मुंबई : कांदा हा लोकांच्या दररोजच्या आहारातील एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कांदा हा प्रमुख पिकांमध्ये गणला जातो व शेतकऱ्यांकडून त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने तसेच कांदा हा नाशवंत असल्याने शेतकरी त्याची कवडीमोल भावात विक्री करतात. चांगला भाव मिळेल या प्रतीक्षेत काही शेतकरी कांद्याची साठवणूक करतात तर काहींना आर्थिक परिस्थिती अभावी साठवण करता येत नाही. मात्र आता चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे… चला तर मग जाणून घेऊ या कांदा चाळ अनुदानाविषयी…
राज्यात साधारणत: 136.68 लाख मे. टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कांदा नेहमी चर्चेचा विषय असतो. भाव मिळत नसल्याने अनेकदा शेतकरी मालाची साठवण करतात. ज्या मोठ्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ उपलब्ध आहे, असेच शेतकरी साठवणूक करतात. मात्र, लहान शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी तसेच चाळ उभारण्यासाठी पैसा राहत नसल्याने त्यांना आपला माल कमी दारात विकावा लागतो. लहान शेतकऱ्यांना देखील कांदे साठवण्यासाठी गोदाम म्हणजेच कांदा चाळ उभारता यावी, यासाठी सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 1 लाख 60 हजार 367 अनुदान देण्यात येणार आहे. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना देखील सामुदायिक लाभ घेता येणार आहे.
असे मिळणार अनुदान
कांदाचाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार 367 रुपये अनुदान देण्यात येईल. ते पुढील पद्धतीने देण्यात येईल. अकुशल 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च, कुशल 40% च्या मर्यादित 64 हजार 147 रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण 1 लाख 60 हजार 367 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. तसेच उर्वरित रक्कम 2 लाख 98 हजार 220 इतका निधी हा लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
सामुदायिक लाभ घेता येणार
कांद्याची योग्य प्रकारे साठवण न केल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे कांदाचाळ उभारून घेणे खूप महत्त्वाचे आहे. गटशेती आणि महिला बचत गट यांना सामुदायिक कांदाचाळ अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. कांदा साठवण करण्याच्या गोदामासाठी रुंदी 3.90 मी. लांबी12.00 मी. एकूण उंची 2.95 मी. (जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमाण राहील. कांद्याचे उत्पादन राज्यात साधारण 136.68 लाख मे. टन घेतले जाते.