अलीकडच्या काळात तरुण शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. याच माध्यमातून हेच तरुण शेतकरी लाखो रुपयांचा नफा देखील कमवत आहेत. तर काही तरुण नोकरी सोडून शेती करत आहेत. अशाच एका तरुणाने इस्रोची नोकरी सोडून खजुराची शेती यशस्वी केली आहे. इस्रोचे माजी प्रकल्प शास्त्रज्ञ आणि सेंद्रिय खजूर शेती करणारे शेतकरी दिवाकर चन्नाप्पा यांचे नाव शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांमध्ये सामील आहे. कर्नाटकातील रहिवासी असलेल्या चन्नापा यांनी इस्त्रोची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खूप विरोध केला. पण, जपानी तत्त्वज्ञ आणि नैसर्गिक शेतकरी मासानोबू फुकुओका यांच्या ‘वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’ या पुस्तकाचा प्रभाव असलेले चन्नपा आपल्या आग्रहावर ठाम राहिले. या जिद्दीमुळे आज त्यांना एकरी 6 लाख रुपये दरवर्षी नफा मिळत आहे.
ग्रामीण कर्नाटकातील एका कृषी कुटुंबात जन्मलेल्या दिवाकर चन्नापा यांचे वडील शेती करायचे. त्यांच्या वडिलांकडे 7.5 एकर शेतजमीन होती. त्यात ते नाचणी, मका, तूर या पिकांची लागवड करायचे, मात्र त्यांना या पिकांमधुन चांगले उत्पादन मिळाले नाही. यामुळेच दिवाकर चन्नापाने शेती करू नये आणि शिक्षणानंतर नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. या कारणास्तव त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीही सोबत शेतात नेले नाही. चन्नपा यांनी बंगळुरूमध्ये शिक्षण घेतले. पण चन्नापाचा शेतीकडे असलेला कल कमी झाला नाही. सामाजिक कार्यात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ना- नफा संस्थांसोबत काम केले. तसेच तुमकुरु विद्यापीठात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून देखील ते होते. 2008 मध्ये, त्यांना बेंगळुरू येथे ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) सह सामाजिक विकास प्रकल्पासाठी प्रकल्प वैज्ञानिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन या पुस्तकातून मिळाली प्रेरणा
दिवाकर चन्नाप्पा हे इस्रोमध्ये प्रकल्प वैज्ञानिक म्हणून काम करत होते. 2009 मध्ये दिवाकर यांच्या वडिलांना अपंगत्व आले आणि याच वर्षी त्यांनी इस्रोची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात त्यांना मासानोबू फुकुओका या जपानी शेतकऱ्याचे ‘वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’ नावाचे पुस्तक वाचायला मिळाले. पुस्तक वाचल्याच्या चौथ्या दिवशी त्यांच्या वडिलांच्या शेतात जाण्याची हिंमत त्यांनी एकवटली. काही वेळातच दिवाकर शेतीकडे वळले आणि त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीला दिवाकर यांनी स्थानिक शेतकऱ्यांप्रमाणे बाजरी, तूर डाळ आणि मका यांसारखी पिके घेतली. यासाठी त्यांनी सुमारे 22,000 रुपये गुंतवले होते. या पिकांच्या उत्पादनातून त्यांनी 33,000 रुपये कमावले – 11,000 रुपयांचा नफा – मागील कामांच्या तुलनेत अत्यंत कमी कमाई.
सेंद्रिय शेती करण्याचा घेतला निर्णय
जपानी तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका यांच्या ‘वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन’ या पुस्तकाचाही त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव पडला आणि त्यांच्या मनात सेंद्रिय शेती करण्याची इच्छा निर्माण झाली. दिवाकर एकदा प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून एका पाणलोट प्रकल्पासाठी तामिळनाडूला गेले होते. तेथे त्यांनी खजुराची शेती पाहिली. तामिळनाडू आणि आपल्या गावातील नैसर्गिक वातावरणातील साम्य पाहून त्यांनीही खजूर पिकवण्याचा निर्णय घेतला. पुढे जाऊन दिवाकर यांनी प्रत्येकी 3,000 रुपयांना 150 रोपे विकत घेतली. त्यासाठी त्यांना 4.5 लाख रुपयांची मोठी प्रारंभिक गुंतवणूक करावी लागली. ही रोपे महाग होती आणि जिद्द, मेहनतीने त्यांनी वाळवंटी परिस्थितीशिवाय या रोपांची वाढ केली. खजुराची लागवड केल्यानंतर शेतात वाळवंट तयार करायचा आहे का ?, असे अनेक प्रश्न विचारून लोक त्यांच्यावर हसलेत. तरी देखील दिवाकर चन्नाप्पा यांनी हार मानली नाही.
एक एकरातून ६ लाखांचा नफा
खजूर लागवडीसाठी त्यांनी त्यांच्या शेतात 2×2 फूट खड्डे खणले आणि नदीची वाळू टाकली. खजुराची रोपे लावण्यापूर्वी त्यांनी सेंद्रिय खताचे पोषण केले आणि खजुराच्या रोपांची लागवड केली. साडेचार वर्षांनंतरच दिवाकर यांना पहिले फूल दिसले. त्यांच्या आनंद गगनात मावत नव्हता. सुरुवातीला त्यांना त्यांच्या अडीच एकर शेतीतून 800 किलो खजूर काढता आला. आज त्यांना पाच टनांपर्यंत उत्पादन मिळत आहे. आज ते एक एकर खजुराच्या शेतीतून 6 लाख रुपये नफा कमवत आहेत. या खजूर लागवडीमुळे आज त्यांची मोठी ओळख निर्माण झाली आहे.
प्लास्टिक बॉटल्स हानिकारक तर बांबू बॉटल्स आरोग्यदायी