मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. दरम्यान, आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सूनने काल अंदमान – निकोबारमध्ये धडक दिली आहे.
हवामान विभागानं अंदमान – निकोबारमध्ये 19 मे रोजी मान्सून धडकेल, असा अंदाज वर्तविला होता आणि हा अंदाज खरा ठरला आहे. अंदमान – निकोबार बेटावर मान्सूनने 19 मे रोजी धडक दिली आहे. दक्षिण अंदमान समुद्राचा काहीभाग, निकोबार द्वीप समूह, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग मान्सूनने व्यापला आहे. सध्या हे वातावरण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रात कधी येणार ?
मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा ‘ला नीना’ चा प्रभाव असून देशभरात मान्सूनचं प्रमाण चांगलं असणार आहे. तसेच 6 ते 10 जूनदरम्यान मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच 106 टक्के पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.