हॅपनिंग

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

नवी दिल्ली (प्रतिनिधी) जैविक शेती निविष्ठा उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘कॅन बायोसिस’ या बहुराष्ट्रीय कंपनीला इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (IFCCI) तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये “ज्युरी स्पेशल अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील फ्रेंच दूतावासात नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात, कंपनीच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी हा पुरस्कार फ्रान्सचे भारतातील राजदूत थियरी मॅथ्यू यांच्या हस्ते स्वीकारला.

हा पुरस्कार मिळविणाऱ्या ‘कॅन बायोसिस’ची निवड विषमुक्त शेतीमाल निर्मिती, शाश्वत शेती व जैविक कृषी निविष्ठा संशोधनासाठी करण्यात आली. या सोहळ्याला इंडो फ्रेंच चेंबरचे अध्यक्ष जीन तो बॉल, पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालिका श्वेता पाहूजा, तसेच आयटी, सौर ऊर्जा, संरक्षण, बँकिंग आणि उत्पादन क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Planto Krushitantra

संदीपा कानिटकर यांनी पुरस्कार स्वीकृत करताना सांगितले की, “भारतीय शेतकऱ्यांसाठी गुणवत्ता, शाश्वतता आणि जैविक उत्पादनाची दिशा स्पष्ट करण्याचे काम कॅन बायोसिस करत आहे. हवामान बदलाच्या संकटात आणि रासायनिक खतांच्या अतीव वापरामुळे जमिनीची गुणवत्ता खालावत असताना, जैविक उत्पादने ही शाश्वत शेतीसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत.”

28 देशांमध्ये कार्यरत असलेल्या डिसॅगोस या फ्रेंच कंपनीसोबत कॅन बायोसिसने धोरणात्मक भागीदारी केली असून, शेती आधारित स्टार्टअप, अन्नसुरक्षा, अवकाश संशोधन अशा क्षेत्रातही कंपनीची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. ही पुरस्कार सोहळ्याची सातवी आवृत्ती होती. यंदाच्या कार्यक्रमात भारत-फ्रान्स संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला असून, 2025 हे वर्ष “इन्व्होव्हेशन इयर” म्हणून साजरे केले जाणार आहे. याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या संयुक्त पुढाकाराने झाली आहे. कॅन बायोसिसच्या या जागतिक सन्मानामुळे भारतीय जैविक कृषी उत्पादन क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे, जो शेतकऱ्यांना टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि नफ्यातील शेतीकडे घेऊन जाणारा ठरतो.

Jain Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

Related Articles

Back to top button