भूषण वडनेरे
धुळे : जिल्ह्यात साक्री तालुक्यातील कासारे येथील सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर गुलाबराव काकुस्ते (वय 69) यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीने शेतीत क्रांती केली आहे. त्यांच्याकडे 48 एकर जमीन असून जमिनीची प्रत अतिशय साधारण असताना सेंद्रीय खत, शेणखत टाकून जमिनीची सुपिकता वाढविली. इतकेच नव्हेतर ठिबक सिंचन व सेंद्रीय खताचा वापर करुन त्यांनी एकरी तब्बल 108 टन उसाचे उत्पादन घेवून नवा विक्रम रचला. याबद्दल त्यांना साखर परिषदेत 5 जुलै 2022 रोजी मा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुणे येथे ऊस भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना ऊस उत्पादनातून एकरी तब्बल 2 लाख 15 हजारांचा नफा झाला. याशिवाय ते कापुस, पपई, टरबुज, टमाटे व जनावरांसाठी चार्याचे उत्पादनही घेतात.
कासारे ता.साक्री येथील सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर गुलाबराव दशरथ काकुस्ते (69) यांची गावातच 48 एकर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांचे वडील कै. दशरथ सदा पाटील हे शेतीसोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. मात्र, शेती करत असताना त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू दिले नाही. त्यांना तीन मुले असून एक मुलगा डेप्युटी इंजिनियर, दुसरा मुलगा डॉक्टर तर तिसरा मुलगा प्राध्यापक आहे. वडीलांकडून वारसा घेत या परिवाराने मातीशी नाळ जोडून ठेवली.
डेप्युटी इंजिनिअर असलेले गुलाबराव काकुस्ते यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःला शेतीत वाहून घेतले आहे. वडीलोपार्जीत असलेली शेतजमिन ही अतिशय साधारण प्रतीची असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत होता. पण वाळूचे कण रगडीता तेलही गळे या म्हणीप्रमाणे गुलाबराव काकुस्ते यांनी जमिनीचा पोत सुधारण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांना आपल्या परिवाराची मोठी झाली. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी शेतीत गाळ टाकून ताग सारखे सेंद्रीय खत, शेणखत टाकून जमिनीची सुपिकता वाढविली. परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. आज जमिनीची सुपिकता इतकी वाढली आहे की ते आता विक्रमी उत्पादन घेवू लागले आहेत.
ऊस उत्पादनात अग्रेसर
श्री.काकुस्ते हे वडीलोपार्जीत परंपरागत उसाचे उत्पादन घेत आहेत. परंतु, त्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याने उसाचे विक्रमी उत्पादन होत आहे. गेल्यावर्षी त्यांनी सटाणा (ता.मालेगांव, जि.नाशिक) येथील द्वारकाधिश साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाने 48 पैकी 20 एकर क्षेत्रात ऊस लावला होता. ठिबक सिंचन व सेंद्रीय खताचा वापर करून त्यांनी उसाचे एकरी तब्बल 108 टन उत्पादन घेतले. त्यांनी उसाचे 265 हे वाण लावले होते. विशेष म्हणजे त्यांच्या शेतातून दरवर्षी 1000 ते 1200 टन उस द्वारकाधीशला जातो.
ऊसातून एकरी दोन लाखांचा नफा
श्री. काकुस्ते यांना ऊस उत्पादनाचा सुरवातीपासूनच दांडगा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या उत्पादनात वाढच होत आहे. गेल्या वर्षी त्यांनी 20 एकरात उसाची लागवड केली होती. त्यातून त्यांनी प्रती एकर 108.60 मेट्रीक टन इतके उत्पादन काढले. या उसाला प्रति मेट्रीक टन 2500 रुपये भाव मिळाला. म्हणजेच एकरी 2 लाख 71 हजार 500 रुपयांचे उत्पादन झाले. त्यातून 56 हजार रुपये खर्च वजा जाता एकरी 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा निव्वळ नफा झाला. विशेष म्हणजेच ठिबक सिंचन व सेंद्रीय खतांचा वापर करुन ते उसाचे उत्पादन घेतात.
थोडक्यात महत्त्वाचे
काकुस्ते घेताहेत वडीलोपार्जीत परंपरागत ऊस पिकाचे उत्पादन
ऊस शेतीतून दोन लाखांचा मिळाला नफा
इतर पिकातूनही चांगले उत्पन्न
आधुनिक शेती करण्याचे नियोजन
श्री.काकुस्ते हे ऊसाबरोबरच इतर पिकांचीही लागवड करीत असतात. त्यात कापसाचीही दरवर्षी लागवड ठरलेली असते. गेल्यावेळी त्यांनी 15 एकरात कापसाची लागवड केली होती. त्यातून त्यांना एकरी सुमारे 15 क्विंटल कापूस निघाला. त्यास सरासरी 8 हजारांचा भाव मिळाल्याने एकरी एकूण 1 लाख 20 हजारांचे उत्पादन झाले. त्यातून एकरी खर्च 45 हजार रुपये वजा जाता एकरी 75 हजार रुपये निव्वळ नफा झाला. तर पाच एकरात पपईची लागवड करुन त्यात अडीच एकरात वेलवर्गीय असलेले टरबूज व अडीच एकरात काकडीची लागवड केली होती. म्हणजेच जागेचा पुरेपूर उपयोग करत त्यांनी पाच एकरात त्यांनी पपईसोबतच टरबूज व काकडीही लावली. यातूनही समाधानकारक उत्पन्न झाल्याचे श्री.काकुस्ते यांनी सांगितले. शिवाय शेतातच कांदाचाळ असल्याने लागवडीतूनही ते दरवर्षी चांगला नफा कमवितात.
असे आहे पाण्याचे नियोजन
श्री.काकुस्ते यांची बागायती शेतजमिन असून एकूण 48 एकर जमीनीपैकी 35 एकर जमिन ठिबक सिंचनाखाली आहे. शिवाय शासनाच्या योजनेतून शेतात 60 बाय 75 फुट आकाराचे शेततळे केले असून त्यात पाण्याची सोय केली आहे. शिवाय शेतीला चार विहिरींद्वारे पाणी पुरवठा होतो. पाण्याची मोठया प्रमाणात उपलब्धता असली तरी ठिंबक सिंचनाचा वापर करुन पाण्याच्या कमी वापरावर त्यांचा भर असतो. तसेच कांदाचाळ अनुदान योजनेचा लाभ घेत शेतात दोन कांदाचाळी केल्या आहेत. तसेच शेतमाल साठविण्यासाठी दोन गोदामही केले आहेत. त्यामुळे शेतीमालाची नुकसान होत नाही. व त्यास भावही चांगला मिळत असल्याचे काकुस्ते सांगतात.
सात जणांना कायमस्वरुपी रोजगार
काकुस्ते यांच्याकडे असलेल्या 48 एकरावरील पिकांची व्यवस्था, जनावरांची देखभाल करण्यासाठी 7 गडी कायमस्वरुपी कामावर असतात. त्यांच्या माध्यमातून सात जणांना रोजगार मिळून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. या गाड्यांसाठी त्यांनी शेतातच निवासाची सोय केली आहे. असे असले तरी श्री.काकुस्ते हे स्वत: न चुकता शेतात हजेरी लावतात. तसेच पिकांच्या व्यवस्थापनाची दैनंदिन कामे ठरवून देत असतात. यासाठी काकुस्ते यांना आपल्या कुटुंबियांची भक्कम साथ मिळत आहे.
एकत्र कुटूंबामुळे शेती सुकर
आजकाल मजूर मिळणे कठीण झाल्याने शेती करणे अवघड असल्याचे आपण सर्वत्र ऐकत असतो. परंतु, काकुस्ते हे यास अपवाद ठरतात. कारण आजही काकुस्ते यांचे एकत्र कुटुंब असून भावांसह पुतण्या व परिवारातील सदस्यांची मोठी मदत होत असल्याचे काकुस्ते सांगतात. गुलाबराव काकुस्ते हे कासारे येथील माजी सरपंच कै. दशरथ सदा काकुस्ते यांचे सुपूत्र तर डॉ.संभाजी काकुस्ते व साक्री पं.स.चे माजी सदस्य तथा प्रा.युवराज काकुस्ते यांचे बंधू तर पोलीस पाटील दीपक काकुस्ते यांचे काका आहेत. पुतणे दीपक काकुस्ते हे कासारे गावाचे पोलीस पाटील आहेत. ते डीएड, बीए व शेतकी पदवीकाधारक असून नोकरीपेक्षा त्यांचाही शेतीकडेच अधिक कल आहे. विशेष म्हणजे त्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून श्री.काकुस्ते यांच्या परिवाराची ख्याती आहे.
राज्यस्तरीय साखर परिषदेत गौरव
श्री. काकुस्ते यांनी राज्यात सन 2020-21 या वर्षात मध्य विभागात पुर्व हंगामात उसाचे हेक्टरी 270 टन विक्रमी उत्पादन घेतले. याची दखल घेत त्यांना पुणे येथील साखर परिषदेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गत 5 जून रोजी राज्यस्तरीय परिषदेत खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे तत्कालिन आरोग्यमंत्री राजेश टोपे, तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांना राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाल्यामुळे साक्री तालुक्याच्या नावलौकीकात भर पडली. शिवाय इतर शेतकर्यांनाही प्रेरणा मिळाली.
कुटुंबियांची साथ मोलाची!
तीन भावांचे एकत्र कुटूंब असल्यामुळे शेतीची कामे करणे सोपे व सोईस्कर जाते. एकमेकाला सोबत घेवून शेती क्षेत्रात कशी जास्तीत जास्तीत-जास्त प्रगती करता येईल, यावर भर दिला जातो. उच्च तंत्रज्ञानाचे शेती अवजारे वापरुन तसेच भविष्यात सेंद्रीय शेतीवर भर देवून उत्पादन अधिकाधिक कसे वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच कृषी विदयापीठाकडून मार्गदर्शन घेवून उत्पदन दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– गुलाबराव काकुस्ते,
प्रगतशील शेतकरी,
कासारे, ता.साक्री, जि. धुळे