(ता. चादूररेल्वे, अमरावती) येथील तुषार वासुदेवराव माकोडे यांनी बीटेक (फुडटेक), ऍग्री बिजनेस मॅनेजमेंट पूर्ण केले. त्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. पडीक शेती खरेदी करुन ती वहितीखाली आणत त्यावर काकडी, शेवगा अशी व्यवसायीक पीकपध्दती यशस्वी केली. एवढ्यावरच न थांबता तुषारने बायोमासपासून पॅलेट तयार करण्याचा उद्योगही उभारला आहे. या साऱ्या कामात कुटूंबीयांची भक्कम साथ असल्याचे त्याने सांगीतले.
वडीलांकडून मिळाले शेतीचे धडे
तुषारचे वडील वासुदेवराव हे महावितरणला होते. 2014 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. नोकरीसोबतच त्यांनी शेतीच व्यासंग जपला. परिणामी त्यांच्या माध्यमातूनच तुषारला शेतीचा लळा लागला. याच कारणामुळे त्याने नोकरी ऐवजी शेतीतच करीअर करण्याचा निर्णय घेतला. 2014 ला ऍग्री बिजनेस मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर शेतीत नव्या संकल्पनावर काम सुरु केले, असे तो सांगतो.
ऍमीनो ऍसीड प्रकल्पावर काम
केसापासून ऍमीनो ऍसीड तयार करण्यावर सुरुवातीच्या काळात त्याने भर दिला. कोणत्याही कामाची लाज नसावी असे त्याला सुरुवातीपासूनच आईवडीलांकडून धडे मिळाले होते. त्यामुळेच ऍमीनो ऍसीड तयार करण्याकामी मानवी केस गोळा करण्यासारखे कामही त्याने केले. प्रक्रियेपूर्वी हे केस पाण्याने स्वच्छ करावे लागत होते. त्यानंतर त्यावर पाच तास प्रक्रिया करावी लागत होती. यामध्ये ऍसीडचा वापर होतो. परिणामी हे काम जोखमीचे देखील होते. परंतू कुटूंबियांच्या मदतीने त्याने हा प्रकल्पही काही काळ चालविला. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या
कंपनीला ऍमीनो ऍसीडचा पुरवठा होता होता. मात्र यात अपेक्षीत मोबदला मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने नव्या संकल्पनावर काम करण्याचा निर्णय घेतला.
पडीक जमिनीवर सुधारणा
शिवारात माकोडे कुटूंबीयांची चार एकर शेती. पडीक असलेली शेती 2015 मध्ये खरेदी करण्यात आली. जमीनीची लेव्हल करण्यात आली; त्यात पीक घेता यावे याकरीता गाळ पसरविण्यात आला. सिंचन सुविधांकरीता 58 फुट विहिर खोदण्यात आली. विहिरीचे खोलीकरण करण्याचे प्रस्तावीत असून गाव तलावाच्या समांतर ही विहिर आल्यास भुजल पातळीत वाढ होईल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यावर येत्या काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
अशी आहे पीकपध्दती
चार एकर शेतीचा विचार करता एक एकरावर शेवगा तर अर्ध्या एकरावर शेडनेट आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून 20 गुंठे क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या शेडनेटकरीता 9 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
शेवगा बियाण्यावर दिला भर
शेवगा लागवड चार वर्षांपूर्वी करण्यात आली. ओडीशी जातीच्या शेवग्याकरीता या भागातील वातावरण पोषक आहे. त्यामुळे याच जातीच्या वाणाची निवड करण्यात आली. शेवगा बियाण्याची विक्री देखील केली जाते. त्याकरीता तामिळनाडूच्या एका कंपनीसोबत करार करुन त्यांच्या मार्फत कॅनडाला 300 ते 400 किलो शेवगा बियाणे पाठविण्यात आले. ज्याप्रमाणे मागणी राहते. त्यानुसार बियाणे पुरवठा केला जातो. मध्यप्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमध्ये बियाणे पाठविण्यात आले. 2000 रुपये प्रती किलो याप्रमाणे बियाणे विक्रीवर भर देण्यात आला आहे. 900 ते 1000 किलो बियाण्याची विक्री आजवर करण्यात आल्याचे तुषार सांगतो.
अशी होते शेवगा शेंगाची विक्री
पाच किलो बंडलमध्ये पॅकींग करुन त्याची विक्री होते. डिसेंबर ते जानेवारी या काळात 80 ते 90 रुपयांचा दर राहतो. उन्हाळ्यात आवक वाढती असल्याने दरात घसरण होते. मार्च ते मे या कालावधीत 20 ते 25 रुपयांचा दर मिळतो. नोव्हेंबर ते मे अखेर पर्यंत शेवगा शेंगाचा हंगाम राहतो, असे तुषारने सांगीतले. सहा महिन्याच्या कालावधीत अडीच ते तीन टन एकरी शेंगाची उत्पादकता होते, असा त्यांचा अनुभव आहे. अमरावती बाजारपेठेत शेंगाची विक्री केली जाते. हिवाळ्यात मालाची उत्पादकता कमी होते. परिणामी दर चांगले राहतात. बुरशी आणि पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव या पीकात होतो, त्याच्या नियंत्रणाकरीता उपाययोजना कराव्या लागतात.
शेडनेट मध्ये काकडीची लागवड
वर्षभरात दोनदा काकडीचे उत्पादन घेण्यात आले. अधिक उत्पादनक्षम काकडी वाणाची लागवड करण्यात आली असून हे वाण सेल्फ पॉलीनेटेड वाण आहे. यंदाच्या एका महिन्याच्या हंगाम कालावधीत पावणे आठ टनाची उत्पादकता झाल्याचे तुषार यांनी सांगीतले. तीन महिन्याचे हे पीक असून लागवडीनंतर 38 दिवसांनी पहिला तोडा सुरु झाला. जानेवारी अखेरपर्यंत माल मिळतो. सद्या अमरावती बाजारपेठेत याची विक्री होत आहे यापुढील काळात पुणे, मुंबई बाजारपेठेत विक्रीचा प्रस्ताव आहे. 10 किलोच्या प्लॅस्टीक पिशवीत भरुन बाजारपेठेत पाठविण्यावर भर आहे. साधारणतः एक दिवसाआड काकडीचा माल मिळतो. आता पावसामुळे दर आठ दिवसांनी तोडणीवर भर आहे.
बायोमास पॅलेट उत्पादन
सोयाबीनच्या कुटारावर प्रक्रिया करुन त्यापासून पॅलेट तयार करण्याच्या उद्योगाची उभारणी तुषारने केली आहे. 2016 साली या संकल्पनेवर काम झाले. या उद्योगाकरीता 20 लाख रुपयांची यंत्रसामुग्री लागते. शेड व खेळते भांडवल अपेक्षीत धरता सरासरी 60 लाख रुपयांची गरज भासते. बॉयलरला स्टीम जनरेशनसाठी पॅलेटचा उपयोग होतो. प्रदुषणमुक्त असल्याने याचा वापर वाढता असल्याचे त्याने सांगीतले. उद्योगात 10 तासाची शिफ्ट अपेक्षीत धरता अडीच ते तीन टन उत्पादन मिळते. तासाला 250 ते 300 किलो अशी क्षमता या सयंत्राची आहे.
बायोमास पॅलेटची बाजारपेठ
बायोमास पॅलेटच्या उत्पादनानंतर त्याच्या विक्रीचा प्रश्न होता. त्यापार्शवभूमीवर काही कंपन्या तसेच या क्षेत्रातील काही एजंटसोबत संपर्क साधण्यात आला. त्यांच्या माध्यमातून विक्रीवर भर देण्यात आला आहे. सद्या महिन्याला 35 ते 40 टन पॅलेटची विक्री केली जाते. मागणीनुसार उत्पादन करण्यावर भर देण्यात आला आहे. हॅमर, मिक्सींग, बेंड करणे अशी प्रक्रिया यात राहते. त्याला बराच कालावधी लागत असल्याने आधीच्या बॅचचे उत्पादन हाती आल्याशिवाय दुसरी ऑर्डर घेणे शक्य होत नाही.
कच्चा मालाचा असा होतो पुरवठा
बायोमास पॅलेट तयार करण्याकामी 1800 ते 2000 रुपये दराने कच्च्या मालाचा पुरवठा होतो. त्याकरीता या क्षेत्रातील एजंटची मदत घेतली जाते.
केशर लागवडीवर देणार भर
शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यात सातत्य राखणाऱ्या तुषारने यापुढील काळात केशर उत्पादन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. राज्यातील काही शेतकरी नियंत्रीत पध्दतीत केशरचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्यापासून माहिती घेत, त्यांच्या प्रकल्पांना भेटी देत अशाप्रकारचा केसर उत्पादन प्रकल्प साकारणार असल्याचे त्याने सांगीतले. आई लतीका, वडील वासुदेवराव, पत्नी अश्वीनी यांचे दैनंदीन नियोजनात सहकार्य लाभत असल्याचे त्याने सांगीतले.
– तुषार माकोडे मो. 7276358819