भूषण वडनेरे
धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील दहिवेल गावापासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर भोनगाव आहे. तालुक्यातील पश्चिम पटटयात असलेल्या या गावाला निसर्गाची भरभरुन देण लाभलेली आहे. या गावाची लोकसंख्या अवघी दीड हजार असून हे गाव भाजीपाला पिकांसाठी प्रसिध्द आहे. येथील शेतकरी संभाजी परबत खैरनार यांनी मात्र सीताफळ लागवडीतून आपला उत्कर्ष साधला आहे. त्यांच्याकडे 20 एकर शेती असून पैकी 06 एकरातील सीताफळातून त्यांनी तब्बल 20 लाखांची कमाई केली. तर उर्वरित क्षेत्रात टोमॅटोसह भाजीपाला पिके घेवून त्यातूनही 20 लाखांचे उत्पन्न मिळवले. म्हणजेच वर्षभरात 40 लाखाहून अधिक उत्पन्न त्यांना मिळाले. प्रयोगशील शेतकरी म्हणून परिसरात त्यांची ख्याती असून आजवर अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली आहे. परिवारातील सदस्यांची भक्कम साथ व मेहनतीच्या जोरावर त्यांनी आदर्श व कृतीशील शेतकरी म्हणून आपले नावलौकीक केले आहे.
भोनगाव येथील शेतकरी संभाजी परबत खैरनार (52) यांचे शिक्षण एफ.वाय.बी.ए. झाले आहे. मात्र, वडीलोपार्जीत 20 एकर शेती असल्याने त्यांनाही शेतीची गोडी लागली. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता गेल्या 25 वर्षांपासून ते शेतीत रमले आहेत. शेतातील विविध प्रयोगांमुळे त्यांनी परिसरात आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. गावातील शेतकरी मुख्यत्वे भाजीपाला पिके घेतात. मात्र, संभाजी खैरनार यांनी नउ वर्षांपुर्वी फळपिकांची वाट चोखंदळत सीताफळाची लागवड केली. त्यांच्या सीताफळाला चांगला दर मिळू लागल्याने आता प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये त्यांची गणना होत आहे.
अशी केली सिताफळ लागवड
संभाजी खैरनार यांनी आपल्या २० एकर शेतापैकी 06 एकर क्षेत्रामध्ये NMK, गोल्डन जातीचे सीताफळाची लागवड केली. त्यासाठी त्यांनी बार्शी येथून 70 रुपये प्रति रोप याप्रमाणे रोपे आणली होती. 16 बाय 8 अशा अंतरावर झाडांची लागवड केली. सुरवातीला दोन वर्षे त्यांनी आंतरपिक म्हणून भाजीपालाही घेतला. त्यानंतर सीताफळांच्या झाडांचा आकार वाढल्याने आंतरपिके घेणे बंद केले. लागवडीनंतर बागाची अचूक निगा व व्यवस्थापन आणि अचूक असे लक्ष व विविध प्रयोगशीलपणा यामुळे सीताफळाची झाडे अतिशय चांगल्याप्रकारे विकसित झाली. विकसित झालेल्या बागामध्ये फळधारणासाठी केलेले नियोजनामुळे बागामध्ये मोठ्या संख्येने सीताफळाचे फळ आले. या काळात फळाचे देखील चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केल्यामुळे उच्च प्रतीचे फळाचे उत्पादन मिळाले.
वर्षभरात 20 लाखांची कमाई
शेतकरी संभाजी खैरनार यांना सीताफळाच्या उत्पादनातून गेल्या वर्षभरात सुमारे २० लाखाचे उत्पन्न मिळाले. सीताफळाच्या काढणी पश्चात विक्रीबाबत विविध भागातील व्यापारी व विक्रेते यांच्याशी संपर्क साधल्यामुळे त्यांना चांगल्याप्रकारे भाव देखील मिळाला. सुरवातीला 75 रुपये त्यानंतर 60 रुपये 50 रुपये असा दर मिळाला. अर्थात सरासरी 60 रुपये प्रतिकिलो दर जागेवरच मिळाला. वर्षभरात सुमारे 35 टन सीताफळाचे उत्पादन झाल्याने त्यांना या फळपिकामधून एकूण २० लाखांची कमाई झाली. यापुर्वी त्यांच्या बागेतल्या सीताफळाची देशातल्या विविध भागातल्या मार्केटमध्ये उच्च दराने विक्री झाली होती. देशाच्या राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली येथील मार्केटमध्ये देखील खैरनार यांच्या शेतातल्या सीताफळाची उच्च दराने विक्री झालेली आहे, हे विशेष.
विविध फळपिकांसह भाजीपाल्याचे उत्पादन
संभाजी खैरनार यांनी आपल्या शेतामध्ये सीताफळ या पीकासोबत इतर फळपिकाचेही बाग विकसित केलेल्या आहेत. यामध्ये द्राक्षे, डाळिंब, लिंबू, टरबुज, डांगर, यांचाही सामावेश आहे. या विविध फळपिकामधून देखील खैरनार यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळते. द्राक्षे आणि डाळींबाच्या पिकामधून वार्षिक १० ते १५ लाखाचे वार्षिक उत्पन्न त्यांना मिळते. टरबूज, डांगर, काकडी यामधून देखील हंगामी 3 ते ४ लाखाचे उत्पन्न त्यांना मिळत असते. आता त्यांनी 06 एकरातील सीताफळ वगळता उर्वरित 14 एकर क्षेत्रापैकी 4 एकरात टोमॅटो, 2 एकरात मका, 5 एकरात कपाशी लागवड केली असून एक एकरात भाजीपाला पिकाची लागवड करण्याचे त्यांचे नियोजन आहे. या सर्व पिकांतूनही त्यांना वर्षाकाठी 20 लाखांचे उत्पन्न हमखास मिळते.
गुजरातमध्ये मालाची विक्री
संभाजी खैरनार, हे आपल्या शेतामध्ये विविध पिके घेत असतात आणि प्रत्येक पिकांबाबत अतिशय काळजीने आणि अभ्यासपूर्ण व्यवस्थापन याच्यामुळे एकूण उत्पन्नामध्ये भर पडते असते. पिकांबाबत विविध प्रयोगशीलतामुळे देखील उत्पादनात वाढ होते. त्यांच्या शेतातल्या द्राक्षे आणि डाळींब, लिंबू, टरबुज, डांगर या पिकांबाबत असलेली अचूक लक्ष, चांगले व्यवस्थापन यामुळे उत्पन्न चांगले मिळते. बाजार व्यवस्थापनामुळे देखील मालाला भाव चांगल्याप्रकारे मिळण्यासाठी मदत होते. त्यांचा शेतीमाल मुख्यत्वे गुजरातमधील मधील सुरत तसेच महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापूर येथे विक्रीसाठी जातो. या ठिकाणी उच्च दराने बाजारभाव मिळत असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये अधिक भर पडत असते. त्यामुळे ते इतर शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतात की, कृषीमाल विक्रीचे व्यवस्थापन हेच शेतकऱ्याचे उत्पन्नामधील महत्वाचा टप्पा आहे.
भाजीपाल्यालाही चांगली मागणी
संभाजी खैरनार यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे ते भाजीपाला पिके जशी की, शेवगा, टमाटे, मिरची, कोबी, पालेभाज्या, कारले, दोडके, गिलके इ. पिके घेतात. त्यांचा हा भाजीपाला गुजरात राज्यातील सुरत, भरूच, अहमदाबाद, बडोदा, सह विविध भागातल्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. यामधून देखील त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतीला भेट देणार्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते नेहमी म्हणतात की, भाजीपाला पीक हे मार्च ते जुलै महिन्यात उत्पादन देईल या नियोजनानुसार लागवड करावी. कारण या काळात अनेक भागात पाण्याची टंचाई असते, उन्हाळा असतो म्हणून अनेक भागात व लहान-मोठे शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करीत नाहीत, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मालाची आवक कमी असते. परिणामी आपल्या मालाला भाव चांगला मिळतो. यामुळे आपले एकूण उत्पन्न वाढते व कमी वेळेत अधिक पैसा मिळत असतो. म्हणून भाजीपाला पिकांसंदर्भात अचुक व योग्य नियोजन करणे आपल्यासाठी आवश्यक असल्याचे खैरनार यांचे म्हणणे आहे.
अनेकजण शेतीला देतात भेट
संभाजी खैरनार यांच्या शेतातील विविध प्रयोग पाहण्यासाठी परिसरासह जिल्हयातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत असतात. त्यांनी शेतातच घर बांधले असून येथे भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शनही करत असतात. कृषी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीही त्यांच्या शेतीला भेट दिली आहे. त्यांनी स्वअनुभवातून आपली शेती विकसीत केली आहे. शासनाचे कोणतेही अनुदान घेतलेले नाही. त्यामुळे या यशामागे त्यांचे प्रामाणिक कष्ट आहेत.
टोमॅटो पीकातून सात लाखांचे उत्पन्न
संभाजी खैरनार हे आपल्या शेतामध्ये टोमॅटो या फळपिकाचे दरवर्षी लागवड करीत असतात. या पिकाचे योग्य काळात लागवड व व्यवस्थापन तसेच विक्रीचे नियोजन, व्यापारी- विक्रेते यांच्याशी असलेला संपर्क यामुळे याही पिकामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळत असते. या वर्षीही त्यांनी दीड एकरात टोमॅटोची लागवड केली होती. त्यांनी ठिबक मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटो पीक घेतले. यातून त्यांना सुमारे 40 ते 50 टन टोमॅटोचे उत्पादन झाले. योगायोगाने जुलै महिन्यात टोमॅटोला रेकॉर्डब्रेक दर मिळाल्याने यातून खैरनार यांना साडेसहा ते सात लाखांचे उत्पन्न मिळाले. आता त्यांनी पुन्हा नव्याने चार एकरात टोमॅटोची लागवड केली आहे.
शेतीला पशुपालनाची दिली जोड
संभाजी खैरनार यांना सुरवातीपासून गोवंशीय जनांवरांशी लगाव राहीला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपुर्वीच पाच गायी विकत घेतल्या. गुजरात राज्यातील ब्यारा येथून प्रत्येकी 70 हजार रुपये याप्रमाणे गायी आणल्या. या गायींपासून प्रत्येकी 10 ते 12 लिटर दुधाचे उत्पन्न मिळत असल्याचेही श्री.खैरनार सांगतात. त्यांच्याकडे बैलही असून गायी व बैलांपासून मिळणार्या शेणखताचा वापर जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी करतात. शिवाय येत्या काळात 100 गायी घेण्याचे आपले उददीष्टय असल्याचे खैरनार यांनी सांगितले.
आदर्श शेतकरी म्हणून ओळख
शेतामध्ये घेत असलेले विविध फळपीके, भाजीपाला पीके, त्यांचे उत्पादन, व्यवस्थापन व मिळणारे उत्पन्न यामुळे खैरनार यांची दहिवेल परिसरात व भोनगावामध्ये आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. खैरनार यांनी आपल्या शेतामध्ये सीताफाची लागवड केली व त्याचे योग्य व अचूक व्यवस्थापन यामुळे त्यांना एकाच वर्षी सुमारे २० लाखाचे उत्पन्न मिळाले आणि त्यांनी तिथूनच भरारी घेतल्याचे दिसून येते.
राजकारणासह समाजकार्याची आवड
संभाजी खैरनार हे शेतीसोबतच राजकारण व समाजकार्यातही सक्रीय आहेत. सन 2006-10 या कालावधीत ते उपसरपंच होते. या कार्यकाळात त्यांनी गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी भरीव कार्य केले. त्यांनी आपल्या स्वमालकीच्या जागेवर विहीर खोदून सदर विहीरीच्या पाण्यावरून पाईपलाई करून गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली. यासह गावात विविध विकासकामांना चालना दिली. समाजकार्यातही ते आघाडीवर असतात. सन २००५ मध्ये त्यांनी पारायण सप्ताहाच्या सांगता प्रसंगी संपूर्ण गावाला अन्नदान केले होते. शिवाय गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, कानबाई उत्सव यासह विविध महामानवांच्या जयंती व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. गावामध्ये अनेक गरजू व्यक्तींना, गोरगरिब जनतेला आपल्या परीने ते मदत करीत असतात.
परिवाराची भक्कम साथ
संभाजी खैरनार यांना शेतीकामात आपल्या परिवाराची भक्कम साथ मिळत आहे. पत्नी वैशाली, लहान मुलगा योगीराज, भाउ वसंत परबत खैरनार तसेच पुतणे यांची शेतीकामात मोठी मदत होत असल्याचे श्री.खैरनार सांगतात. परिवाराची भक्कम साथ असेल तर माणुस कोणत्याही संकटावर सहज मात करु शकतो, असे श्री.खैरनार आवर्जून सांगतात. या यशोशिखरावर पोहचविण्यात पत्नीसह परिवाराचा मोलाचा वाटा असल्याचे ते प्रांजळपणे सांगतात. विशेष म्हणजे त्यांनी सीताफळातून विक्रमी उत्पादन घेतल्याबद़दल दै.लोकमतच्या वतीने त्यांना ‘गौरव कर्तूत्वाचा’ हा पुरस्कार देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले.
विविध प्रयोगांमुळे होतो फायदा
शेतीचे उत्तम नियोजन व तांत्रिक पद्धतीचा वापर केल्यास निश्चितच चांगला उत्पादन घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोगही करायला हवेत. यातून शेतकऱ्यांना फायदाच होईल. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने बाजारभावाची हमी दिल्यास तरुण वर्गही शेतीकडे वळेल.
-संभाजी परबत खैरनार
प्रयोगशील शेतकरी
भोनगाव, ता.साक्री, जि.धुळे
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇