दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या तंत्र प्रात्यक्षिक व शिवार पाहणी उपक्रमात ठिबक सिंचन पद्धतीचे तंत्रशुद्ध आणि अचूक व्यवस्थापन समजून घेणे आवश्यक आहे. सन १९८७\८८ पासून महाराष्ट्रातला शेतकरी ठिबक सिंचन संच वापरत आहे. पण या तंत्रात झालेले नवे बदल आणि स्वयंचलित सुविधा स्वीकारण्यापासून आजही शेतकरी लांब आहे.
काही शेतकरी ठिबक सिंचनाचे अर्धवट तंत्र उभे करून त्यात जुगाडची पद्धत वापरत आहेत. काही शेतकरी विद्राव्य खतांचे द्रावण २०० लिटरच्या टाकीत तयार करून त्याची नळी थेट सक्शन पाईपलाईन जोडतात. हा देशी जुगाड आहे. त्यामुळे ना तंत्राचा लाभ पिकाच्या निकोप वाढ वा उत्पादन वाढीसाठी होतो आहे. पिकांच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेत योग्य प्रमाणात पाणी देऊन पुरेसा वाफसा असणे, मुळांना हवा मिळणे आणि अचूक प्रमाणात ठरलेल्या वेळी पाण्यात विरघळणारी खते देणे यासाठी ठिबक सिंचन तंत्र वापरले जाते. याविषयी तंत्रशुद्ध माहिती व त्याची अनेक प्रात्यक्षिके येथे पाहाता येतात.
पारंंपारीक सिंचन पद्धतीमध्ये ठराविक दिवसानंतर पाटाचे पाणी किंवा विहिरीतील पाणी मोकाट पद्धतीने पूर्वी दिले जात असे. साधारणतः १०\१५ दिवसांचे रोटेशन होते. पाणी भरल्यानंतर अगोदर चार दिवस पीके चिखलात असत. नंतर चार दिवस योग्य वाफसा असे. पुढील चार दिवस पाणी मुळांच्या खाली जात असे. याचा परिणाम उत्पादन घेण्यात होत असे. ठिबक सिंचनमुळे स्थिती बदलली. पाणी वेळेवर, गरजेच्या प्रमाणात दिले जाते. चिखल न होता सतत वाफसा असतो. ठिबक सिंचन केवळ पुरेसे व वेळेवर पाणीच नाही देत तर त्या सोबत पाण्यात विरघळणारी खते, अन्नद्रव्ये थेट मुळाजवळ देण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅन्क चा वापर करणे आवश्यक आहे.
पिकाला लागणारी खते त्यांच्या वाढीच्या अवस्थेपासून द्यायला हवीत. पीक प्रारंभी वाढते तेव्हा नत्र पुरेसे हवे, स्फुरद व पालाश कमी लागते. पिकाला फुले लागून फळ धरणे सुरू होते तेव्हा स्फुरद जास्त हवे. नत्र व पालाश कमी हवे. जेव्हा पिक परिपक्व अवस्थेत असते तेव्हा पालाश जास्त हवे. नत्र कमी व स्फुरद नकोच हवे. अशा या तीन अवस्थांमध्ये पहिल्या टप्प्यात १९:१९:१९ + युरिया हवा, दुसर्या टप्प्यात १३:४०:१३ हवे. तिसऱ्या टप्प्यात १३:०:४५ हवे. ही खते ठिबक सिंचनातून वेळीच व प्रमाणात दिली पाहिजेत.. मात्र जेव्हा शेतकरी जुगाड करीत हाताने खत फेकतो तेव्हा खत मुळाजवळ जात नाही. तेथे स्फुरद व पालाश साचून नंतर क्षार तयार होतात. ते पिकाची हानी करतात.
ठिबक मधून विद्राव्य खत हे नेहमी दुपारी द्यावे. सकाळी पाणी थंड असते. त्यात द्रवरूप खते विरघळत नाही. शिवाय खत देताना जमिनीचे तापमान २२\३० अंश सेल्सिअस हवे. ते दुपारी असते. पिकांची पांढरीमुळे तेव्हा अधिक चांगले शोषण करतात. खत देतांना वेळ निर्धारित हवी. तेवढ्या वेळात मुळाजवळ खते दिले गेले की ठिबक सिंचन संच बंद करावा. तसे केले तर खत मूळांपेक्षा खाली जात नाही. याच लाभासाठी शेतकर्यांनी संपूर्णतः स्वयंचलीत ठिबक सिंचन संच वापरावेत. यात वेळेवर, गरजेनुसार,सेंसर चा अचुुक पाणी दिले जाते. अशा पद्धतीने मातीचा पोत बिघडत नाही. शेतजमिनीत PH व EC चे प्रमाणात नियंत्रणात राहते. अशा प्रकारे ठिबक सिंचन द्वारे पाणी व खताचे अचूक व्यवस्थापन करता येते.
ता. क. – ‘जैन’ च्या कृषी संशोधन शिवार पाहणीसाठी शेतकर्यांनी आपल्या गाव-शहरातील कृषी वितरकाकडे संपर्क करावा. त्यांच्या माध्यमातून पुढील सेवा-संधी मिळत आहेत …