शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केंद्रीय महिला व बालकल्याण तसेच जनजाती विकास राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी केले. त्या पिंपळगाव बसवंत येथे ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना संबोधित करत होत्या. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे ॲग्रोवर्ल्डने यापुढेही ग्रामीण भागात कृषी प्रदर्शनांचे आयोजन करत राहावे; शेतकरीहितासाठी लहान बहीण म्हणून आपण नेहमीच ॲग्रोवर्ल्डच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही डॉ. पवार यांनी यावेळी दिली.
डॉ. भारतीताई म्हणाल्या, “अशा प्रकारचे आयोजन गावाकडे, तालुक्यात होणे गरजेचे आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान काय ते कळते, त्यासंदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणून घेता येऊ शकते. त्यातून भविष्यात शेतीपुढील आव्हानांचा वेध घेता येतो. पर्यायाने शेतकऱ्यांचा फायदा होतो.”आपल्याकडे परदेशापेक्षा उत्तम शेती केली जाते; पण ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ एकमेकांशी शेअर केल्या जात नाही, अशी खंतही डॉ. पवार यांनी व्यक्त केली.
इतर राज्यात तंत्रज्ञानाचा शेती विकासासाठी चांगला वापर होत आहे. शेती ही काळी आई आहे, या मातेची काळजी घ्या
नरेंद्र मोदींच्या काळात महिला सक्षमीकरण, शेतकरी हिताच्या अनेक योजना
केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले. 2014 पूर्वी महिला बचत गटांना फक्त 50 हजार रुपये कर्ज दिले जायचे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता बचत गटांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. यावेळी डॉ. पवार यांनी अगदी गहिवरून विनायकदादा पाटील यांची आठवण काढली. ग्रेप सिटी नाशिक ही ओळख आपण अभिमानाने मिरवतो. निफाडच्या चवदार द्राक्षांचा हा वारसा आणि आपली संस्कृती आपण जपायला हवी, अशी अपेक्षाही भारतीताईंनी व्यक्त केली. व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री करार करावेत, तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापाऱ्यांच्या विश्वासार्हतेची खातरजमा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कांदा निर्यातबंदीसंदर्भात लवकरच चांगला निर्णय
कांदा निर्यातबंदीनंतर आता लवकरच चांगला निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. भारतीताई पवार यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुकूल निर्णय घेण्यासाठी आपण निरंतर प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या प्रकोपामुळे 2022 च्या तुलनेत यंदा कांद्याची आवक निम्मी झाली आहे. त्यामुळे भावही तुलनेत अधिक चांगला मिळत असल्याची आकडेवारी डॉ. पवार यांनी सादर केली. त्यामुळे यंदा आवक वाढेल तसा शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी निक्षून सांगितले.
ॲग्रोवर्ल्डच्या तळमळीचा मनापासून आवर्जून उल्लेख
डॉ. भारतीताई पवार यांनी ॲग्रोवर्ल्डच्या तळमळीचा मनापासून आवर्जून उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “ॲग्रोवर्ल्डने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली दिसून येते. शेतकऱ्यांसाठी अशा तळमळीने काम करणाऱ्या खूपच कमी संस्था आहेत. त्यामुळे एक लहान बहीण म्हणून मी नेहमीच ॲग्रोवर्ल्डच्या चांगल्या कार्यात सहभागी राहीन. तुमच्या पाठीशी उभे राहून मी संपूर्ण सहकार्य करणार. शेतकरी हिताचा प्रश्न जिथे आहे, तिथे नेहमीच मी पाठीशी उभी राहील, याची खात्री बाळगा.” यावेळी ॲग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन शिबिरे भरवून त्यांना सोप्या भाषेत प्रक्रिया समजावून सांगावी. शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचेही ॲग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही डॉ. पवार यांनी व्यक्त केली.
भावनाताई भंडारे यांचा मैत्रीपूर्ण गौरव
प्रारंभी ॲग्रोवर्ल्ड संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड आदर्श महिला शेतकरी पुरस्कार आणि ॲग्रोवर्ल्ड कृषी-ऋषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉ. पवार यांनी यावेळी मैत्रीण असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य भावनाताई भंडारे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर सतीश बापू, सुनील पवार, बापू पाटील आदीही उपस्थित होते. वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन केले.
कांदा साठवणुकीवर उद्या डॉ. काकोडकर यांचे मार्गदर्शन
प्रमिला लॉन्स, पिंपळगाव बसवंत येथे 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा उद्या, दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी समारोप होणार आहे. समारोपावेळी दुपारी एक वाजता “रेडीएशन मॅन” डॉ. अनिल काकोडकर हे कांदा बँक, त्याचा दीर्घकालीन फायदा तसेच कांदा साठवणुकीचे नवे तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी 11 वाजता वरिष्ठ तज्ञ बी.टी. गोरे हे “डाळींब पीक व्यवस्थापन” तर 12 वाजता डेअरी तज्ञ डॉ. इरफान खान हे “आदर्श दुग्ध व्यवसाय” यावर मार्गदर्शन करणार आहेत.