नवी दिल्ली : तमाम मराठीच नव्हे तर भारतीयांसाठी बल्ले बल्ले न्यूज आहे. धनशक्ती या बायोफोर्टिफाइड बाजरी भाकरला (BioFortified Millet) आंतरराष्ट्रीय नॉर्मन बोरलॉग पुरस्कार प्राप्त झाला आहे. शास्त्रज्ञ महालिंगम गोविंदराज यांनी हे वाण संशोधित केले आहे.
धनशक्ती बाजरी वाणात अधिक लोह, जस्त
गोविंदराज हे तेलंगणातील कृषी शास्त्रज्ञ आहेत. प्रत्यक्ष शेतातील फील्ड संशोधन आणि लोकहितकारी प्रयोगासाठी त्यांना प्रतिष्ठेचा 2022 मधील नॉर्मन ई. बोरलॉग पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महालिंगम यांनी शोधलेले धनशक्ती हे बाजरी वाण लोह आणि जस्त (Iron & Zink) घटकांनी समृद्ध आहे. टपोऱ्या, दाणेदार बाजरीचे (Pearl Millet) हे धनशक्ती वाण अधिक पोषणमूल्य युक्त आहे.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
जगातील पहिली बायोफोर्टिफाइड बाजरी BioFortified Millet
महालिंगम यांनी गेल्या 8 वर्षांत सुमारे 10 बायोफोर्टिफाइड जाती संशोधित केल्या आहेत. त्यातील धनशक्ती हे जगातील पहिले बायोफोर्टिफाइड बाजरी वाण आहे. धनशक्ती बाजरीचे दाणे टपोरे आणि मोत्यासारखे असतात. पर्ल मिलेट अशी त्यांची ओळख आहे. 2014 पासून या वाणाचे लागवड प्रयोग सुरू आहेत. गोविंदराज हे सध्या हार्वेस्टप्लस येथे पीक विकासाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. बायोफोर्टिफाइड अन्न-धान्य (स्टेपल्स) उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हार्वेस्टप्लस कार्य करते.
एका दशकाहून अधिक काळ संशोधन, प्रसार
“गोविंदराज यांनी भारत आणि आफ्रिकेतील बायोफोर्टिफाइड पिके, विशेषत: मोती बाजरी, मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,” असे वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे. एका दशकाहून अधिक काळ, गोविंदराज यांनी उच्च-उत्पादन देणार्या, उच्च-लोह आणि उच्च-जस्त युक्त अशा मोती बाजरी वाणांचा विकास आणि प्रसार करण्याचे काम केले आहे. ज्यामुळे हजारो शेतकरी आणि त्यांच्या समुदायांना चांगले पोषण मिळू शकले.
बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय
बायोफोर्टिफिकेशन ही पिकांची उत्पादकता आणि सूक्ष्म पोषक घटक वाढवण्यासाठी निवडक प्रजननाची प्रक्रिया आहे. जागतिक स्तरावर, बायोफोर्टिफिकेशनचा वापर आता मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कुपोषण तसेच शरीरातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेशी लढण्यासाठी अनेक मार्गांपैकी एक म्हणून त्याचा वापर केला जातो . याशिवाय, आहारातील विविधतेला चालना देणे, कापणीनंतर अन्नाची योग्य साठवण करणे आणि गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांसारख्या लक्ष्यित गटांना जीवनसत्त्व, लोह आणि फॉलिक ॲसिड पूरक आहार देणे, हे कुपोषणाची लढायचे इतर मार्गही जोडीला अवलंबले जातात.
नॉर्मन बोरलॉग आंतरराष्ट्रीय पुरस्कार
2011 मध्ये नॉर्मन ई. बोरलॉग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. 1940 आणि 1950 च्या दशकात तरुण शास्त्रज्ञ असलेले बोरलॉग यांनी मेक्सिकोमध्ये जागतिक भूक आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनद्वारे हा 10,000 अमेरिकी डॉलरचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार फक्त 40 वर्षांखालील शास्त्रज्ञांना त्याच्या वैयक्तिक, समाजहितपूरक संशोधनासाठी दिला जातो. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील आयोवा येथे महालिंगम गोविंदराज यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
बोरलॉग यांच्या संशोधनाने भारतात हरित क्रांती
भारतात 1960च्या दशकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या हरित क्रांतीदरम्यान बोरलॉग यांनी विकसित केलेल्या उच्च-उत्पादक गव्हाच्या वाणांचा अवलंब केला गेला होता, ज्यामुळे देश अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. “शेतकऱ्यांपर्यंत नवीन वाणांचा प्रसार करताना मी सदैव डॉ. बोरलॉग यांना प्रेरणास्थान ठेवले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे. अशा महान शास्त्रज्ञाच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा खूप महत्त्वाचा सन्मान आहे,” गोविंदराज यांनी ॲग्रोवर्ल्डला सांगितले.
आता तांदूळ, गहू, मकाही बायोफोर्टिफाइड
गोविंदराज म्हणाले, “2014 मध्ये धनशक्ती विकसित झाल्यापासून, आम्ही भारत आणि पश्चिम आफ्रिकेत सुमारे 10 बायोफोर्टिफाइड पर्ल ज्वारीच्या जाती विकसित केल्या आहेत. आता खाजगी क्षेत्र हे बियाणे शेतकऱ्यांना विकत आहे.” ते पुढे म्हणाले की, 2003 पासून हॉवर्थ बोईस यांच्या नेतृत्वाखाली बाजरी व्यतिरिक्तही, बायोफोर्टिफिकेशन तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. तांदूळ, गहू, मका, कसावा आणि इतर मुख्य अन्न-धान्यासाठी आता हे तंत्रज्ञान व्यावसायिक पातळीवर स्वीकारले जात आहे.
200 ग्रॅम धनाशक्ती महिलांना आहारात भारी
वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनच्या मते, 200 ग्रॅम धनशक्ती महिलांना त्यांच्या शिफारस केलेल्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोह प्रदान करू शकते. मोती बाजरीच्या नियमित जातींमध्ये हे प्रमाण फक्त 20 टक्के आहे. 2024 पर्यंत, 9 दशलक्षाहून अधिक भारतीय बाजरीच्या बायोफोर्टिफाइड जातींचे सेवन करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे पोषण मानके सुधारतील. पश्चिम आफ्रिकेतील शेतकऱ्यांनी 2019 पासून नवीन बायोफोर्टिफाइड वाणांचाही अवलंब केला आहे.
पहिले बायोफोर्टिफाइड फूड पीक होते रताळे
हार्वेस्टप्लसच्या मते , 2004 मध्ये व्हिटॅमिन ए समृद्ध रताळे हे पहिले बायोफोर्टिफाइड फूड पीक संशोधित केले गेले होते. तेव्हापासून 60 पेक्षा जास्त देशांमध्ये 12 वेगवेगळ्या मुख्य पिकांच्या शेकडो बायोफोर्टिफाइड जाती विकसित केल्या गेल्या आहेत किंवा चाचणी टप्प्यात आहेत.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
अमेरिकेत नव्या पिढीसाठी नव्याने लिहिली गेलीय डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची जीवनगाथा; सुप्रसिद्ध बालसाहित्यिका पेगी थॉमस यांनी रंगविलाय खाकी कपड्यातील ‘सुपरहीरो’
भात शेतीवर कीड रोगांचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Comments 1