रुपेश पाटील, जामनेर
अनेकजण चांगले शिक्षण करून नोकरी करतात. पण, काहीजण असे असतात की त्यांना लहानपणापासून शेतीची आवड असते. असेच तीन बंधू आहेत ज्यांनी लहानपणापासून नोकरीची इच्छा न बाळगता शेती व्यवसायात रुची दाखविली. एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते शेतीतून वर्षाला 65 ते 70 लाख रुपये उत्पादन घेऊन 40 ते 45 लाख रुपये नफा ते आज कमवत आहेत. हे शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातील खेडी या गावाचे.
आजकाल आपल्याला एकत्रित कुटुंब खूप क्वचितच बघायला मिळते. पण, जळगाव जिल्ह्यातील खेडी या गावातील तीन बंधू यांचे एकत्रित कुटुंब असून शेतीतून ते आर्थिक प्रगती साधत आहे. या बंधूंचे नाव महेश चौधरी, गजानन चौधरी आणि सदानंद चौधरी असे आहे. तिघे बंधू मिळून आज 48 एकर घरची आणि 50 एकर शेती ही भाडेतत्वावर करत आहेत. यातील द्वितीय बंधू गजानन चौधरी यांनी सांगितले की, एकंदरित 98 ते 100 एकर शेती करत असून आम्ही तिघे भाऊ रोज रात्री सोबत बसून शेतीचे नियोजन करतो.
गजानन चौधरी यांचे लहानपण हे दसनूर येथे त्यांच्या मामाच्या गावी गेले. त्यानंतर ते त्यांच्या खेडी या गावी परतले आणि 10 वी पर्यंतचे शिक्षण कानळदा येथे पूर्ण केले. अनेकजण 10 वीचे शिक्षण घेऊन पुढील उच्च शिक्षणाची तयारी करतात आणि चांगल्या नोकरीची अपेक्षा करतात. मात्र, गजानन चौधरी यांनी 10 वी नंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच गजानन चौधरी यांना शेतीची आवड होती. आज ते त्यांच्या भावांच्या मदतीने आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत.
पाणी उपलब्धता
गजानन चौधरी यांच्या वडिलांकडे 20 एकर शेती होती आज तिघे भावांनी मिळून ही शेती 48 एकर पर्यंत नेली आहे. पूर्वी त्यांच्या वडिलांकडे विहीर होती आणि त्यावेळेस मोटर चालू करण्यास अडचण यायच्या. अशावेळी त्यांच्या वडिलांना रात्री बे रात्री शेतात जाऊन उतरावे लागत होते. त्यानंतर आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून शेतात ट्युबेल करून घेतली आहे. गजानन चौधरी यांना गावात मजूर मिळत नव्हते. अशावेळी त्यांना बाहेरून मजूर बोलवावे लागायचे. यावर देखील त्यांनी मात केली आहे.
असे केले केळी लागवड व्यवस्थापन
केळी लागवड करण्यापूर्वी ते त्यांच्या शेतात बेड तयार करून शेणखत आणि फर्टिलायझरचा वापर करतात. एका एकरमध्ये 1100 खोडांची लागवड केली जाते तसेच त्यांनी टिश्युकल्चर केळी रोपांची ही लागवड केली आहे. केळीला वेळेवर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी शेतात जैन इरिगेशनचे ठिबक लावले आहे. तसेच त्यांनी सेंद्रिय खताचा अवलंब केला असून रासायनिक खताचा वापर कमी करण्यावर भर देत आहेत. केळीचे उत्पादन चांगले येण्यासाठी ते एनपीके, जिवाणू खतांसह फर्टीलायझरचाही वापर करतात. गजानन चौधरी केळीची तीन टप्प्यात लागवड करतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात केळीचे उत्पादन निघते आणि टप्प्याटप्प्याने ते याची विक्री करतात. त्यामुळे चांगला रेट मिळून त्यांना याचा फायदा होतो.
सोयाबीन लागवड व्यवस्थापन
जून महिन्यात पाऊस सुरु झाला की गजानन चौधरी आणि त्यांचे बंधू शेतात सोयाबीनची लागवड करतात. सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक असते. तसेच 20 – 30 दिवसांनी एक कोळपणी तर 45 दिवसांनी दुसरी कोळपणी ते करून घेतात. कोळपणी झाल्यावर ते दोन स्प्रे फवारणी करून घेतात. जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळतात आणि 95 टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या होतात. त्यावेळेस ते सोयाबीन पिकाची काढणी करून घेतात. गजानन चौधरी आणि त्यांचे भाऊ मिळून एकूण 18 ते 20 एकरात सोयाबीनची लागवड करतात. आणि एकरी 20 ते 22 किलो सोयाबीनची पेरणी करतात. यासाठी त्यांना एकरी 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. गेल्या वर्षी त्यांना 9 ते 10 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघून यातून एकरी 40 ते 45 हजार रुपये नफा मिळाला.
पपई लागवड व्यवस्थापन
गजानन चौधरी यांना त्यांच्या मित्राने फळपीक लागवड करण्याचा सल्ला दिला. मागील तीन वर्षांपासून तिघे भाऊ मिळून पपईची लागवड करत आहेत. सुरुवातीला नागरटी करून शेतात बेड तयार करू घेतो. त्यानंतर खत आणि फर्टीलायझर टाकून जैन इरिगेशनचे ठिबक नळ्या बसवून घेतात. यामुळे पपईला वेळेवर पाणी देता येते. मला फर्टीलायझर वगैरे धरून एकरी 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो. पण, पपईवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास खर्चही वाढतो. गेल्या वर्षी मला पपई पिकातून 8 एकरमध्ये 18 लाख रुपयांचे उत्पादन झाले, असे गजानन चौधरी यांनी सांगितले.
केळी, पपई, सोयाबीन पिकातून 40 ते 45 लाख रुपये नफा
गजानन चौधरी यांच्याकडे सारायंत्र, रोटाव्हेटर तसेच मशागत आणि अंतर मशागतीसाठी विविध अवजारे आहेत. तिघे बंधू मिळून 48 एकर घरची आणि 50 एकर शेती ही भाडेतत्वावर करत आहेत. केळी, पपई, सोयाबीन पिकातून तिघे भाऊ मिळून वर्षाला 65 ते 70 लाख रुपये उत्पादन घेऊन 40 ते 45 लाख रुपये नफा कमवत आहेत.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल. 👇