चेन्नई : शेती करतांना येत असलेल्या अडचणींमुळे अनेक शेतकरी शेतीकडे पाट फिरवीतांना दिसून येत आहेत. अल्पभुधारक शेतकर्यांच्या जमिनी तर पडीक पडून राहत असल्याचेही चित्र अनेकदा पाहावयास मिळत आहे. 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असल्याने यातून फारसे उत्पन्न मिळत नाही, असे शेतकर्यांकडून सांगण्यात येते. मात्र, असा विचार करणार्या शेतकर्यांना चेन्नई येथील एका शेतकर्यांना केवळ 200 स्क्वे. फु. क्षेत्रफळात मायक्रोग्रीन्सची शेती करुन व त्यातून महिन्याकाठी 80 हजारांचे उत्पन्न घेवून विचार करायला भाग पाडले आहे. चला तर मग वाचूया अधिक माहिती.
विद्याधरन नारायण यांनी साधारणत: 30 ते 35 वर्षांपूर्वी एका एनजीओमध्ये नोकरी स्विकारुन आपल्या करियरला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना 1000 रुपये इतके वेतन मिळत होते. 30 वर्षांपर्यंत ते ही समाजसेवेची नोकरी करीत होते. मात्र, या 30 वर्षांत त्यांचा पगार फक्त 25 ते 30 हजारापर्यंतच वाढला होता. दोन पैसे अधिक मिळावेत म्हणून विद्याधरन यांनी अनेकदा वेगवेगळे व्यवसाय सुरु केले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या हाती अपयशच आले.
अनेक व्यवसायात अपयश
विद्याधरन या विषयी बोलतांना सांगतात की, समाजसेवेच्या क्षेत्रात जास्त पैसे कमविण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मी शेतीशी संबंधित सर्व उत्पादने घेवून त्यांना बाजारात विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. मात्र त्यात काही फारसा फायदा नाही झाला. त्यानंतर त्यांनी टुरिस्ट कार विकत घेवून तिला भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला, मात्र हा व्यवसाय देखील बंद पडला. या व्यवसायातून पैसे तर मिळायचे मात्र खर्च जास्त होत होता. त्यानंतर बांधकामाचे छोटे-मोठे ठेके घेण्याचे काम त्यांनी सुरु केले. यातही त्यांना अपयश आले. एकदा इंटरनेट पाहत असतांना त्यांना मायक्रोग्रीनची माहिती मिळाली, आणि त्यांनी यालाच स्वत:चा व्यवसाय करुन घेतला. यावेळी मात्र त्यांना या व्यवसायात त्यांना मोठे यश मिळाले.
… आणि घरातच केली शेती
विद्याधरन यांच्याकडे शेती देखील आहे. मात्र शेती घरापासून 80 कि.मी. दूर असल्याने दररोज ये-जा करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी घरीच मायक्रोग्रीनची शेती करण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवरुनची त्यांनी याबाबची सर्व माहिती जाणून मायक्रोग्रीनची शेती कशी करायची हे शिकून घेतले. 2013 साली त्यांनी ही शेती करण्याला सुरुवात केली होती, परंतु 2014 साली त्यांनी हे उत्पादन हॉटेल आणि सुपर मार्केटस्मध्ये विक्री करायला सुरुवात केली. आता ते या व्यवसायातून महिन्याकाठी 80 हजार रुपयांपर्यंतची कमाई करीत आहेत. या शेतीमध्ये त्यांची पत्नी जयाराणी या देखील मदत करतात.
10 हजाराची गुंतवणूक
मायक्रोग्रीनची शेती करण्यासाठी विद्याधरन यांना सुरुवातीला 10 हजार रुपये इतका खर्च आला होता. त्यानंतर त्यांनी यात मोठे बदल केले. आता संपूर्ण सेटअप 2 लाख रुपयांचा झाला आहे. येणार्या काळात मागणीच्या हिशोबाने त्यात आणखी बदल करुन त्याला वाढविणार असल्याचे ते सांगतात.
शेतीला व्यवसायाची जोड
विद्याधरन सांगतात की, त्यांनी मायक्रोग्रीनच्या शेतीला व्यावसायीक स्वरुप देण्याचा विचार केला. त्यासाठी पॉम्पलेट छपाई करण्यासाठी ते एका दुकानात गेले होते. प्रिंटिंगच्या दुकानात त्यांची ओळख एका व्यक्तीशी झाली. त्या व्यक्तीने मायक्रोग्रीन विदेशात खुप प्रसिध्द व त्याला या ठिकाणी मोठी मागणी असल्याचे सांगितले व त्यांची भेट एका हॉटेलातील शेफ सोबत करुन दिली. त्या शेफने तसेच त्यांच्या इतर मित्रांनी विद्याधरन यांना चेन्नई येथे होणार्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी उपबल्ध करुन दिली. या ठिकाणी विद्याधरन यांनी मायक्रोग्रीन्स दाखविले आणि त्यांची कल्पना लोकांसमोर मांडली. या ठिकाणी त्यांना काही तज्ज्ञांकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी काही टिप्स मिळाल्या आणि त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यांनी त्याच्याशी संबंधीत अभ्यास केला, खुप व्हिडीओ पाहिले. त्यानंतर त्यांनी सखी मायक्रोग्रीन या नावाने व्यवसाय सुरु केला.
काय आहे मायक्रोग्रीन
विद्याधरन सांगतात की, मायक्रोग्रीन हे कोणत्याही पिकाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला येणारे दोन पाने असतात. तसे तर प्रत्येक रोपाच्या सुरुवातीला येणारी पाने मायक्रोग्रीन सारखे खाल्ले जात नाही. मुळा, गाजर, मोहरी, मुंग, पालक, मेथी, ब्रोकली, कोबी, वटाणे, कोथिंबीर, बीट, गहू, मका, तुळस, हरभरा यासारख्या पिकांचे मायक्रोग्रीन खाऊ शकतो.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
व्यवसायात अनेक अडचणी
विद्याधरन यांना मायक्रोग्रीनची शेती करतांना अनेक अडचणी आल्या. यात सर्वात मोठी अडचण ही मागणीची होती. ते सांगतात की, जर जास्त मागणी आली तर ते त्या प्रमाणात मायक्रोग्रीन उगवू शकतात. परंतु, बाजारात याची मागणी खुप कमी आहे. मायक्रोग्रीनचे उत्पादन करणे खुप सोपे आहे परंतु, त्यासाठी ग्राहक शोधणे खुप कठीण आहे. खुपच कमी लोक मायक्रोग्रीन घेतात. काही तर डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर मायक्रोग्रीन मागवितात. काही शेफना तातडीने पाहिजे असते, परंतु ते शक्य होवू शकत नाही. त्यामुळे त्यांना नकार द्यावा लागत असल्याचेही ते सांगतात.
पुढील वाटचालीचे नियोजन
आपला व्यवसाय आणि मायक्रोग्रीनची मागणी वाढावी यासाठी येणार्या काळात विद्याधरन एक अॅप विकसीत करण्याची तयारी करीत आहेत. जेणे करुन लोक अॅप्सच्या माध्यमातून मायक्रोग्रीन खरेदी करु शकतील. येणार्या काळात सलादच्या व्यवसाय पाऊल टाकण्याचा विचार करीत आहेत. या सलादमध्ये ते मायक्राग्रीन देखील टाकतील. सध्या ते सलाद बनविण्यासाठीचा अभ्यास करीत आहेत. ते या यवसायाला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या मुलीला उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले आहे. लवकरच त्यांची मुलगी सखी हा व्यवसाय सांभाळणार आहे.
अल्पभुधारक शेतकर्यांसाठी संधी
अनेक अल्पभुधारक शेतकरी उत्पादन कमी येवून उत्पन्न जास्त येत नाही म्हणून शेतीकडे पाट फिरवितात. मात्र, आता खुप असे तंत्रज्ञान आहेत, पद्धती आहेत की, त्यांचा वापर केला तर अत्यंत कमी जागेत सुध्दा चांगल्या प्रमाणात, नवनवीन पद्धतीने उत्पादन घेवून मोठी कमाई करता येवू शकते. त्यामुळे शेतकर्यांनी हार न मानता अभ्यास करुन शेतीत बदल करावे. आधुनिकता आणि काळानुसार बदल, मागणी लक्षात घेवून शेती करावी, असे आवाहन ते करतात.
क्वालिटीनुसार दर
मायक्रोग्रीन्सचे 100 ग्रॅमचे पाकीट 200 ते 400 रुपयांपर्यंत विकले जाते. तुम्ही आणलेले मायक्रोग्रीन कोणत्या क्वालिटीचे आहेत त्यानुसार किंमत कमी जास्त होत असते. या मायक्रोग्रीन्सला हॉटेल आणि सुपर मार्केटमध्ये विक्री केले जाऊ शकते. विद्याधरन सांगतात की, त्यांच्या विक्रीचा 40 टक्के हिस्सा हॉटेल, 40 टक्के सुपर मार्केट आणि 20 टक्के वैयक्तीक याच्यातून येतो. मागणी आल्यानंतरच ते मायक्रोग्रीन उगवितात. ते दररोज सरासरी 3 किलो मायक्रोग्रीन सप्लाय करतात. जास्तीत जास्त लोकांना ते स्वत: किंवा त्यांचे सहकारी वितरण करतात. काही लोक ऑनलाईन साईटवरुन बुकींग करुन देखील मायक्रोग्रीन मागवित असल्याचे सांगतात.