नवी दिल्ली : Shenavar Chalanara Tractor… तुम्ही गायीच्या शेणापासून खत आणि रंग बनवण्याचे ऐकले असेल, पण त्याचा इंधन म्हणून वापर होताना तुम्ही कधी पाहिला नसेल. आता असा ट्रॅक्टर तयार करण्यात आला आहे, जो शेणावरती चालतो. होय ब्रिटीश कंपनी बेनामनने शेणावर चालणारा हा ट्रॅक्टर बनवला आहे. चला तर मग जाणून घेवू या ट्रॅक्टरची खासियत..
या महागाईच्या काळात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने कुठे ना कुठे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्यासाठी अधिक उत्पादन खर्च शेतकऱ्यांना लागत आहे. यामुळे यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांना फायदे होत असले तरीदेखील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी खर्चिक बाब बनत आहे. मात्र आता यावर तोडगा निघाला आहे. आता डिझेल नव्हे तर गाईच्या शेणापासून चालणारे ट्रॅक्टर बनवले आहे.
ही आहे या ट्रॅक्टरची खासियत
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी शेणापासून चालणारा ट्रॅक्टर बनवला आहे. हा ट्रॅक्टर बेनामन कंपनी ने तयार केला आहे. हा 270 हॉर्स पॉवरचा मिथेनवर चालणारा ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरपेक्षा कमी ताकदवान नाही. मात्र, मिथेनवर चालणारा हा ट्रॅक्टर अतिशय कमी प्रदूषण करतो. त्यामुळे पर्यावरणालाही खूप फायदा होईल. विशेष म्हणजे डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत ते चालवण्याचा खर्चही कमी आहे. ब्रिटीश कंपनी बेनामन एका दशकाहून अधिक काळ बायोमिथेन उत्पादनावर संशोधन करत आहे.
डिझेल प्रमाणेच मिळते ड्रायव्हिंग पॉवर
100 गायी असलेल्या फार्ममध्ये बायोमिथेन उत्पादनासाठी युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटमध्ये शेण व मूत्र गोळा करण्यात आले. अशा प्रकारे बायोमिथेनची निर्मिती झाली. हे बायोमिथेन क्रायोजेनिक टाक्यांमध्ये पंप करण्यात आले. ही टाकी ट्रॅक्टरवर बसवण्यात आली होती. क्रायोजेनिक टाक्या -160 अंश तापमानात द्रव मिथेन ठेवतात. यामुळे ट्रॅक्टरला डिझेल प्रमाणेच ड्रायव्हिंग पॉवर मिळते.
शेतकऱ्यांच्या खर्चात कपात होईल
हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या अतिरिक्त खर्चातही कपात होणार आहे. अतिरिक्त खर्चात कपात केल्यामुळे, शेतकरी उर्वरित रक्कम पिकांना वाढवण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे उत्पादनातही वाढ होऊन शेतकऱ्यांचा नफाही वाढणार आहे. ट्रॅक्टरच्या प्री-प्रॉडक्शन मॉडेलची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एक वर्षासाठी चाचणी घेण्यात आली. दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील कॉर्नवॉल काउंटीमधील एका शेतातील चाचणी दरम्यान, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन केवळ एका वर्षात 2,500 मेट्रिक टनांवरून 500 मेट्रिक टनांपर्यंत कमी करण्यात आले.