मुंबई : रब्बीच्या हंगामात घेतल्या जाणार्या प्रमुख पिकांपैकी हरभरा (Harbhara pik) हे एक प्रमुख पिक आहे. त्यामुळे शेतकर्यांकडून गहू, मका यासारख्या पिकांसह हरभराच्या लागवडीला देखील प्राधान्य दिले जाते. सध्या रब्बी हंगाम सुरु असल्याने या हंगामातील पेरण्यांना देखील सुरुवात झाली आहे. कोणत्याही पिकाची पेरणी करतांना किंवा केल्यानंतर त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात चांगली वाढ होवू शकते. तुम्ही देखील हरभराची लागवड करण्याचा विचार करीत असाल तर हा लेख तुम्ही वाचणे गरजेचे आहे.
हरभरा पिकाच्या लागवडीकरीता मध्यम ते भारी 45 ते 60 सेमी खोल, पाण्याचा निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. हरभराच्या पिकाची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमिन भुसभुशीत असणे गरजेचे असते. त्यासाठी खरीपाचे पिक निघाल्यानंतर जमिनीची खोल नागरणी करून आणि कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर जमीन स्वच्छ करून काडीकचरा वेचून घ्यावा. खरीपामध्ये जर शेणखत दिलेले नसेल तर हेक्टरी 5 टन शेणखत द्यावे.
अशा पध्दतीने करा पेरणी
जुन्या-जाणत्या शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार हरभरा पिकाची पेरणी हस्त नक्षत्रामध्ये केल्यास उत्पादन चांगले येते, याचे प्रमुख कारण म्हणजे या कालावधीत जमिनीमध्ये असणारा ओलावा आणि वातावरण आहे. तसेच पेरणी झाल्यानंतर या काळामध्ये होणार्या परतीचा पावसाचा फायदा देखील हरभरा पिकास होतो व पिकाची वाढ चांगल्या पध्दतीने होते. बागायत क्षेत्रामध्ये ओलीताची व्यवस्था असल्यामुळे पेरणी 20 ते 30 ऑक्टोबर दरम्यान केली तरी चालते. पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर 30 सेमी व दोन रोपमधील अंतर 10 सेमी राहील अश्या पद्धतीने पेरणी करावी, जेणे करून प्रती हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखल्या जाईल.
पेरणीपूर्वी करा बीजप्रक्रिया
शेतात बियाणे टाकण्यापूर्वी देखील शेतकर्यांनी काही काळजी घेणे गरजेचे आहे. बियाण्याची उगवण चांगली व्हावी व रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतीकिलो 5 ग्राम ट्रायकोडर्मा चोळावे किंवा 2 ग्राम थायरम + 2 ग्राम कार्बेंडाझिम एकत्र करून प्रती किलो बियाण्यास चोळावे. तसेच रायझोबियम जीवाणू संवर्धनाचा उपयोग पेरणी करतेवेळी केल्यास पिकाच्या मुळावरील ग्रंथी वाढून नत्र स्थिरीकरण करणार्या जीवाणूचे प्रमाण वाढून उत्पन्नामध्ये वाढ करता येऊ शकते.
खत आणि पाण्याचे करा नियोजन
हरभर्याची लागवड केल्यानंतर उत्पादन वाढीसाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत किंवा कॅम्पोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकांची पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश प्रती हेक्टर म्हणजेच 125 किलो ऊअझ अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटेश अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फोस्पेट प्रती हेक्टरी द्यावे. संतुलित खताच्या वापरामुळे देखील उत्पन्नात चांगल्या प्रमाणात वाढ होते. पिक फुलोरा अवस्थेत असल्यावर 2 टक्के युरियाची पहिली फवारणी व 10 ते 15 दिवसानंतर दुसरी फवारणी केल्यास पिकाच्या उत्पन्नात वाढ होते.
शेत तण विरहीत ठेवणे आवश्यक
पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पहिल्या 30 ते 45 दिवसात शेत तणविरहित ठेवणे अत्यावश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी आणि 35 ते 40 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच पिकास भर देण्याचे काम सुद्धा कोळपणी मार्फत होते. खुरपणी करणे मजुराअभावी शक्य नसल्यास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर फवारणी करावी.
असे करा पाणी व्यवस्थापन
पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन वाढीसाठी जसे खत देणे महत्वाचे आहे तसेच पाणी देणे देखील महत्वाचे आहे. जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरबरा पिकास फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा पिकाची रानबांधणी करतांना दोन सर्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच लांबी सुद्धा जमिनींच्या उतारानुसार कमी ठेवावी. म्हणजे पिकास पाणी देणे सोपे होईल.
मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीमध्ये पाण्याच्या 2 पाळ्या पुरेश्या होतात. त्याकरिता पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी व 65 ते 70 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. पाणी उपलब्ध आहे म्हणून जास्त पाणी देऊ नये, असे केल्यास पिक उभाळण्याचा धोका निर्माण होवू शकतो.
घाटे अळीचे असे करा नियंत्रण
घाटे अळी हि हरबरा पिकावरील महत्वाची कीड आहे. त्यामुळे खरीपाच्या हंगामात जर हरभराचे पिक घेतले असेल तर रब्बी हंगामामध्ये ते पिक पून्हा घेऊ नये. यासाठी नियंत्रण म्हणून जमिनीची खोल नागरणी करावी. हेक्टरी 10 ते 12 कामगंध सापळे लावावे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसून किडींवर काही प्रमाणात निर्बंध घालता येतो.
पक्षांना बसण्यासाठी दर 15 ते 20 मीटर अंतरावर 3 ते 4 फूट लांबीच्या काड्या रोवाव्यात म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे यांना पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. पिकावरील किडींचे नियंत्रण होण्यासाठी एकाच किटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून पालटून औषधे फवारावीत. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच 5 टक्के निंबोळी अर्क 25 किलो हेक्टरी पहिली फवारणी करावी. असे केल्यास घाटे अळीचे नियंत्रण करता येईल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇