बाजरी
• कडधान्ये: तूर, हरभरा, मूग, उडीद
• तेलबिया: सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल
• भाजीपाला: कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी
• रोख पिके: ऊस, केळी (ओळीतील मशागत)
• भात: ओलसर जमिनीतील विशेष पॉवर वीडर
तांत्रिक वैशिष्ट्ये
घटक तपशील
इंजिन शक्ती – ३ – ७ अश्वशक्ती
इंधन – पेट्रोल / डिझेल / बॅटरी
कार्य रुंदी – ३०० – ९०० मिमी
कार्य खोली – ५० – १५० मिमी
वजन – ४० – १२० कि.ग्रॅ.
क्षेत्र क्षमता – ०.२ – ०.५ हेक्टर/दिवस
पॉवर वीडरचे फायदे
मजुरी खर्चात ६०–८०% बचत
कमी वेळेत जास्त क्षेत्रावर काम
मुळांच्या वाढीस अनुकूल माती
वेळेवर तण नियंत्रण
रसायनिक तणनाशकांचा कमी वापर
लघु व मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
मर्यादा
फारच कमी ओळीतील अंतर असलेल्या पिकांसाठी अयोग्य
योग्य प्रशिक्षण आवश्यक
सुरुवातीचा खर्च जास्त
दगडाळ जमिनीत अडचणी
सुरक्षितता सूचना
संरक्षणात्मक बूट व हातमोजे वापरावेत
यंत्र चालू असताना जवळ व्यक्ती नसाव्यात
पाती सैल आहेत का याची खात्री करावी
स्वच्छतेसाठी इंजिन बंद करावे
अतिओलसर किंवा अतिशय कोरड्या जमिनीत वापर टाळावा

देखभाल व निगा
वापरानंतर पाती स्वच्छ कराव्यात
वेळेवर इंजिन ऑईल बदलावे
एअर फिल्टर स्वच्छ ठेवावा
हालचाल भागांना ग्रीस लावावे
कोरड्या व सावलीच्या ठिकाणी साठवण करावी
शाश्वत शेतीतील महत्त्व
पॉवर वीडरमुळे रासायनिक तणनाशकांचा वापर कमी होतो
मातीचे आरोग्य सुधारते
इंधन व ऊर्जा कार्यक्षम वापर होतो
म्हणूनच पॉवर वीडर शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीसाठी महत्त्वाचे यंत्र आहे.
पॉवर वीडर हे आधुनिक कृषी यांत्रिकीकरणातील अत्यंत उपयुक्त यंत्र आहे. मजुरांची कमतरता, खर्चवाढ व वेळेचे बंधन लक्षात घेता पॉवर वीडरचा वापर केल्यास शेती अधिक फायदेशीर व शाश्वत ठरते.
इंजि. वैभव सूर्यवंशी
विषय विशेषतज्ञ : कृषी अभियांत्रिकी,
कृषी विज्ञान केंद्र, जळगाव.













