जळगाव : Chunkhadiyukt Jamin Upay… जमिनीचे व्यवस्थापन हे तिच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांवर अवलंबून असते. जमिनीत विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असणे, जमीन चोपण असणे (सामू जास्त असणे), जमिनीत पाण्याचा निचरा न होणे, जमीन दलदलीची असणे, जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असणे, जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असणे, अशा कारणांमुळे पिकांच्या वाढीस व अन्नद्रव्य पुरवठा प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. चला तर मग जाणून घेवू या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्म, चुनखडीचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम, व्यवस्थापन आणि उपाय…
महाराष्ट्र राज्यात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी मोठया प्रमाणात आढळतात. जमिनीत मुक्त चुन्याचे दोन प्रकार आढळून येतात. एक वेड्यावाकड्या खड्यांच्या स्वरुपात आढळून येते आणि दुसरा प्रकार पावडर स्वरुपात मातीत आढळून येतो म्हणून अशा जमिनी पांढऱ्या, भुरकट रंगाच्या दिसून येतात. या दोन्ही चुन्याच्या प्रकारात पावडर स्वरुपात मातीत चुनखडीचे प्रमाण 10 % पेक्षा जास्त असल्यास पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतात.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
चुनखडीची जमीन काय म्हणतात?
ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम अथवा मॅग्नेशियम यांचे कार्बन सोबतची संयुगे आढळतात अशा जमिनींना चुनखडीची जमीन म्हंटले जाते. ज्या विभागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असते अशा क्षेत्रात या जमिनीत जास्त प्रमाणात आढळतात. या जमिनीचा सामू 7.5 ते 8.5 (pH 7.5 to 8.5) च्या दरम्यान असतो.
चुनखडीयुक्त जमिनींचे गुणधर्म
माती परीक्षणाद्वारे मातीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त असते हेच प्रमाण 15 टक्के पेक्षा जास्त असल्यास पिकांना/फळपिकांना हानिकारक ठरते. जमिनींचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमिनीची घडण कडक बनते त्यामुळे बियाणांची उगवण क्षमता कमी होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. जमिनीतील मातीचा सामू विम्लधर्मीय (सामू 8.0 पेक्षा जास्त) तर क्षारांचे प्रमाण कमी असते. जमिनीतील मुख्य (नत्र, स्फुरद, पालाश), दुय्यम (मॅग्नेशियम, गंधक) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची (लोह, जस्त, बोरॉन) उपलब्धता कमी होते.
जास्त चुनखडीचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम
जमिनीतील चुनखडीचे शेकडा प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाले तर त्याचा पिकांना अन्नद्रव्य पुरवठ्यावर अनिष्ट परिणाम होतो व त्यामुळे पिकाची शेंडयाकडील वाढ खुंटते. जास्त चुनखडी असलेल्या जमिनीत पिकाला स्फुरद अन्नद्रव्य घेण्यास फार अडचणी येतात. त्याचप्रमाणे आवश्यक लोह क्षार सहजासहजी न मिळाल्याने पिक पिवळे पडते, यालाच आपण केवडा रोग असे म्हणतो. चुनखडी जर वरच्याच थरात असेल तर रोप लावल्यापासूनच प्रतिकूल परिणाम दिसून येतात. मधल्या किंवा खालच्या थरात चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर पिकांवर दुष्परिणाम दिसण्यास काही आठवडे किंवा महिने लागतात.
चुनखडी जर वरच्याच थरात असेल तर रोप लावल्यापासूनच प्रतिकूल परिणाम दिसून येतात. मधल्या किंवा खालच्या थरात चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर पिकांवर दुष्परिणाम दिसण्यास काही आठवडे किंवा महिने लागतात. जास्त चुनखडीमुळे जमिनीला दिलेल्या स्फुरद, पालाश, जस्त या अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन पिकांनाही अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेताना कठीण जाते व त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, मुळे जास्त खोलवर जात नाहीत. चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने वाळवी, हुमणी आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
चुनखडी जमिनीत काय काय उपाययोजना कराव्यात?
चुनखडी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावे. जसे शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा. मल्चिंग कायम करावी, जमिनीची सतत मशागत करावी आणि अन्नद्रव्य देताना क्लोराईड युक्त खतांचा वापर कमी करावा.
चुनखडीयुक्त जमिनींचे सुधारणा व्यवस्थापन
जमिनीची खोलवर नांगरट करावी. जमिनीत सेंद्रिय खते शिफारस केल्याप्रमाणे दरवर्षी टाकावेत. शेणखताचा अपुरा पुरवठा असल्यास हिरवळीची पिके (ताग/धैंचा/चवळी इ.) पेरून ती 45 ते 50 दिवसांत फुलोऱ्यात आल्यावर जमिनीत गाडावीत. चुनखडीयुक्त जमिनीत आंतरपीक म्हणून द्विदल पिकांचा समावेश करावा. रासायनिक खते पृष्ठभागावर फेकून न देता ती पेरून द्यावीत अथवा मातीआड करावीत. रासायनिक खतांचा वापर करताना माती परीक्षणाद्वारे नत्र हे अमोनियम सल्फेटद्वारे द्यावे, स्फुरद हे डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) द्वारे द्यावे आणि पालाश शक्यतो सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे पिकांना द्यावीत.
जमिनीत मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 ते 15 किलो सेंद्रिय खतात मिसळून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. उदा. लोहासाठी फेरस सल्फेट हेक्टरी 25 किलो, जस्ताच्या कमतरतेसाठी झिंक सल्फेट हेक्टरी 20 किलो, बोरॉनसाठी बोरॅक्स 5 किलो प्रती हेक्टरी किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 1 हेक्टरी 25 किलो याप्रमाणात जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून पिकांना द्यावीत. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद खतांचा वापर करताना ते सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावीत. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुपर फॉस्फेट देताना ते सरळ जमिनीत न मिसळता कंपोस्ट किंवा शेणखतात मिसळून मग ते 3 ते 4 इंच खोलीवर टाकावे.