(प्रवीण देवरे)
सिंचनाची सोय उपलब्ध आहे असे शेतकरी कापूस, सोयाबीन सारखी नगदी व पारंपारिक पिके घेतात. परंतु काही युवा शेतकरी असेही आहेत, की जे आपल्या पारंपारिक शेतीला छेद देत नवीन प्रयोग करत आपल्या शेतीत विविधता आणत आहेत. त्यापैकी एक आहेत तुकाराम चंदनसे. त्यांनी आपल्या 10 गुंठे क्षेत्रातून पहिल्याच प्रयत्नात सिमला मिरचीतून दोन लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे…
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका अजूनही ठोस अशा सिंचन सुविधांसाठी प्रयत्नरत आहे. दानापूर, बाणेगाव येथे सिंचन प्रकल्प असले तरी बहुतांश शेती ही कोरडवाहू प्रकारची असल्याने ज्या शेतकर्यांना सिंचनाची सोय उपलब्ध आहे असे शेतकरी कापूस, सोयाबीन सारखी नगदी व पारंपारिक पिके घेतात.
प्राचीन काळी भोग्वर्धन नावाने प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या भोकरदन या तालुक्याच्या गावापासून 14 किमीवर गोद्री हे गाव. प्राचीन गावांप्रमाणे येथेही बारा बलुतेदारी असल्यासारखी सर्वच जातीसामाजाची घरे सलोख्याने राहतात. याचा गावात काही वर्षांपूर्वी कौतिक चंदनसे व मंगलबाई चंदनसे हे दांपत्य राहावयास आले. मुळचे गांधेली येथील रहिवाशी असलेल्या चंदनसे यांनी येथेच जमीन घेत आपली कर्मभूमी मानून शेती सुरु केली. घरी वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या घरात तुकाराम हे मोठे तर त्यांचे लहान बंधू नामदेव व ज्ञानेश्वर हे देखील शेतीच करतात. कौतिक चंदनसे यांनी आता सर्व शेतीची सूत्रे मुलांच्या हाती दिले असून आता शेतीची संपूर्ण जबाबदारी नवीन पिढीच करते. त्यात प्रामुख्याने मार्केटिंग / विक्री व्यवस्थापन हे तुकाराम हे सांभाळतात. काही वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटेंटकडे नोकरीस असलेल्या तुकाराम यांना बाहेर असलेल्या मार्केटचा अनुभव त्याकामी आल्याचे ते सांगतात. तर इतर दोघे भाऊ शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देतात.
पाण्याचा शाश्वत स्रोत तयार केला
चंदनसे कुटुंबीयांची एकूण 12 एकर जमीन, टप्प्याटप्याने जमीन घेतल्यानंतर आपल्या शेतीत दोन विहीरीद्वारे हमीचा असा पाण्याचा स्रोत तयार केला. चंदनसे परिवाराची येथे दोन शिवारात एकूण 12 एकर जमीन असून संपूर्ण क्षेत्राला त्यांनी बागायती केले आहे. आजवर वडील फक्त पारंपारिक पिके घेत असत, परंतु नवीन पिढीतील चंदनसे बंधूनी सतत नाविन्याचा व प्रयोगशीलतेचा अंगीकार करून शेतीत नवनवीन प्रयोग सुरु केले.
शेतातच निवास
गावातील नको त्या गोष्टीवर वेळ वाया जातो आणि शेतीकडे दुर्लक्ष होते, हा प्रत्येक गावातील अनुभव आहे. असाच अनुभव आपल्याला नको या कारणासाठी आणि शेतीला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून शेतात पक्के घर बांधले असून त्याच ठिकाणी त्यांनी सर्व राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शेतात कामासाठी हवा तेव्हा वेळ मिळतो असे ते म्हणतात.
परंपारीक शेतीला प्रयोगशीलतेची जोड
चंदनसे कुटुंबीय आजही पारंपारिक कापूस, मका, सोयाबीन यासारखी पिके घेतात. त्याचबरोबर त्यांनी सिमला मिरचीच्या माध्यमातून नवीन पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे. मागील वर्षी उत्पादित झालेली अद्रक विक्री न करता त्यांनी ती यावर्षासाठी जास्त क्षेत्रावर लगावड करता यावी यासाठी बियाणे म्हणून ठेवली आहे. तर याच शेतीतील 10 गुंठे क्षेत्राच्या सिमला मिरचीने त्यांना लखपती केले आहे.
खुल्या क्षेत्रावर सिमला लागवड
बहुतेक शेतकरी सिमला मिरची लागवडसाठी शेडनेट किंवा पॉलीहाउसला प्राधान्य देतात. परंतु चंदनसे बंधूनी फक्त मल्चिंग टाकून मोकळ्या रानात मिरची लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी आमच्या स्थानिक हवामानाला अनुकूल हे पिक आहे का याची खात्री केल्याचे तुकाराम सांगतात. कारण उत्तर महाराष्ट्र किंवा लागूनच असलेला विदर्भ यांच्या तुलनेत आमच्याकडील हवेत अधिक गारवा असल्याचे ते सांगतात. त्यामुळे या पिकाच्या वाढीवर फारसा अनिष्ट परिणाम खुल्या क्षेत्रावर होत नाही.
काय आहे पोटॅशियम शोनाईट
पोटॅशियम शोनाईट हे खत पाण्यात 100 % विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते. यात 23% पोटॅश, 10% मॅग्नेशियम व 15% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत. कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते. पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो. पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होते, पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियममुळे अबाधित राहते. गंधकामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती व फळांची टिकाऊ क्षमता वाढते तसेच पिकाची पक्वता लवकर व एकसारखी
होते.
सिमला लागवडपूर्व तयारी
एकूण 10 गुंठे जमिनीवर मिरची लागवड केली. त्यापूर्वी जमिनी नांगरणी करून रोटाव्हेटरने भुसभुशीत करून घेतली त्यावर बेड तयार करून मल्चिंग अंथरून घेतले. तत्पूर्वी त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार 2 बॅग, डीएपी 1 बॅग,फ्युरी 5 किलो असा खतांचा बेसल डोस टाकला. 25 मे 2020 रोजी स्थानिक नर्सरीमधून 4 हजार सिमला मिरचीची रोपे आणून लागवड केली. संपूर्ण क्षेत्राला पाण्यासाठी ठिबक सिंचनची व्यवस्था केली असून त्याद्वारे विद्राव्ये खते देणे सोपे होते.
लागवड पश्च्यात व्यवस्थापन
लागवडीनंतर 10 दिवसांनी 19:19:19 हे खत 4 किलो त्यानंतर 15 दिवसांनी 13:40:13 हे खत ड्रीपद्वारे दिले. त्यानंतर 12:16:00 आणि लगेच 5 दिवसांनी मिरचीची साईज वाढविण्यासाठी पोटॅशियम शोनाईट दिले. फवारणी करतांना सतत शेतात पिकाचे निरीक्षण करून वेळोवेळी आलेल्या किडीच्या प्रकारानुसार गरजेनुसार सेंद्रिय व रासायनिक कीडनाशक औषधी फवारणी केली. खते व फवारणीसाठी संपूर्ण हंगामाला 20 हजार रु खर्च आला.
अर्थकारण
लागवडीनंतर साधारणपणे 45 दिवसांनी पहिला तोडा झाला. तो 90 किलोचा होता. त्यानंतर सरासरी 2 दिवसाआड मिरची तोडली जाऊ लागली. संपूर्ण मालाची विक्री ही स्थानिक बाजारात केली. त्याला सरासरी 23 रु दर मिळाला. एकूण हंगामात 11 टन माल निघाला त्याचे एकूण 2 लाख 50 हजार रुपये आले. घरचेच लोक कामासाठी असल्याने गरजेनुसार मजूर लागले. त्यामुळे मजुरी खर्च जास्त लागला नाही.
* जमीन पूर्वमशागत 1500 * बेसल डोस 2500
* मल्चिंग पेपर 4500 * मिरची रोप 6000
* फवारणी 10000 * खते 10000
* एकूण खर्च 34500
इतर किरकोळ खर्च धरून जवळपास 40 हजार रु संपूर्ण हंगामात लागले. एकूण 11 टन मिरची विक्रीतून 255000 रु पर्यंत मिळकत झाली. यातून खर्च वजा जाता 2 लाख 15 हजार रु निव्वळ नफा शिल्लक राहिला. हा नफा आमच्या शेतातील इतर कोणत्याही पिकापेक्षा नक्कीच जास्त असल्याचे तुकाराम चंदनसे यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षीही त्यांनी मिरची लागवड केली आहे.
कुटुंबाची साथ महत्वाची
घरात वारकरी संप्रदायाची परंपरा असल्याने साहजिकच एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे शेतीत कमीत कमी मजूर लागतात. आई-वडील यांनी घराची जबाबदारी घेतल्याने तिन्ही भाऊ आणि त्यांच्या पत्नी यांची याकामी मदत झाली. तुकाराम यांची पत्नी सुजाता या स्थानिक विद्यालयात शिक्षिका होत्या. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी नोकरी सोडून पूर्णपणे घरातील मुलांचे शिक्षण आणि शेती या कामात स्व:ताला झोकून दिले आहे. त्यामुळे चंदनसे परिवार शेतात जरी राहत असला तरीही घरातील मुलांच्या भविष्याबाबत जागरूक असल्याचे दिसून येते.
नियोजन भविष्यातील
आता यावर्षी देखील त्यांनी सिमला मिरची सह इतर तीन विविध मिरचीच्या जातींची 7000 रोपे लागवड केली आहे. परिसरातील वाढते सिमला मिरचीचे क्षेत्र लक्षात घेत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे तुकाराम सांगतात. साहजिकच त्यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे. यावर्षी सिमला मिरचीला कमी दर असून त्यांनी लावलेल्या इतर मिरचीच्या वाणाला चांगला भाव आहे. त्यामुळे त्यांचे होणारे नुकसान टळले आहे. मागील वर्षी तयार केलेल्या अद्रक पासून नवीन क्षेत्रावर अजून अद्रक लागवड वाढविली आहे. येत्या काही काळात त्यांना पशुपालनाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत शेतीला जोडव्यवसाय करायचे आहेत. आजवर त्यांना शेळीपालन व दुग्धव्यवसायाचा अनुभव असला तरी याला आता व्यावसायिक रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, असेही चंदनसे बंधू सांगतात.
तुकाराम कौतीक चंदनसे मो. 9922526466