जळगाव : Maha Drone… शेती करतांना शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अधिक चांगले उत्पादन यावे, पिकांवर रोगराई, किड पडू नये म्हणून फवारणीसारखी महत्वाची कामे शेतकर्यांना करावी लागतात. फवारणीचे काम वेळखाऊ तर आहेच शिवाय शेतकर्यांसाठी धोकेदायकही आहे. बर्याचदा शेतकर्यांना फवारणी करतांना विषबाधा होते. काही घटनांमध्ये तर शेतकर्यांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. शेतकर्यांना होणारा हा त्रास कमी व्हावा, श्रमाची आणि वेळेची बचत व्हावी, म्हणून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आशिष राजपूत व रजनी राजपूत या भाऊ, बहिणीने महाड्रोनची निर्मिती केली असून हा महाड्रोन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
शेती क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत आहेत. सुशिक्षित आणि तरुण शेतकर्यांची संख्या वाढत असल्याने भविष्यात शेतीला आणखी चांगले दिवस येतील, यात काही शंका नाही. शेतीला अधिक समृध्द बनविण्यासाठी जसा शेतकरी मेहनत घेत आहे, तशीच मेहनत शेतकरी पुत्र देखील घेतांना दिसत आहेत. शेतात राबत असतांना श्रम आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्नात ते दिसून येत आहेत. असाच एक प्रयत्न प्रताप लालचंद राजपूत (महेर) यांचा मुलगा आशिष राजपूत व रजनी धनराज राजपूत यांनी केला असून यात त्यांना मोठे यश देखील आले आहे.
आशिष राजपूत यांचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर तर रजनी राजपूत यांचे कॉम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण घेतले आहे. या भाऊ बहिणीने उच्च शिक्षणाच्या जोरावर शेतात औषध फवारणी करण्यासाठी महाड्रोन तयार केला आहे. या ड्रोनच्या सहाय्याने एक एकर क्षेत्रावरील फवारणी केवळ आठ ते दहा मिनिटात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या भाऊ, बहिणीने तयार केलेल्या महाड्रोनच्या संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे.
अशी सुचली ड्रोन कल्पना
आशिष राजपूत यांनी याविषयी बोलतांना सांगितले की, लग्नसमारंभात व्हिडिओ शुटिंगसाठी वापरण्यात येणार्या ड्रोनचा वापर पाहूनच मला शेतीसाठी महाड्रोन तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यानंतर नातेवाइकांच्या मदतीने महाड्रोन तयार करण्यासाठी आवश्यक सुटे पार्ट जमवून या ड्रोनची निर्मिती केली. या अकरा लिटर क्षमतेची टाकी बसवण्यात आली आहे. या महाड्रोनला ऑपरेट करणे देखील सोपे आहे. आशिष यांच्या मते हा महाड्रोन अवघ्या आठ ते दहा मिनिटात एक एकर क्षेत्रात फवारणी करण्यास सक्षम आहे.
साडे तीन लाखांचा खर्च
आशिष आणि रजनी राजपूत या भाऊ, बहिणीला महाड्रोन तयार करण्यासाठी सुमारे 3 लाख पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. भविष्यात या पेक्षाही स्वस्त ड्रोन बनवण्याचा मानस आशिष व रजनी यांचा आहे. यासाठी संशोधन देखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे निश्चितच भविष्यात या भाऊ बहिण यांनी तयार केलेल्या ड्रोनचा शेतकर्यांना फायदा होणार आहे.
औषधी व पाण्याची बचत
महाड्रोन हताळायला अत्यंत सोपा असल्याने शेतकर्यांना केळी, ऊस, कपाशी यासह इतर पिकांवर सहज औषधी फवारणी करता येणार आहे. यामुळे शेतकर्यांचा वेळ, पैसा, औषधी आणि पाण्याची मोठी बचत होणार आहे. महाड्रोनच्या सहाय्याने एक एकर शेतासाठी केवळ 11 लिटरमध्ये फवारणी होत असल्याने हा ड्रोन शेतकर्यांसाठी वरदान ठरणार आहे.
विषबाधेपासून होणार सुटका
शेतीची बहुतांश कामे ही आजही मजुरांवर अवलंबून आहेत. मात्र, शेतमजूर मिळणे मोठे जिकिरीचे झाले असल्याने कामे खोळंबतात. परिणामी शेतकर्यांना शेतकर्यांना स्वतः ही काम करावी लागतात. अनेकदा फवारणी दरम्यान विषबाधा होऊन शेतकर्यांना व शेत मजुरांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या भाऊ, बहिणीने यांनी आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या महा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी दरम्यान होणार्या विषबाधेपासून शेतकर्यांची सुटका होणार आहे. तसेच या कृषी महाड्रोनमुळे मजूर टंचाई व वेळेची देखील बचत होणार आहे.