मुंबई : काळा पेरू हा औषधी गुणांचा खजिना आहे. यात अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स, विटॅमिन्स जास्त असतात. या काळ्या पेरूचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. जी सामान्य फळांपेक्षा खूप जास्त असते. या काळ्या पेरूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. काळ्या पेरूच्या लागवडीसाठी जमीन कशी हवी?, लागवड कशी करावी ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पेरू खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. तसेच काळ्या रंगाच्या पेरूमध्ये जीवनसत्त्वे, पोषकतत्वे आढळतात. शेतकरी या काळ्या रंगाच्या पेरूची लागवड करून चांगले उत्पादन घेऊ शकतात. विशेष म्हणजे या पेरूचे दरही जास्त आहे.
काळ्या पेरूच्या लागवडीसाठी अशी हवी जमीन
शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला काळ्या पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जमिनीत काळ्या पेरूची लागवड करू शकतात. मात्र, चिकणमाती काळ्या पेरूच्या लागवडीसाठी चांगली मानली जाते. काळे पेरू बाहेरून दिसायला जरी काळे आहे तरी आतील गर हा लाल असतो. या काळ्या पेरूच्या झाडाची पानेही लाल असतात. सध्या काळ्या पेरूची लागवड ही हिमाचल प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
काळ्या पेरूची अशी करा लागवड
काळ्या पेरूच्या लागवडीसाठी सर्वात आधी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करावा. यामुळे उत्पादनात वाढ होईल. तसेच पीएच मूल्य हे ७ ते ८ असायला हवे. जर काळ्या पेरूची लागवड शेतकऱ्यांनी एक हेक्टरमध्ये केली तर लाखो रुपयांचा नफा होऊ शकतो. काळ्या पेरूची लागवड थंडीच्या हंगामात करणे योग्य आहे. थंडीच्या हंगामात याची लागवड केल्यास झाडाची वाढ चांगली आणि झपाट्याने होते.
काळ्या पेरूमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असून यामुळे काळ्या पेरूच्या झाडावर किडींचे आक्रमणही कमी होते. तसेच ज्या शेतात काळ्या पेरूची रोपे लावली जातात. त्या शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असायला हवी. काळ्या पेरूची लागवड केल्यानंतर ३ वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते. एका पेरूचे वजन 100 ग्रॅम किंवा त्याहून अधिक असू शकते.