जळगाव :- ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना म्हटला की, आठवते वाफसा परिस्थिती. या वाफसा परिस्थितीमध्ये पिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक असते. वाफसा असतांना झाडांसाठी आवश्यक पाण्याची स्थिती या लेखात जाणून घेऊया.
जमिनीत दोन मातीकणांच्या मधल्या पोकळीत पाण्याचे अस्तित्व न राहता 50 टक्के वाफ आणि 50 टक्के हवा यांचे संमिश्रण असणे, म्हणजे वाफसा होय. झाडांची मुळे त्यांची पाण्याची आवश्यकता वाफेच्या रूपातील पाण्याचे कण घेऊन पूर्ण करतात. त्यामुळे झाडांना थेट पाण्याची नाही, तर वाफेची आवश्यकता असते. यासह झाडाच्या मुळांना आणि मातीतील विविध जिवाणूंना जगण्यासाठी हवेची आवश्यकता असते. त्यामुळे मातीत हवा खेळती राहणेही आवश्यक असते. वाफसा स्थितीमध्ये या दोन्ही गोष्टींची पूर्तता होते. सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे आपल्याला जमिनीत केवळ ओलावा टिकवून ठेवायचा असतो. अतिरिक्त पाण्याचा मारा करायचा नसतो.
वाफसा घेणारी मुळे कुठे असतात?
कोणत्याही झाडाची दुपारी बारा वाजता जी सावली पडते; त्या सावलीच्या सीमेवर अन्नद्रव्ये आणि वाफसा घेणारी मुळे असतात. त्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ पाणी न देता ते सावलीच्या सीमेच्या 5 – 6 इंच बाहेर द्यावे. असे केल्याने मुळे त्यांना आवश्यक तेवढा वाफसा घेतात आणि अतिरिक्त ओलाव्याने मुळे कुजण्याची अथवा बुरशी लागण्याची शक्यता अल्प होते.
पाणी व्यवस्थापन योग्यप्रकारे केल्याने उत्पन्नात वाढ कशी होते?
झाडाच्या बुंध्यापासून 6 इंच दूर पाणी दिल्याने झाडाची मुळे वाफशाचा शोध घेण्यासाठी लांबपर्यंत वाढतात. मुळांची वाढ चांगली झाली की, त्याचा थेट परिणाम खोडावर होतो आणि खोडाचा घेर वाढतो. खोडाचा घेर जितका अधिक, तेवढे पानांनी बनवलेले अन्न अधिकाधिक प्रमाणात खोडात साठवले जाते आणि त्यामुळे झाडाचा आकार, फाद्यांची संख्या यांत वाढ होते. या सर्वांचा परिणाम म्हणून झाडापासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते.
झाडांची पाण्याची आवश्यकता कशी ओळखावी?
केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून वाफसा आहे का, याचा अंदाज घेऊन मगच पाणी द्यावे. हे ओळखण्यासाठी कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा लाडूसारखा गोळा बांधला जातो का? ते पाहावे. जर गोळा झाला, तर मपाण्याची आवश्यकता नाही. मातीत पुरेसा ओलावा आहेफ, असे समजावे. (एकदा अंदाज आल्यावर नेहमी माती उकरून पाहण्याची आवश्यकता नसते.) तसेच काही वेळा पाणी देण्याची आवश्यकता असेल, तर रोपांचे शेंडे मलूल झालेले दिसतात. अशा वेळी पाणी द्यावे.
झाडांची पाण्याची आवश्यकता ऋतुमानानुसार पालटते पावसाळ्याच्या 4 मासांत सतत ओलावा असतोच. त्यामुळे शक्यतो पाणी द्यावे लागत नाही. हिवाळ्यातही तापमान पुष्कळ अल्प असेल, तर 1 – 2 दिवसाआडही पाणी दिलेले चालते. उन्हाळ्यात मात्र नियमित पाणी द्यावे. हळूहळू सरावाने आणि निरीक्षणाने यातील बारकावे लक्षात येऊ लागतात.
पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते. मआच्छादनफ आणि त्यामुळे तयार झालेले मह्यूमसफ यांच्याद्वारे हवेतील आर्द्रता (बाष्प) खेचून ती मुळांना उपलब्ध होण्याची क्रिया सतत होत राहते. त्यामुळे झाडाच्या एकूण पाण्याच्या आवश्यकतेतील केवळ 10 टक्केच पाणी आपल्याला पुरवावे लागते.
प्रा. मयुरी देशमुख
मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ .उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- ग्रेन ड्रायर म्हणजे काय? शेतकरी सर्वात स्वस्त किंमतीला कोणते ग्रेन ड्रायर खरेदी करू शकतात?
- महिला बचत गटांसाठी केंद्राची 1261 कोटींची ड्रोन दीदी योजना; शेतकरी कसा घेऊ शकतात फायदा..?