मुंबई : शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. महाराष्ट्रात मान्सून 10 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र, रेमल चक्रीवादळानंतर वाऱ्याच्या वेगामुळे नैऋत्य मान्सूनने जोरदार मुसंडी मारली. 9 ते 10 जून रोजी महाराष्ट्रात कोकण मार्गे मान्सूनचा प्रवेश अपेक्षित होता. परंतु, मान्सूनची वेगवान वाटचाल लक्षात घेता तो उद्या अर्थात मंगळवारीच कोकणमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.
मान्सून केरळमध्ये 30 मे रोजी पोहचल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची सर्वांनाच चाहूल लागली होती. दरम्यान, मान्सून मंगळवारी म्हणजेच उद्या 4 जून रोजी कोकणात दाखल होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. तसेच 6 जून रोजी मान्सून पुण्यात दाखल होणार असल्याचंही पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
डॉ. कश्यपी यांचा दुजोरा
जून महिन्यात पडणारा पाऊस हा मान्सूनचा समजला जाईल. सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात आज दाखल होईल. तर तळ कोकणात ४ जून रोजी आणि पुण्यात ६ जून रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा दुजोरा पुणे हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्र डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.
चक्रीवादळ
केरळ किनाऱ्यापासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ पसरले आहे. दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यापासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणखी एक चक्रीवादळ तयार झाले आहे.
3, 4, 5 जूनची स्थिती
केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये 3, 4, 5 जूनला मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखाही सक्रिय
याच कालावधीत बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा देखील सक्रिय झाली असून आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
उष्णतेची लाट
पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानला उष्णतेच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळेल पण काही ठिकाणी उष्णतेची लाट अजून काही दिवस कायम राहील.