पुणे – उत्तर – मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज (13 जून) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (प्रतितास वेग 50-60 किमी) तर अपवादात्मक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून पूर्व विदर्भ वगळता राज्यात तसेच गुजरातच्या दक्षिण भागात पोहोचला असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले.
या 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट…?
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नगर, पुणे, सोलापूर धाराशिव, लातूर या 16 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
उत्तर – महाराष्ट्र स्थिती
उत्तर – मध्य महराष्ट्रात नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा स्थिती
मराठवाड्यात धाराशिव, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून बीड नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या व मध्यम सरींची शक्यता आहे.
14 जूननंतर 10-12 दिवसांचा खंड
उत्तर – मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे. नाशिक, सोलापूर, नगर भागात पावसाचा जोर कमी अधिक आहे. नाशिक, खान्देशात ढगाळ वातावरण आहे. राज्याच्या अनेक भागात मागच्या काही दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, 14 जूनपासून राज्यात पावसाचा 10-12 दिवसांचा खंड पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
पेरणीबाबत कृषी विभागाचे आवाहन
पावसाचा खंड लक्षात घेता पाण्याची अर्थात सिंचनाची सोय असलेल्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही. मात्र, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही त्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाला असेल व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असेल तरच पेरणीचा विचार करावा. कोरडवाहू किंवा हलकी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अशा भागातील शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करावी आणि दमदार पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
देशातील स्थिती
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये नेहमीपेक्षा दोन दिवस अगोदर दाखल झालेला मान्सून नंतरच्या टप्प्यात मात्र रेंगाळला. त्याचा जोरही काहीसा कमी झाला. परिणामी, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये हवामान सामान्यतः कोरडे राहील. गंगेच्या पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार, झारखंड आणि उत्तराखंड, छत्तीसगड आणि ईशान्य मध्य प्रदेशच्या मैदानी भागातही उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे.