नवी दिल्ली : टोमॅटो 500 रुपये किलो आणि कांदा 400 रुपये किलो! दचकलात ना? मात्र, महागाईचा भडका उडाल्याचे हे वास्तव आहे. (Inflation Worsens) महापुराने शेती उद्धवस्त केल्याने अवघ्या आठवडाभरात कांद्याचे दर 500% हून अधिक वाढले आहेत. बटाटा 120 रुपये किलोवर पोहोचला आहे. कुठे भडकलीय इतकी महागाई ते आपण जाणून घेऊया.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
Inflation Worsens : भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर महागाईची आग
पेट्रोल आणि डिझेलची टंचाई, त्याचे गगनाला भिडत असलेले भाव, त्यातच खाद्यान्न पुरवठ्यात घट, अन्नधान्याचे भडकलेले दर यामुळे भारतासह जगभरातील सर्वच देश संकटात सापडले आहेत. जगभाराला महागाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत श्रीलंकेत यादवी युद्ध ओढवले आहे. चीन, पाकिस्तानसह जगाच्या अनेक भागात महापुराने हाहाकार माजविला आहे. आता भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर महागाईची आग भडकत आहे.
आता पाकिस्तान महागाईच्या विळख्यात
श्रीलंकेनंतर आता भारताचा आणखी एक शेजारी देश महागाईच्या विळख्यात अडकला आहे. ही सर्व स्थिती आहे पाकिस्तानातील. आधीच हा देश राजकीय अनिश्चिततेच्या गर्तेत अडकून दिशाहीन होत चालला आहे. अशा स्थितीत आधी पेट्रोल आणि डिझेल, त्यानंतर आता फळे आणि भाज्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. लाहोरच्या बाजारात टोमॅटो 500 रुपये किलो आणि कांदा 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. या संकटातून वाचवा म्हणून पाकिस्तानने भारतासमोर मदतीचा याचना केली आहे.
कांद्याचे भाव 700 रुपये किलोपर्यंत भिडणार
पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाकिस्तानातील ठोक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच होलसेलमधील जिन्नस किरकोळ बाजारात जाईपर्यंत त्याची किंमत चार-पाच पटीने वाढते. सध्याची महापुराची आणि पुरवठा नसल्याची स्थिती कायम राहिल्यास आठवडाभरातच येथे टोमॅटो आणि कांद्याचे भाव 700 रुपये किलोपर्यंत पोहोचतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भारतातून कांदा-टोमॅटो आयात करण्याचा विचार
लाहोर, इस्लामाबादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर आता पाकिस्तान सरकार भारतातून कांदा-टोमॅटो आयात करण्याचा विचार करत आहे. पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच किरकोळ बाजारात फळे आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता
रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटोचा भाव 500 रुपये किलो तर कांद्याचा भाव 400 रुपयांवर पोहोचला होता. लाहोरमधील घाऊक व्यापारी सांगतात की काही ठिकाणी घाऊक किमती 100 रुपये आहेत, पण किरकोळ बाजारात जाताना त्याची किंमत चार-पाच पटीने वाढते. ते म्हणाले की, बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील पूरस्थितीमुळे भाजीपाला उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. परिणामी येत्या काही दिवसांत भाजीपाल्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बटाट्याचे दर 40 रुपयांवरून 120 रुपये किलो
लाहोरमधील घाऊक व्यापारी जवाद रिझवी यांनी ॲग्रोवर्ल्डसकट भारतीय मध्यम प्रतिनिधींना पाठविलेल्या ई-मेल निवेदनात म्हटले आहे की, पूरस्थिती आणि घटत्या उत्पादनाची परिस्थिती गंभीर आहे. हे पाहता लवकरच ठोस पावले उचलली नाहीत, तर टोमॅटो आणि कांद्याचे भाव येथे 700 रुपये किलोपर्यंत पोहोचतील. जीवनावश्यक भाज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बटाट्याचे दरही 40 रुपयांवरून 120 रुपये किलो झाले आहेत.
बाघा बॉर्डरवरून कांदा, टोमॅटोची आयात?
सध्या अफगाणिस्तानातून लाहोर आणि पंजाबमधील तोरखाम सीमेवरून कांदा आणि टोमॅटो येतो. मात्र, अपुरा पुरवठा होत असल्याने पाकिस्तान सरकार आता भारतातून आयात करण्याची तयारी करत आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनी ॲग्रोवर्ल्डला सांगितले की, तोरखाम सीमेवरून दररोज 100 कंटेनर टोमॅटो आणि 30 कंटेनर कांद्याची खरेदी केली जाते. यातील दोन कंटेनर टोमॅटो आणि एक कंटेनर कांदा लाहोर शहरात पाठवला जातो, जो मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा आहे.
भारत हाच पर्याय का?
खरेतर, पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानातून कांदा-टोमॅटो आयात करत आहे. मात्र, तो त्यांच्या देशांतर्गत मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. पाकिस्तानकडे इराणमधूनही भाजीपाला आयात करण्याचा पर्याय आहे. मात्र, हे काम तफ्तान सीमेवरून करावे लागत असल्याने इराण सरकारने आयात-निर्यात करात वाढ केली आहे. आधीच भीषण महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला येथून आयात करणे महाग होणार आहे. अशा स्थितीत भारत हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे. त्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतीय सरकारला साकडे घातले जात आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंगसाठी 50 टक्के अनुदानाचा असा घ्या लाभ…!
पाकिस्तानातील पूर, टेक्सासमधील दुष्काळ आणि शिनजियांगमधील लॉकडाऊनने जगभरात कापूस टंचाई