किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना आता वार्षिक 4% व्याजाने शेतकरी कर्ज मिळणे सुलभ होणार आहे. किसान ऋण पोर्टल (Kisan Rin Portal) हे काम सोपे करेल. त्यासाठी अटी-शर्ती आणि कागदपत्रांची कटकटही आता कमी होणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही शेतकऱ्यांसाठीच खास योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांसाठी सहज कर्ज मिळू शकेल. त्यातून शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके किंवा शेती उपकरणे खरेदी करण्यात मदत होते.
KCC साठी अर्ज कसा कराल?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी “किसान ऋण पोर्टल” लाँच केले आहे. या पोर्टलद्वारे, किसान क्रेडिट कार्डधारकांना तारण न घेता आणि अनुदानासह कर्ज मिळविण्यात मदत केली जाईल. याशिवाय, घरोघरी केसीसी मोहीम आणि वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम (WINDUS) पोर्टल देखील सुरू केले जाईल. किसान क्रेडिट कार्डद्वारे, शेतकरी त्यांच्या कृषी उद्देशांसाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. सरकार हे कर्ज सवलतीच्या व्याजावर देते, तर वेळेवर परतफेड करणाऱ्यांनाही व्याजात सवलत मिळते.
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीच्या कामांसाठी अचानक गरज पडल्यास सहज कर्ज मिळू शकेल. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके किंवा शेती उपकरणे खरेदी करण्यात मदत होते. या क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. याद्वारे शेतकरी 3 वर्षात एकूण 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. शेतकरी गरजेनुसार वेळोवेळी, टप्प्याटप्प्याने एकूण 5 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आता गावातील कोणत्याही सावकाराकडे जाण्याची गरज नाही. किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्षे आहे. केसीसी कर्जावरील सर्व अधिसूचित पिके/अधिसूचित क्षेत्र पीक विम्याच्या अंतर्गत समाविष्ट आहेत.
7.35 कोटी किसान क्रेडिट कार्ड खाती
देशात यावर्षी 30 मार्चपर्यंत, सुमारे 7.35 कोटी किसान क्रेडिट कार्ड खाती होती, ज्यांची एकूण मंजूर कर्ज मर्यादा 8.85 लाख कोटी रुपये आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत सवलतीच्या व्याजदरावर 6,573.50 कोटी रुपयांची कृषी कर्जे वितरित केली आहेत. इतर शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिटचा लाभ मिळावा यासाठी, पीएम किसान योजनेअंतर्गत निवडलेल्या गैर-केसीसी धारकांची ओळख पटवली आहे.
शेतकरी कर्ज व्याज, अनुदान आणि सवलत
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी अल्प मुदतीचे कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांना 9 टक्के दराने कर्ज मिळते, मात्र सरकार त्यावर 2 टक्के अनुदान देते. म्हणजे त्यावर 7 टक्के व्याजदर होतो. परंतु, शेतकऱ्याने वेळेवर कर्ज परत केल्यास सरकार त्याला आणखी तीन टक्के सूट देते. अशा प्रकारे या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज भरावे लागते.
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा
1. सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साइटवर जावे लागेल.
2. किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा.
3. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जमिनीची कागदपत्रे आणि पीक तपशीलांसह भरावा लागेल.
4. याशिवाय, तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून यापूर्वी किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही, याचीही माहिती द्यावी लागेल.
5. अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
नवी किसान ऋण पोर्टल https://fasalrin.gov.in/ इथे क्लिक करून पाहता येईल. पंतप्रधान पीक विमा योजनेचे PMFBY युझरनेम वापरून तुम्ही ऋण पोर्टलवर लॉग इन करू शकता.
कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?
ओळखपत्रासाठी: मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/पासपोर्ट/आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स इ.
पत्त्याच्या पुराव्यासाठी: मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स इ.
या योजनेसाठी पात्रता काय आहे?
1. वैयक्तिक शेतकरी जे जमीन मालक किंवा स्वतः शेती कसणारे आहेत
2. भाडेकरू शेतकरी, निमबटाईदार, गव्हाई, जुपले
3. भागपीक, शेतकरी, भाडेकरू शेतकरी इत्यादींचे स्वयं-सहायता गट.
4. जे शेतकरी पिकांचे उत्पादन किंवा पशुपालन यांसारख्या कृषी पूरक व्यवसायात गुंतलेले आहेत
5. ज्या मच्छीमारांकडे नोंदणीकृत बोट किंवा इतर कोणत्याही प्रकारची मासेमारी नौका आहे आणि ज्यांच्याकडे मासेमारीसाठी आवश्यक परवाना आहे
6. पोल्ट्री शेतकरी
7. डेअरी शेतकरी