जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणासाठी पोलिसांना पहारा द्यावा लागतोय. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे 100% सत्य आहे. या प्रगत, विकसित देशात शेतकऱ्यांना गुन्हेगारी टोळ्यांना हफ्ता द्यावा लागतोय, परिणामी शेवटी ग्राहकांवरच दरवाढीचा भुर्दंड पडतोय. त्यामुळेच गेल्या वर्षभरात इथे फळे-भाज्या आणि कृषी जिन्नसांचे भाव दीड ते दोन पटीने वाढले आहेत.
हा देश आहे मेक्सिको. उत्तर अमेरिकेतील एक कृषिप्रधान देश. जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला हा देश. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचाच एक भाग समजले जाते. गुन्हेगारी आणि अंमली पदार्थ उत्पादन, तस्करीसाठी कुविख्यात असलेला हा देश.
दरवर्षी 30 लाख टन लिंबू उत्पादन
मेक्सिकोमधील शेती आणि शेतकरी यांची स्थिती काही प्रांतात अतिशय भयावह झाली आहे. मेक्सिकोमध्ये गेल्या वर्षी काही फळांच्या किंमती 58% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. सध्या लिंबू, संत्री याबाबत इथे अराजकतेची स्थिती आहे. मेक्सिकोत दरवर्षी अंदाजे 30 लाख मेट्रिक टन लिंबू उत्पादन होते.
आपल्याकडे टमाट्याच्या चोऱ्या व्हायच्या, तीच स्थिती…
मेक्सिको हा जगातील सर्वात मोठा फळ उत्पादक देश मानला जातो. या देशातील पाककलेवर लिंबू राज्य करतो. त्याचीच शेती आणि विक्री सध्या वांद्यात आहे. आपल्याकडे गेल्या महिन्यात टमाट्याच्या किंमती अचानक वाढून जशी स्थिती उद्भवली होती, चोऱ्या-माऱ्या होऊ लागल्या होत्या, तशीच काहीशी मेक्सिकोत सध्या स्थिती आहे. लिंबूबरोबरच टोमॅटो, केळी आणि आंबाही संकटात आहे. शेतकरी, उत्पादक तसेच वाहतूकदार आणि वितरक यांच्यावर संघटित गुन्हेगारीमुळे होत असलेल्या खंडणीच्या त्रासामुळे तिथे फळांच्या किमती वाढल्या आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांकडून खंडणी वसुली
मेक्सिकोच्या अपात्झिंगन प्रांतात लिंबू आणि केळीचे प्रचंड उत्पादन होते. इथे शेतकरी, उत्पादक, कंपन्या पीक लागवड करण्यासाठी शेतीची मशागत करत असताना संघटित गुन्हेगारी टोळ्या त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी येतात. या त्रासाला कंटाळून अनेकांनी या भागातून काढता पाय घेतला असून कित्येक जमिनी पडीक आहेत.
पेरणी, विक्रीसाठीही द्यावी लागते खंडणी
सध्या मिचोआकान हा मेक्सिकोमधील सर्वात प्रभावित प्रदेश झाला आहे. कार्टेल जलिस्को नुएवा जेनेरासीओन (CJNG), लॉस व्हायग्रास आणि ला फॅमिलिया मिचोआकाना सारख्या गुन्हेगारी टोळ्यांचे या भागावर नियंत्रण आहे. कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी करतांना आणि पीक कापणीनंतर विकतानाही खंडणी द्यावी लागते..
प्रत्येक किलोमागे 10 रुपये विक्रीची हफ्ता वसुली
अंमली पदार्थांच्या तस्करीव्यतिरिक्त इतर कोणत्याही शेती उत्पादनावर इथे गुन्हेगारी टोळ्या शेतकरी, उत्पादक आणि मध्यस्थांवर खंडणी लादतात, त्यांच्याकडून हफ्तावसुली करतात. त्यामुळे लाखो ग्राहकांच्या खिशाला फटका बसतो. शेतकरी, उत्पादक विकत असलेल्या प्रत्येक किलोसाठी अंदाजे सुमारे 0.12 अमेरिकी डॉलर्स वसुली करतात. भारतीय रुपयात ही किंमत 10 रुपयांच्या आसपास होते. या प्रदेशात दिवसाला सुमारे 900 टन लिंबाचे उत्पादन होते.
लिंबाला 375 रुपये किलो भाव
या सर्वांचा परिणाम म्हणूनच गेल्या वर्षी लिंबाच्या किमतीत 58.5% वाढ झाली आहे. मेक्सिको सिटीमध्ये, गेल्या महिन्यात चांगल्या लिंबू फळाची किंमत दुप्पट होऊन जवळपास साडेचार अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 375 भारतीय रुपये प्रति किलो इतकी झाली होती.
लिंबू वाहतुकीला पोलिसांचे एस्कॉर्ट
मिचोआकन, कार्टेलने त्रस्त असलेला प्रदेश आहे. या परिस्थितीमुळे देशातील उर्वरित भागात जाणार्या लिंबू वाहतुकीला पोलिसांनी एस्कॉर्ट करण्यास सुरुवात केली आहे. “कोणत्याही अडथळा व लुटीशिवाय फळे गंतव्यस्थानी पोहोचातील, या उद्देशाने आम्ही इतर सुरक्षा दलांसह समन्वित पद्धतीने फळ उत्पादनाची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना सुरक्षा देत आहोत,” असे मिचोआकन प्रांताचे पोलीस प्रमुख जोस ओर्टेगा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला सांगितले आहे.
खंडणी आणि चोरीमुळे देशातील कंपन्यांना दरवर्षी सुमारे 6.8 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा भुर्दंड बसतो. मेक्सिकोच्या जीडीपीच्या 0.67% इतकी ही रक्कम मोठी आहे.
खंडणीस नकार देणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांच्या हत्या
चिल्पान्सिंगो सारख्या देशभरातील इतर शहरांमध्ये, यापूर्वी खंडणी देण्यास नकार देणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हत्या केल्या गेल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी शेती, व्यवसायातून माघार घेतल्याने आता या प्रदेशात नागरिकांना अन्न उत्पादनांच्या टंचाईला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.
गुन्हेगारी टोळ्यांचा सामना करण्यासाठी शेतकरी, उत्पादकांनी 2013 मध्ये “हिपोलिटो मोरा”सारख्या स्वत:च्या स्व-संरक्षण गटांची स्थापना केली. नंतर या टोळ्याच गुन्हेगारीत सामील असल्याचा आरोप सातत्याने होत झाला.
स्व-संरक्षण गटांच्या प्रमुखाचीही हत्या
“हिपोलिटो मोरा”वर इतर काहीही आरोप होत असले तरी त्याने मादक पदार्थांच्या तस्करांचा तीव्र विरोध करणे सुरूच ठेवले होते. मात्र, जूनमध्ये ला रुआना, मिचोआकानमध्ये कार्टेलने त्याची हत्या केल्याने परिस्थिती पुन्हा बिघडली.
मोराची बहीण ग्वाडालुपे म्हणते, “आम्ही तिथे असलेल्या ड्रग कार्टेलमध्ये पूर्णतः भरडले जात आहोत. ते आमच्याकडून प्रत्येक गोष्टीसाठी शुल्क आकारत आहेत. बेसिक बास्केट, किराणा, शीतपेये, बिअर, चिकन सर्वच गोष्टींच्या खरेदी-विक्रीवर वसुली केली जाते. त्यांच्यामुळे सर्व काही खूप महाग होत आहे.”
शेतकरी, उत्पादकांनी स्वीकारलीय परिस्थिती
शेतकऱ्यांसाठी या परिस्थितीवर दुसरा कोणताही उपाय सध्या तरी दिसत नाही. अशा स्थितीत, मजूर व कामगारांना वाऱ्यावर सोडण्याऐवजी शेताचे मालक, उत्पादक हफ्ते, खंडणी देत ठामपणे इथे राहून परिस्थितीशी दोन हात करत राहतात.
मिचोआकानमधील वसुली, खंडणीच्या गुन्ह्याचा पाठपुरावा करणार्या युनिटचे प्रमुख अभियोक्ता रॉड्रिगो गोन्झालेझ यांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, हिपोलिटो मोरासारखीच हत्या होण्याची भीती असल्याने त्यांना फारसा प्रतिसाद लाभत नाही.