मुंबई : अधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकर्यांकडून पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून जमिनीची पोत खराब होत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. जमिनीची पोत सुधारावी व रसायनमुक्त भाजीपाला, अन्न, धान्य मिळावे यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. जमिनीची सुपीकता वाढावी ह्यासाठी सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धतीसह विविध माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
रासायनिक खतांच्या वापरामुळे शेत जमिन तर खराब होतच आहे, शिवाय नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, अन्न, धान्य खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांकडून सेंद्रिय भाजीपाला, अन्न, धान्याची मागणी पाहता शेतकर्यांकडून देखील सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर दिला जात आहे. सेंद्रिय शेती करतांना सर्वात महात्वाचा घटक असतो तो गांडूळ किंवा शेण खत. आपल्याकडील बहुतांश शेतकर्यांकडे गाय, म्हैस, बैल यासारखी जनावरे उपलब्ध असल्याने शेण सहज उपलब्ध होत असते. या शेणाचा वापर करुन शेतकरी गांडूळ खताची निर्मिती करून जमिनीची सुपिकता वाढवू शकतो.
PMFME योजनेअंतर्गत मिळवा एक कोटींपर्यंत कर्ज – संचालक सुभाष नागरे
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/se5VHhhNHKU
गांडूळ हा जमिनीत राहणारा जीव असल्याने तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो व ते खाल्ल्यानंतर शरीरासाठी आवश्यक असलेले घटक सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीराच्या बाहेर टाकतो. त्यालाच गांडूळ खत असे म्हटले जाते. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते व परिणामी जमिनीची सुपीकता वाढते. भारतात गांडूळांच्या 300 हून अधिक प्रजाती आढळून येतात. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या प्रजातींचे गांडूळ महत्त्वाचे असतात. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.
अशा आहेत गांडूळ खत करण्याच्या पद्धती
गांडूळ खत तयार करण्यासाठी ढीग आणि खड्डा या दोन पद्धतींचा वापर करता येतो. या दोन्ही पद्धतींमध्ये खत करतांना कृत्रिम सावलीची गरज असते. सूर्यप्रकाश व पावसापासून खताचे संरक्षण करण्यासाठी (दोन ढिगांसाठी) 4.25 मीटरची शेड तयार करावी. शेड तयार करीत असतांना शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असणे गरजेचे असते. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी.
ढीग पद्धत
ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याने जमीन ओली करून घ्यावी. त्यानंतर गवत, नारळाचा काथ्या, भाताचे तूस यासारखे लवकर कुजणार्या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा व हा थर पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. 100 किलो सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7 हजार प्रौढ गांडुळे सोडावीत.
दुसर्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. कुजणार्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 अंश सेल्सियस दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
खड्डा पद्धत
खड्डा पद्धतीमध्ये गांडूळ खत तयार करण्यासाठी सिमेंटचे 3 मीटर लांब, 2 मीटर रूंद आणि 60 सें.मी. खोली असलेल्या खड्ड्यांची आवश्यकता असते. खड्डा तयार केल्यानंतर खड्ड्यांच्या तळाशी गवत, भाताचे तूस, नारळाचा काथ्या, गव्हाचा कोंडा टाकावा, त्यानंतर 3 ते 5 सें.मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर 7 हजार पौढ गांडुळे (100 किलो गांडूळखतसाठी) सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील हवा खेळती ठेवावी. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर हाताने सैल करावेत. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. या पद्धतीत गांडुळ खत तयार होण्यासाठी साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.
गांडूळ आणि खत वेगळं करण्याची वेळ
खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले आहे, असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. त्यानंतर वरचा थर थोडा कोरडा झाला की ते कोरडे झालेले खत गांडुळांसकट बाहेर काढावे. तत्पूर्वी उन्हात ताडपत्री किंवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत. असे केल्यास उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील त्यामुळे गांडूळे आणि गांडुळ खत वेगळे करणे सोपे होईल. ढिगाच्यावरचे खत वेगळे केेल्यानंतर 3 ते 4 तासात सर्व गांडुळे पून्हा खत तयार करण्यासाठी खड्ड्यात सोडावीत. खत आणि गांडूळे वेगळी करतांना टिकाव, खुरपे यासारख्या साधनांचा वापर करू नये. या अवजारांमुळे गांडूळांना इजा होवून ते मरण्याची शक्यता असते. हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात हे खत शेतात टाकून जमिनीची सुपिकता वाढविता येवू शकते.