भुषण वडनेरे, धुळे
धुळे तालुक्यातील चौगाव येथील 35 वर्षीय प्रगतीशील शेतकरी सोपान शेवाळे यांनी फळबागेतून साधली आर्थिक समृध्दी. त्यांनी आपल्या 20 एकर शेतात पेरु, पपई व शेवगा लागवड केली आहे. त्यातून वर्षाला सुमारे 70 ते 80 लाखांची उलाढाल होत आहे. खर्च वजा जाता 25 लाखांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे श्री. शेवाळे सांगतात. रासायनिक व सेंद्रीय अशा दोन्ही पध्दतींचा वापर करुन ते एक्सपोर्ट क्वालिटीची फळे उत्पादित करत आहेत. त्यांच्या फळांना दिल्ली, सुरत, कलकत्ता येथील मार्केटमध्येही चांगली मागणी असते. शेवाळे यांची ही यशोगाथा …
धुळयापासून अवघ्या 24 कि.मी. अंतरावर चौगाव हे लहानसे गाव आहे. या गावात सोपान श्रीराम शेवाळे (35) यांची वडीलोपार्जीत 20 एकर बागायती शेती आहे. सोपान शेवाळे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असले तरी त्यांचे शेतीतील ज्ञान अफाट आहे. शिवाय शेतीविषयक नवनवीन गोष्टी अवगत करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा पुढार्यांच्या मागे न लागता ते अधिकारी व प्रगतशील शेतकरी मित्रांकडून मार्गदर्शन घेण्यात धन्यता मानतात. शिवाय फळबाग लागवडीत त्यांना दांडगा अनुभव असल्याने परिसरातील इतर इच्छुक शेतकरीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात.
फळबागेतील यशस्वी कामगिरीमुळे सोपान शेवाळे यांची परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. इतर शेतकर्यांप्रमाणे केवळ पारंपारिक पीके न घेता फळबाग लागवडीतून कशी आर्थिक समृध्दी साधता येवू शकते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. इतकेच नव्हे तर काळाची गरज ओळखून त्यांनी गांडूळखत व शेण स्लरींचा वापर करुन दर्जेदार फळे घेण्यावर भर दिला आहे. यामुळे जमिनीचा पोतही राखण्यासही मदत होत असून फळांना मार्केटमध्ये चांगला भाव मिळत आहे.
वडीलोपार्जित फळशेतीची परंपरा
सोपान शेवाळे यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यामुळे वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून ते वडीलांना शेतीकामात मदत करत. विशेष म्हणजे त्यांचे वडील श्रीराम शेवाळे हे 1985 पासून फळपीके घेत आले आहेत. त्यामुळे फळबाग लागवडीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे जवळून पाहिल्यामुळे सोपान यांना फळबागेचा दांडगा अनुभव आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 17व्या वर्षापासून म्हणजेच 2005 पासून ते पूर्णवेळ शेतीकडे वळले. वडीलांच्या पावलावर पाउल ठेवत, त्यांनीही फळबागेची परंपरा सुरु ठेवली. इतकेच नव्हेतर डाळींब एक्सपोर्ट करुन केवळ 20 एकरातून सव्वा कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न घेण्याची किमयाही साधली. मात्र, त्यानंतर 2014 पासून सातत्याने येणार्या नैसर्गिक आपत्तींमुळे ही उलाढाल 70 ते 80 लाखांवर आल्याचे ते सांगतात. म्हणजेच त्यांना एकरी सुमारे अडीच लाखांचे उत्पादन होत आहे.
अशी केली लागवड
सोपान शेवाळे हे 2014 पर्यंत डाळींब व द्राक्षांचे उत्पादन घेत होते. त्यानंतर ते गेल्या आठ वर्षांपासून पेरु, पपई व शेवग्याचे उत्पादन घेत आहेत. त्यानुसार त्यांनी आपल्या 20 एकर क्षेत्रात पेरुची 6 हजार झाडे, पपईची 6 हजार झाडे व शेवगाच्या 1,500 झाडांची लागवड केली आहे. याच जागेत काही क्षेत्रात ते जनावरांसाठी चाराही घेतात. आंतरपीक म्हणून कांदा लागवड केली आहे. कोणत्याही नवीन फळाची लागवड करण्यापूर्वी ते आपल्या सर्कलमधील प्रगतशील शेतकरी मित्रांचे मार्गदर्शन घेतात. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हेतर आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यातील अनेक प्रगतशील शेतकरी त्यांच्याशी व्हॉट़सप ग्रुपद्वारे जोडले गेले आहेत. याचा फायदा शेती करताना होत असल्याचे श्री. शेवाळे आवर्जून सांगतात.
अशी करतात विक्री
माल पिकवण्यापेक्षा त्याची विक्री करणे कठीण असते, असे म्हटले जाते; परंतु चांगल्या मार्केटचा शोध घेवून आपल्या मालाला चांगला भाव कसा मिळवता येऊ शकतो, हे श्री.शेवाळे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. ते पेरु व पपईची विक्री दिल्ली, सुरत, कलकत्ता येथील मार्केटमध्ये करतात. एक्सपोर्ट क्वालिटीची फळे असल्याने त्यांच्या मालाला दरही चांगला मिळतो. तर शेवग्याची विक्री वाशी मार्केटमध्ये करतात. क्वचितच धुळ्यातील मार्केटमध्ये मालाची मालाची विक्री केली जाते. पेरू, पपई व शेवगा लागवडीतून वर्षाला 80 लाखाची उलाढाल होत असून खर्च वजा जाता 25 लाखांचा नफा सोपान शेवाळे यांना मिळतो.
पेरु लागवड
सोपान शेवाळे यांनी आपल्या शेतात पेरुची सहा हजार झाडे लावली आहेत. त्यांनी या झाडांची रोपे रायपूर येथील नर्सरीतून 220 रुपये प्रतिरोप (वाहतूक खर्चासह) या प्रमाणे आणली होती. त्यानंतर या रोपांची 13 बाय 10 फूट या प्रमाणे लागवड केली. या झाडांच्या माध्यमातून त्यांना वर्षाला सुमारे 60 ते 70 टन पेरुचे उत्पादन होते. झाडाच्या वयोमानानुसार चौथ्या वर्षी 40 ते 50 टन उत्पादन होत असल्याचे श्री.शेवाळे सांगतात. पेरुला 30 ते 60 रुपये किलोपर्यंत दर मिळतो. पेरु लागवडीतून एकरी सुमारे अडीच लाखांचे उत्पादन होत असून खर्च वजा जाता सव्वा ते दीड लाखांचा निव्वळ नफा होत आहे.
पपई लागवड
पपई लागवडीतूनही चांगली कमाई होत आहे. सोपान यांनी आपल्या शेतात पपईची 6 हजार झाडे लावली आहेत. यासाठी त्यांनी नगर येथून 15 रुपये प्रतिरोप (वाहतूक खर्चासह) या प्रमाणे रोपे आणली होती. त्यानंतर या रोपांची 7 बाय 9 फूट अंतराने लागवड केली. या झाडांच्या माध्यमातून त्यांना चांगले उत्पादन होत आहे. खर्च वजा जाता एकरी सुमारे एक ते सव्वा लाखांचा निव्वळ नफा होत आहे.
शेवगा लागवड
शेवगा शेंगात व एकूणच वृक्षात आरोग्याच्या दृष्टीने अनेक आवश्यक घटक असल्याने मागणी कायम टिकून राहते. शिवाय शेवग्याला दरही चांगला मिळत असल्याने धुळे जिल्हयात शेवगा लागवड करणारे अनेक शेतकरी आहेत. सोपान यांनीही आपल्या शेतात शेवग्याची 1,500 झाडे लावली आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या मित्राकडून 4 हजार रुपये किलो दराने बियाणे घेतले होते. त्यानंतर त्यांनी 13 बाय दहा फूट अंतरावर शेवगा लागवड केली. यातून वर्षाकाठी सुमारे अडीच लाखांचे उत्पादन होत असून खर्च वजा जाता सुमारे एक ते दीड लाखांचा निव्वळ नफा होतो.
असे करतात व्यवस्थापन
श्री. शेवाळे यांच्या शेतात विहीर आहे. शिवाय त्यांनी 3 कि.मी. अंतरावरुन चार इंची पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था केली आहे. चार ते पाच सोलर पंपही आहेत. त्यामुळे पाण्याची मुबलकता आहे. पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे ते पाणी देतात. शिवाय, काळाची गरज ओळखून सेंद्रीय शेतीचीही जोड दिली आहे. त्यासाठी त्यांनी शेतातच गांडूळ खत प्रकल्प सुरु केला आहे. याबरोबरच गायीचा गोठाही असून त्यात 10 गीर गायी आहेत. शेण स्लरींचाही ते वापर करतात.
यामुळे जमिनीचा पोत राखण्यास मदत होत असून दर्जेदार व एक्सपोर्ट क्वालिटीची फळे येतात. किडरोग नियंत्रणासाठी, वातावरणातील बदलानुसार किडरोगांचा प्रादुर्भाव व त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेवून रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करत असल्याचेही सोपान शेवाळे सांगतात.
25 जणांना रोजगार
सोपान शेवाळे यांच्या फळबागेमुळे 20 ते 25 जणांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. फळांची काढणी, झाडांची छाटणी, फवारणी, गोठ्याचे व्यवस्थापन आदी कामांसाठी वर्षभर दररोज या मजुरांची आवश्यकता भासते. मात्र, मजूर लावले असले तरी सोपान हे स्वत: पुर्णवेळ शेतीकामात घालवतात. मार्केटींगचे कामही ते स्वत:च करतात. शिवाय शेतकरी मित्रांना फळपिकांबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी ते 24 तास ऑनलाईन उपलब्ध असतात.
मित्रांसह केव्हीकेचे मार्गदर्शन
फळबागेसाठी आपल्या सर्कलमधील प्रगतीशील शेतकरी मित्र; तसेच धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्राचे मौलिक मार्गदर्शन मिळत असल्याचे श्री. शेवाळे सांगतात. शिवाय नवीन काहीतरी शिकण्याची भूक असल्याने ते स्वतः शेतकर्यांच्या बांधावर जावून माहितीही घेतात. यामुळे फळशेती करताना मोठा फायदा होत असल्याचे ते सांगतात. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक दिनेश नांद्रे यांची वेळोवेळी मदत होते. त्यांच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा, हवामान अंदाज, माती परीक्षण, वातावरणाची अनुकूलता, शेण स्लरी इ.साठी मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे श्री. शेवाळे आवर्जून सांगतात. या सर्वांच्या सहकार्यातून आपण यश्स्वीपणे फळशेती करु शकत असल्याचे ते नम्रपणे नमूद करतात.
अधिकार्यांनी दिल्या भेटी
सोपान यांनी स्वत:ला पूर्णवेळ शेतीतच झोकून दिले आहे. त्यांच्या शेतीतून एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असली तरी ते राजकारण व पुढार्यांच्या मागे-पुढे करण्यात कधीच आपला वेळ घालवत नाही. त्यांच्या फळशेतीला धुळे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, तत्कालीन प्रांताधिकारी विठ्ठलराव सोनवणे, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित आदींनी भेटी दिल्या असून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
आमची तिसरी पिढी फळपिके घेत आहे. पूर्वी 20 एकरात द्राक्ष व डाळींब लागवडीतून एक ते सव्वा कोटींची उलाढाल होत होती. परंतु, वेळोवेळी येणार्या नैसर्गिक आपत्तीमुळे सन 2014 पासून उलाढाल 70 ते 80 लाखांवर आली आहे. जे शेतकरी पारंपरिक पीके घेतात व ज्यांना फळशेती करण्याची इच्छा आहे, अशा शेतकर्यांनाही आम्ही मार्गदर्शन करतो. शेतकर्यांनी मार्केट व हवामानाचा अंदाज घेवून; तसेच अपडेट राहून फळपीके घेतल्यास मोठा फायदा होवू शकतो.
– सोपान श्रीराम शेवाळे
प्रगतशील शेतकरी, चौगाव, ता. जि. धुळे.
मो. नं. ः 7720023939
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गाजीपूरने पेरला आशावाद
Good Solution : मजूर समस्येवर मात; तयार केला A1 इलेक्ट्रिक बैल
best