Monsoon Update… गेले काही दिवस राज्यात सर्वत्र भयंकर उकाडा आहे. सर्वांनाच आता मान्सूनची प्रतीक्षा आहे. मान्सून राज्यात कधी दाखल होणार ते जाणून घ्या. मान्सूनच्या वाटचालीची नेमकी स्थिती आणि देशभरात, आपल्या भागात मान्सून कधी दाखल होणार, याचा अंदाजही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दक्षिण-पश्चिम म्हणजे नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) मंगळवारी बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात सरकले. अंदमान-निकोबार परिसरातही मान्सून सक्रीय होत असल्याची चिन्हे काल दिसू लागली होती. ही स्थिती मान्सूनच्या आगेकूचसाठी अतिशय अनुकूल मानली जाते.
2-3 दिवसातच देशात मान्सून सक्रीय
मान्सून येत्या 2-3 दिवसातच देशात सक्रीय होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. येत्या 2-3 दिवसात मालदीव बेटे, कमोरीयन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत असल्याचे भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 5 दिवसात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये
एकूणच बंगालच्या उपसागराच्या भागात तसेच संपूर्ण अंदमान निकोबार बेटावर सध्या मान्सून पोहोचला आहे. खरेतर यंदा 19 मे रोजी म्हणजे दोन दिवस आधीच मान्सूनने दक्षिण बंगाल उपसागर, निकोबार बेटे गाठून दक्षिण अंदमानात धडक मारली होती. मात्र, पुढे त्याचा प्रवास थंडावला होता. अरबी समुद्रात आता पुन्हा एकदा मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, अशी जवळपास निश्चित चिन्हे दिसत आहेत.
मान्सून 16 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र
मान्सूनचे वारे कमकुवत झाल्याने पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला होता. त्यामुळे केरळमध्ये साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असलेला मान्सून यंदा 4-5 दिवस उशिराने दाखल होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 4 जूनपर्यंत केरळात दाखल झाल्यानंतर कोकण व मुंबईत साधारणत: 8 ते 10 जूनपर्यंत पोहोचू शकेल. 16 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून पोहोचेल.
उत्तर भारतात उष्णतेची लाट नाही
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळातून ओलावा येत राहिल्याने देशात अनेक भागात पाऊस पडत राहिला. 23 मे पासून वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील सक्रिय झाले. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ही व्यवस्था कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिना संपायाला येऊनही यंदा उत्तर भारतातील कोणत्याही राज्यात उष्णतेची तीव्र लाट नव्हती.