जळगाव : शासनाने ग्राहक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून परंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती (पीकेव्हीवाय) योजना आणली आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने शेत जमिनींचे आरोग्य बिघडत आहे. यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. जमिनीतील आवश्यक अन्नद्रव्य व मूलद्रव्यांचे संतुलन बिघडले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय आहे.
काही वर्षांपासून रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. पर्यावरणाचीही हानी होत आहे. त्यामुळे या रासायनिक खतांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.
ग्राहक व शेतकऱ्यांचे हित
सध्याचा ग्राहक हा जागरुक आहे. ग्राहक उत्पादनाच्या दर्जाबाबत तडजोड करत नाही. अन्नधान्य व फळांबाबत तर ग्राहक जास्त गंभीर असतो. प्रत्येक बाबी तपासून उत्पादनाची निवड करतो. गेल्या काही काळात अन्नधान्य व फळांवर खते व रसायनांचा अतिरिक्त वापर करण्यात येत होता. त्याचे दुष्परिणाम शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने या गोष्टींचा अभ्यास केला. शासनाने ग्राहक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून परंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती (पीकेव्हीवाय) योजना आणली आहे.
पर्यावरणपूरक उत्पादने सध्या काळाची गरज बनली आहेत. ग्राहक सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत मालाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सेंद्रीय शेती करून शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतो. सेंद्रीय उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत तसेच देशात इतरत्र चांगली मागणी आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी योजना उपयोगी ठरू शकते.
हे आहे योजनेचे प्रमुख उद्देश
परंपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठाना प्रोत्साहन, प्रमाणीकरण, सेंद्रीय शेती ग्राम विकसित करणे, सेंद्रीय शेतीवर आधारित प्रशिक्षण व प्रात्यक्षिके घेणे, शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रीय शेती निविष्ठा तयार करणे व पुरवठा करणे, शेतीमालाचे प्रमाणीकरण करून विक्री व व्यवस्थापन करणे योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
सेंद्रिय शेती समूह
योजनेअंतंर्गत 50 एकर क्षेत्राचा 50 शेतकऱ्यांचा समूह (क्लस्टर) तयार करून 50 शेतकऱ्यांच्या गटातून एकाची गटनेता म्हणून निवड करण्यात येते आणि निवडलेला शेतकरी हा गटातील व इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहिती देऊ शकतो. शेतकऱ्याच्या उत्पादनाची संपूर्ण माहिती सर्वसाधारण शेतकरी, व्यापारी, किरकोळ विक्रेते व ग्राहकांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध केली जाते. राज्यातील सेंद्रीय उत्पादनांचे प्रमाणीकरण करून ग्राहकामध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी, या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली आहे.
सेंद्रिय निविष्ठा गावातच अशी होणार उपलब्ध
सेंद्रीय गट संकल्पनेत एक गटातील एकाच गावातून 50 शेतकऱ्यांचा समावेश झाल्यास योजना राबविणे सुलभ होते. सेंद्रीय पद्धतीने उत्पादन, प्रमाणीकरण, व्यवस्थापन आणि विक्री या टप्प्यांचे नियोजन योग्य प्रमाणात करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा गावातच उपलब्ध होणार आहे. सेंद्रीय शेतीमध्ये एकात्मिक सेंद्रीय व्यवस्थापनाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.
गाव पातळीवर अवजारे भाड्याने घेण्याची तरतूद
रायझोबीयम, पी.एस.बी., जैविक खते, स्फुरद युक्त सेंद्रीय खताचा वापर, जिप्सचा वापर, गांडूळ खत, उत्पादन युनिट या बाबींचा एकत्रित वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्याला शेतीची मशागत करण्यासाठी लागणारी अवजारे विकत घेणे शक्य होत नाही. योजनेतील प्रस्तावित अनुदानातून गटपातळीवर किंवा गाव पातळीवर अवजारे भाड्याने घेण्याची तरतूद केली आहे.
योजनेचा कालावधी 3 वर्षे
सोलापूर जिल्ह्यात एका गटामध्ये 50 शेतकरी याप्रमाणे 28 गटामध्ये एकूण लाभार्थी संख्या 1400 इतकी होणार आहे. यानुसार 1400 एकर क्षेत्र सेंद्रीय शेतीत समाविष्ट होईल. योजनेचा कालावधी 3 वर्षे आहे. सहभागी होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, आत्मा यांच्याकडे संपर्क साधू शकता. सेंद्रीय शेती योजनेमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल, तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाते.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
आला पोळा कपाशी सांभाळा … पिकांवर का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी, जाणून घ्या अमावस्येचे पीक व्यवस्थापन …
शेणखताचे महत्त्व : सेंद्रिय कर्ब उत्पादकता वाढीत शेण खताचे फायदे.. निमित्त बैल पोळा..!
Comments 1