दिलीप वैद्य, रावेर.
झाडावर लगडलेली हिरवी, लाल आणि केशरी सफरचंदं म्हटली की आपल्याला काश्मीर, हिमाचल प्रदेश आठवतो. परंतु, जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यात ४३ ते ४५ डिग्री तापमानात सफरचंदाची बाग फुलवलीय असे कोणी सांगितले तरी विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. रावेर तालुक्यातील कोचूर येथील जगन्नाथ पाटील यांच्या शेतकरी कुटुंबाने जिद्दीने आपल्या शेतात पाऊण एकरावर सफरचंदाची बाग फुलवली आहे. अक्षय तृतीयेला सफरचंदाच्या या पहिल्या बहाराचा नैवेद्य देवाला दाखवून त्यांनी फळ छाटणीचा निर्णय घेतला; पण आगामी वर्षी येथून अतिशय दर्जेदार, गोड चवीची सफरचंदं बाजारपेठेत पाठवता येऊ शकतील असा विश्वास या शेतकरी कुटुंबाला आहे.
तालुक्यातील कोचूर येथे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी केळीच्या उत्पादनाची प्रथम सुरुवात झाली असे सांगितले जाते. याच कोचूर गावात जगन्नाथ खंडू पाटील यांनी त्यांच्या मुलांसह आणि नातवांसह शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले. केळी सोबतच टरबूज, पांढरा कांदा, पेरू आणि मागील वर्षी सफरचंदाचीही लागवड त्यांनी केली आहे. कोरोना काळात केळीचे भाव अचानक कोसळले आणि पाटील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर केळीवर आलेल्या सीएमव्ही रोगाने आर्थिक कंबरडेच मोडले. यावर उपाय म्हणून काय करता येईल याचा विचार त्यांची शेतकरी मुले उज्ज्वल पाटील, संदीप पाटील, किरण पाटील आणि विशाल पाटील यांनी केला. त्यांचे दोन नातू पीयूष पाटील आणि प्रमोद पाटील हे बीएससी ॲग्री करत असल्याने त्यांनाही चर्चेत सामावून घेण्यात आले. नेहमीच नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या या युवा पिढीने सफरचंद लागवडीची कल्पना मांडली. त्यांनी युट्युबवर सफरचंद उत्पादनाची माहिती घ्यायला सुरुवात केली.
युट्युबवर त्यांना हिमाचल प्रदेशातील हरीमन शर्मा या सफरचंद उत्पादकाची माहिती मिळाली. त्यांनी श्री शर्मा यांच्याशी संपर्क साधला. नंतर स्वतः हिमाचल प्रदेशात जात त्यांच्या नर्सरीला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्याकडून सफरचंदाची एच आर – ९९ या जातीची ३६५ रोपे त्यांनी आणली आणि आपल्या घरामागील शेतातच ३२ गुंठ्यात म्हणजे सुमारे पाऊण एकर क्षेत्रात सफरचंदाची लागवड केली. सुरुवातीला त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाकडे पाहून काही जण हसत. डिसेंबर २०२२ मध्ये लागवड केलेल्या या सफरचंदाच्या झाडांचे वय सध्या १६-१७ महिने इतके आहे. मात्र, पहिल्या वर्षीच या झाडांना मोठ्या प्रमाणात फुलंही आली असून झाडे सात ते आठ फुटांपर्यंत वाढली आहेत. काही काही झाडांना अतिशय छान लाल चुटक, हिरवी, केशरी दिसणारी सफरचंदही आली आहेत.
पहिली काढणी
अक्षय तृतीयेच्या दिवशी पाटील कुटुंबाने या झाडांच्या सफरचंदांची काढणी केली. देवाला नैवेद्य दाखवून संयुक्त कुटुंबानेच ती वाटून खाल्ली आणि उर्वरित झाडांची फळ छाटणी करून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हिमाचल प्रदेशातील सफरचंद तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या बागेतील सफरचंदाची चवही अगदी हिमाचल प्रदेशमधील सफरचंदांसारखी चांगली, गोड आणि अवीट अशी आहेत. या सर्वच सफरचंदाच्या झाडांना कुठलेही रासायनिक खत न देता ते जीवामृत आणि सेंद्रिय खतेच देत आहेत.
४५ डिग्री तापमानातही उत्पादन
हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात सफरचंदाचे उत्पादन होते. तेथील तापमान हे २५-३० डिग्री सेल्सिअसच्यावर जात नाही. मात्र जिल्ह्यातील तापमान तर ४५ डिग्री सेल्सिअस पर्यंत सहज जाते. या तापमानात टिकाव धरण्यासाठी विशेष प्रकारची जात हरिमन शर्मा यांनी विकसित करून दिल्याची माहिती पाटील कुटुंबीयांनी दिली.
संपर्क :-
उज्ज्वल पाटील
कोचूर, ता. रावेर
मो. नं. :-9420390291