शेती क्षेत्रात झपाट्याने विकसित होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह विविध पीक पद्धतीची सांगड घालून अनेक तरुण शेती करू लागले आहे. भाजीपाला आणि फुलशेतीतून चांगला नफा मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून देखील समृद्ध होताना दिसून येत आहेत. अलिकडच्या काळात अनेक तरुण प्रयोगशील शेती करत आहेत. तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करत आहेत. एका अशाच तरुणाने चांगली नोकरी सोडून फुलशेती सुरू केली आहे. आज या फुलशेतीतून तरुण लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. मनन अग्रवाल असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
मनन अग्रवाल बीटेक ग्रॅज्युएट आहेत. फुलशेतीची आवड जोपासण्यासाठी मनन यांनी नोकरी सोडली, त्यांची ही आवड कोरोना काळात फुलली. कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन हा मनन यांच्यासाठी एक टर्निंग पाईंट होता. त्यामुळे त्यांना फुलांबद्दलचे आकर्षण शोधण्यासाठी वेळ आणि जागा मिळाली. कोरोना काळात जेव्हा प्रत्येकजण आपापल्या घरात बंदिस्त होता तेव्हा मनन यांनी त्यांची फुलांची आवड जोपासण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि फुलशेतीसाठी भगवानपूर तहसील, हरिद्वारमध्ये जमीन खरेदी केली. इथून फ्लोरीकल्चरिस्ट म्हणून मनन यांच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. पण, हा त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता. फुलशेतीला सुरुवात करताना मनन यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा होता. फ्लोरिकल्चरच्या मूलभूत गोष्टींशी ते परिचित नव्हते आणि फुलशेती कशी आणि कोठून सुरुवात करावी याबद्दल ते संभ्रमात होते. यासाठी मनन यांनी विविध पुस्तकातून फुलशेतीचा अभ्यास केला. यासोबतच त्यांनी अनुभवी फुलशेतकऱ्यांची भेट घेऊन फुलशेतीची संपूर्ण माहिती घेतली. तसेच मनन यांनी फुलशेतीबद्दल सर्वसमावेशक ज्ञान मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्रीय विभागांचा सल्ला घेतला.
आणि दिसला आशेचा किरण
खूप प्रयत्न करूनही मनन यांनी घेतलेल्या शेतजमिनीवर फुल उगवण्याबद्दल पूर्ण खात्री नव्हती. मात्र, मनन यांनी धाडस केला आणि घरीच वेगवेगळ्या फुलांचे प्रयोग सुरु केले. हवामान बदलाच्या परिस्थितीत फुलांची लागवड कशी करावी मनन चाचणी आणि त्रुटीद्वारे शिकले. गुंतवणुकीचा खर्च जास्त असल्यामुळे त्यांना सुरुवातीला अपेक्षित नफा मिळत नव्हता. यावेळी त्यांच्या मित्रांनी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून (NHB) मदत आणि अनुदान मिळविण्याचे सुचवले. आणि मनन यांना आशेचा किरण दिसला. मनन यांनी NHB चा सल्ला घेतला आणि विभागाने त्यांना अर्ज प्रक्रिया आणि प्रकल्प अंमलबजावणीसाठी अमूल्य मदत दिली. तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी त्यांनी मनन यांना विविध संशोधन संस्थांशी जोडले आणि आर्थिक मदत देऊ केली. NHB च्या पाठिंब्याने मनन यांनी 2023 मध्ये जरबेरा लागवडीसाठी पॉलीहाऊस उभारून त्यांचा प्रकल्प स्थापन केला. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे सहकार्य अमूल्य होते. जरबेरा लागवडीसाठी पॉलीहाऊस उभारण्यात त्यांचे मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मनन यांना मोलाची ठरली.
वर्षाला लाखोंची कमाई
मनन यांनी जरबेरा फुलाची लागवड केली होती. उच्च दर्जाच्या जरबेरा फुलांचे उत्पादन त्यांना झाले. फेब्रुवारी 2023 पर्यंत जरबेराच्या सहा रंगीत जातींच्या रोपांची लागवड केली. आणि त्याचे उत्पादन हे जुलै 2023 मध्ये सुरु झाले. मनन अग्रवाल यांनी दररोज सुमारे 3 हजार 500 रुपये रोपे तयार केली यातून त्यांनी वर्ष 2023-24 मध्ये 37,80,000 इतकी कमाई केली यातून खर्च वजा जाता त्यांना निव्वळ नफा हा 27,80,000 रुपये मिळाला आहे. जिद्द, चिकाटी आणि आलेल्या अडथळ्यांवर मात करून मनन यांनी हे सिद्ध केले की, पॉलिहाऊसमध्ये जरबेराची लागवड केवळ फायदेशीर नाही तर समृद्धी आणि रोजगार निर्मितीचे साधन आहे. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यानचा त्यांचा प्रवास, आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब करणे आणि उच्च मूल्याच्या पिकांवर लक्ष केंद्रित करणे या आव्हानात्मक वातावरणातही शेतकऱ्यांचे जीवन कसे बदलू शकते याचा पुरावा आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇