जळगाव : पावसाला यंदा उशिराने सुरुवात झाली, त्यामुळे कापूस लागवडीला देखील उशीर झाला आहे. काही ठिकाणी कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचेही पाहावयास मिळत आहे. अशा दुहेरी संकटाच्यावेळी शेतकऱ्यांना पिकाची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी खत व्यवस्थापन तर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
कापसाची लागवड ही शक्यतो 15 ते 30 जून दरम्यान किंवा पेरणी योग्य (75 ते 100 मी.मी.) पाऊस झाल्यावर करणे योग्य असते. मात्र, यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्याचाही पंधरवडा उलटत आला आहे. तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खताचे योग्य नियोजन केल्यास होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करता येवू शकतो.
बी. टी. कपाशीमध्ये सुरुवातीच्या बहाराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. फुले व बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादनात वाढ होते. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकाची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. कोरडवाहू व बागायती बी.टी. कापूस पिकास रासायनिक खतांच्या मात्रा देण्याच्या शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत.
बीटी कापूस कोरडवाहू : 120:60:60 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर तर बीटी कापूस बागायती : 150:75:75 किलो हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर आहे. कोरडवाहू व बागायती कापूस पिकासाठी प्रतिएकर खताची मात्रा देण्यासाठी बाजारातील रासायनिक खताच्या ग्रेडच्या उपलब्धतेनुसार कोणताही एक पर्याय निवडावा. कापूस लागवड ठिबक सिंचनावर करुनही बरेच शेतकरी खते जमिनीतूनच देतात. ज्या शेतकर्यांनी कापूस ठिबक सिंचनावर लावला आहे. त्यांनी रासायनिक खते व्हेंव्युरीद्वारे ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच द्यावीत. ठिबक सिंचन संचाचा पूर्ण फायदा त्याद्वारे खते दिल्यानंतरच होतो. यासाठी आपल्या संचास व्हेंच्युरी (ठिबक संचातील पाण्यामध्ये विद्राव्य खत सोडणारे साधन) असणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांची मात्रा
ठिबक सिंचनातून खते देताना खते 100 दिवसांपर्यंत विभागून द्यावीत. किंवा स्फुरद खते पेरणीबरोबर मातीद्वारे दिली तरीही चालेल परंतु कापूस लागवड केल्यास नत्र व पालाशयुक्त खते व्हेंव्युरीद्वारेच द्यावीत.
ठिबक सिंचनाव्दारे देता येणारी विद्राव्य खते
युरिया (46:0:0), 19:19:19, मोनो पोटेंशियम फॉस्फेट (0:52:34), मोनो अमोनियम फॉस्फेट (12:61:0), पोटॅशियम नायट्रेट (13:0:45), सल्फेट ऑफ पोटॅश, युरिया फॉस्फेट (18:44:00), अमोनियम सल्फेट, कॅशियम नायट्रेट.
विद्राव्य खतांची फवारणी : कापूस पिकामध्ये विद्राव्य खताची फवारणीमुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते. कापूस लागवडीनंतर महिनाभरातील काळात कापूस पिकाची वाढ उत्तम होण्याकरीता 19ः19ः19 ह्या विद्राव्य खताची 45 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी. बोडांची वाढ चांगली व्हावी. ह्या करीता 0ः52ः34 ची 60 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी. बोंडे परिपक्व होताना 13ः0ः45 ची 75 ग्रॅम 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
सूक्ष्म मुलद्रव्ये
बी.टी कपाशीस मुख्य अन्नद्रव्यांच्या मात्रेबरोबरच काही सूक्ष्म मूलद्रव्यांची आवश्यकता असते. लागवडीवेळी 10ः26ः26 खताबरोबर मॅग्नेशिय सल्फेट-15 किलो, झिंक सल्फेट- 5 किलो, फेरस सल्फेट- 5 किलो व बोंटॅक्स- 2 किलो प्रती एकरी वापर करावा. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.