नारळ शेती व्यवसायातून मिळणारी भुकटी (नारळ पावडर) ही मिठाई, बिस्किटे, टॉफी इत्यादी बनवण्यासाठी वापरली जाते. याच शेती व्यवसायातून दुर्गम अंदमान-निकोबारमधील 36 वर्षीय गृहिणी सुनैना सोनी यांनी अनोखी यशोगाथा लिहिली आहे.
पोर्ट ब्लेअरमधील डॉली गोंग भागातील रहिवासी असलेल्या सोनी यांनी नारळ पावडरची संभाव्य वाढणारी बाजारपेठ ओळखून तो व्यवसाय म्हणून निवडला. त्यांनी पतीसोबत नारळ पावडर बनवण्यासाठी अनेक चाचण्या सुरू केल्या. त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले आणि आता त्या परिसरातीलच नव्हे तर प्रांतातील एक यशस्वी महिला कृषी उद्योजिका बनल्या आहेत.
अलीकडे नारळ पावडर जवळजवळ प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पदार्थ किंवा मिष्टान्न बनवण्यासाठी वापरली जाते. देशाच्या दक्षिणेकडील प्रांतात तर अगदी हमखास. त्याची बाजारपेठ वाढतच आहे, ज्यामुळे नफ्याची क्षमता देखील वाढत आहे. अंदमान आणि निकोबारच्या महिला उद्योजिका सुनैना आणि त्यांचे पती विमल कुमार यांनी नारळाची भुकटी बनवण्यासाठी मशीन डिझाइन करण्याचे काम केले. त्यांची चाचणी यशस्वी झाली आणि आता त्यांनी मोठ्या प्रमाणात नारळ पावडरचे उत्पादन सुरू केले आहे. यानंतर त्यांनी कारखाना बांधला. त्याचे व्यावसायिक कामकाज सुरू होण्यास आणखी दोन वर्षे लागली, त्यानंतर नारळ पावडरचे उत्पादन पूर्णपणे सुरू झाले आहे.
दररोज 5 हजार किलो नारळ पावडरचे उत्पादन
सुनैना सोनी यांनी वर्तमानपत्रात पाहिले होते की, सरकार चांगल्या उद्योजकांना जमीन देत आहे. त्यांनीही त्यासाठी अर्ज केला होता, परंतु दोनदा त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटांच्या उद्योग संचालकांच्या मदतीने त्यांना 16 लाखांचे कर्ज मिळाले. त्यांनी प्रथम 400 चौरस मीटरच जमीन घेण्याचा विचार केला होता, परंतु उद्योग विभागाच्या मदतीने त्यांना प्रकल्पासाठी 800 चौरस मीटर जमीन मिळविण्यात यश आले. त्यांच्या प्लांटमध्ये आता दररोज 5,000 किलो नारळ पावडर तयार होत आहे. ही नारळ पावडर आकर्षक पिशव्यांमध्ये पॅक केली जाते आणि मार्केटिंगसाठी पाठवली जाते. त्यांची उत्पादने कोलकाता, तामिळनाडू आणि देशाच्या इतर काही राज्यातली बेकरींमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत.

गृहिणी म्हणून हिंमतीने मिळवलेल्या यशाचे समाधान
सुनैना सोनी यांना दोन मुली आहेत, ज्या पोर्ट ब्लेअरमध्ये शिक्षण घेतात. नारळ पावडर बनवण्याच्या क्षेत्रात सोनी आज सर्वात यशस्वी उद्योजिका आहेत. या यशामुळे त्यांना समाधानाची भावना मिळते. ते त्यांच्या कारखान्यातील उत्पादनाच्या गुणवत्तेची पूर्ण काळजी घेतात, जेणेकरून बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उत्पादनांशी आणि इतर देशांमध्ये बनवलेल्या उत्पादनांशी स्पर्धा करता येऊ शकेल.
भविष्यातील योजना
नारळाच्या उत्पादनांसाठी बाजारपेठेत प्रचंड क्षमता आहे, हे लक्षात घेऊन, सोनी फॅमिली उद्योगाचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. नारळाच्या पावडरनंतर, आता व्हर्जिन नारळ तेलाचे उत्पादन करण्याची योजना ते आखत आहे, ज्यासाठी दोन मशीन देखील बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय, नारळपाण्याची मागणीही आजकाल खूप वाढली असल्याने त्याचे पॅकेजिंग आणि मानकीकरण करण्याची योजना देखील आखत आहे. देशभरातील आरोग्याबाबत जागरूक लोक दररोज नारळपाणी वापरतात. त्याच वेळी, परिसरातील इतर नारळ उत्पादकांना रोजगार आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना घरी चालवता येणारी छोटी मशीन दिली जात आहेत. त्यानंतर सोनी उद्योगसमूह त्याद्वारे तयार केलेली नारळाची पावडर स्वतः खरेदी करते. अशा प्रकारे देशाच्या अति दुर्गम भागात कुटीर उद्योग विकसित होण्यास मदत होत आहे.














