पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राप्रमाणेच आपल्याकडेही सहकारात प्रगती व्हावी अशी बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असूनही खान्देशात अजूनही काही बोटावर मोजण्याइतके उदाहरण सोडले तर सहकार क्षेत्र म्हणावे तसे प्रगत/सफल झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली येथील दादासो रामभाऊजी तराळ दुध उत्पादक सहकारी संस्था ली. या दुध सोसायटीने हा समज खोटा ठरवला आहे. अंतुर्ली गावात आधीच दोन दुध संकलन केंद्र असतानांही महाराष्ट्र सिड्स, पेस्टीसाईड व फर्टीलायझर डीलर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे दुध सोसायटीच्या माध्यमातून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांचा सहकारातील हा अनुभव त्यांच्याच शब्दात…
आम्ही साधारणतः २००६ या वर्षी ५१ सदस्यांच्या मदतीने दादासो रामभाऊजी तराळ दुध उत्पादक सहकारी संस्था ली. या दुध सोसायटीची स्थापना केली. गावात आधीच दोन दुध उत्पादक सोसायटी असतानांही आम्ही काही नवीन करण्याच्या उद्देशाने या दुध सोसायटीची स्थापन करण्याचे धाडस केले. परंतु एका गावात आधीच दोन दुध सोसायटी असल्याने तिसऱ्या दुध सोसायटीला परवानगी देता येत नाही अशी अट आहे. त्यावरही आम्ही मात केली. अंतुर्ली हे गाव पुनर्वसित आहे, त्यामुळे आम्ही त्याठिकाणी नोंदणी करून या अडचणीवर देखील मात केली. असे सांगताना विनोद तराळ यांचा सहकाराच्या क्षेत्रातील सूक्ष्म अभ्यास दिसून आला.
दुध सोसायटीची सुरुवात करतांना पहिल्याच दिवशी ५० ली दुधाने झाली. गावातील आधीच्या दुध संकलन सोसायटीच्या संकलनाला हात न लावता आम्ही इतर शेतकऱ्यांना दुध व्यवसायाला प्रवृत्त केले. त्यांना दुध व्यवसाय हा शेतीला कसा पूरक आहे हे सांगताना सर्वोतोपरी मदत करून या व्यवसायाकडे वळविले. त्याचा परिणाम असा झाला की थोड्याच दिवसात सोसायटीचे एका वेळेचे संकलन हे ३५०- ४०० लिटर्स झाले. वर्षभरात विविध कालखंडात या दुध संकलनात कमी जास्त प्रमाणात बदल होत असतो.
श्री विनोद तराळ.
राज्य अध्यक्ष
महाराष्ट्र सिड्स, पेस्टीसाईड व फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन
दुध व्यवसाय वाढीसाठी सोसायटीचे प्रयत्न
दुध व्यवसाय वाढीसाठी सोसायटीने इतर दुध सोसायटीप्रमाणे प्रयत्न न करता. वेगळी पद्धत अवलंबली. शेतकऱ्यांना दुध व्यवसायासाठी प्रवृत्त करतांना आम्ही त्यांना पशुधन खरेदीसाठी विनाव्याज कर्ज उपलब्ध करून दिले. त्याशिवाय त्या कर्जाचे हप्तेही पशुपालकांच्या सुविधेप्रमाणे ५०० ते १५०० रु याप्रमाणे जमा केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा आमच्यावरील विश्वासही वाढला आणि पशुपालकांनी त्यांच्या पशुधनातही वाढ केली. त्यामुळे साहजिकच सोसायटीचे दुध संकलन देखील वाढले. हे साधे सरळ दुध वाढीचे गमक यावेळी तराळ यांनी सांगिलते.
डेअरी यशस्वी होण्याचे सर्वात महत्वाचे कारण
आमची सभासद संख्या फक्त १५० पर्यंत मर्यादित असली तरी, त्यांच्याकडील पशुधन हे संख्यने जास्त असल्या कारणाने आमचे दुध संकलन जास्त आहे. त्यामुळे कमी कालावधीत डेअरी नावारूपाला आली. सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या डेअरीकडून होणारा सर्व दुध पुरवठा हा जवळपास म्हशीच्या दुधाचा आहे. विदेशी गायीच्या तुलनेच गावात म्हशीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमची डेअरी यशस्वी होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे संघाचे दुधाचे पैसे येण्याच्या आधीच डेअरी पशुपालकांना आपल्या जवळील पैसे रोखीने अदा करते. त्यामुळे पशुपालक व दुध सोसायटी यांच्यात विश्वासाचे नाते तयार झाले आहे.
सोसायटीचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
दररोज एका वेळेचे ३५० लिटर्स दुध संकलित केले जाते. त्यापैकी साधारण १०० ते १५० लिटर्स हे जागेवर विक्री होते तर उर्वरित दुध जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाला अर्थात विकास दुधला पाठविले जाते. संघाला होणारा दुध पुरवठा व खाजगी दुध विक्रीच्या माध्यमातून सोसायटीला वार्षिक सरासरी ८ लाख रु नफा मिळतो. सोसायटीचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी दुध प्रक्रिया किंवा उपपदार्थ बनविणे हा प्रयत्न नाही, फक्त दुध संकलन व विक्री हेच ध्येय आहे. पण सोसायटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करायची असेल तर अजून काही तरी उत्पन्नाचे साधन हवे त्यासाठी सुरुवातीला खामगाव येथील सरकी ढेप विक्री सुरु केली. परंतु त्यात काही वाईट अनुभव आल्याने आता आम्ही दुध संघाच्या पशुखाद्याची विक्री सुरु केली आहे. अंतुर्ली व परिसरातील प्रत्येक गावात दुध संकलन केंद्र आहे. त्यामुळे पंचक्रोशीत दुधाची मोठी उपलब्धता आहे. भौगोलिकदृष्ट्या अंतुर्ली हे अतिशय क्लिष्ट जागेवर वसले आहे. आमच्या गावात येण्यासाठी मध्य प्रदेशाच्या दोन सीमेतून यावे लागते त्यामुळे आम्ही जरी महाराष्ट्र राज्यात असलो तरी मध्य प्रदेश आम्हाला अंतराने जवळ आहे. आमच्या गावापासून जळगाव ८१ किमीवर तर मध्य प्रदेशचे बुऱ्हानपूर हे १९ किमीवर आहे. त्यामुळे दुध संकलन व वाहतूक ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे आम्ही भविष्यात दादासो रामभाऊजी तराळ दुध उत्पादक सोसायटीच्या माध्यमातून या परिसरात एक चिलिंग सेन्टर (शीतगृह) उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून इतर दुध सोसायटी व दुध संघ या दोघांना याचा लाभ घेता येईल. ज्या प्रमाणे फैजपूर येथे असा चिलिंग प्रकल्प आहे तसाच प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने दुध संघासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. दुध संघाचे आमच्या परिसरातील सध्याचे संकलन व भविष्यात त्यात होणारी वाढ या सर्वांचा विचार करून योग्य त्या क्षमतेचे चिलिंग सेंटर आम्ही उभारणार आहोत. त्यांच्या या वाक्यातून त्यांची दूरदृष्टी व नियोजनबद्ध योजना याचा प्रत्यय येत होता.
पशुपालक व्यवसाय साक्षर करण्यासाठी अभ्यासदौरा
साधारणपणे सोसायटीला वार्षिक ७ ते ८ लाख रु नफा विविध माध्यमातून मिळतो. त्या नफ्यातून सोसायटी दरवर्षी सभासदांना बोनस वाटप करते, त्याव्यतिरिक्त गृहउपयोगी व शेतीउपयोगी विविध वस्तूचे वाटपही दरवर्षी केले जाते. आम्ही डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वच्छ व निर्भेळ दुध निर्मितीसाठी गुजरातच्या आणंद येथील अमूल डेअरीची भेट घडवून आणली आहे. त्यामुळे पशुपालक दुध व्यवसायाच्या बाबतीत साक्षर होत आहेत. त्यांना नवनवीन तंत्रज्ञान पहावयास मिळत असून त्यानुषंगाने ते आपल्या पशुपालनात त्याचा उपयोग नक्कीच करतील. आमच्या भागात फार मोठ्या प्रमाणात या व्यवसायाचे आधुनिकीकरण झाले नसले तरीही, या क्षेत्रात कोणते नवीन तंत्रज्ञान आले आहे याबाबतीत पशुपालक साक्षर झालेले आहेत. याचा नक्कीच त्यांना भविष्यात लाभ होईल. अशा अभ्यासवर्गामुळे पशुपालाकांचा आमच्या डेअरीवरील विश्वास देखील वाढला. या वर्षीही आम्ही बारामती येथील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांना पाठविण्याचे नियोजन होते परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास दौरा रद्द केला.
सभासद वैद्यकीयदृष्ट्या संरक्षित करणे हा उद्देश
आजही ग्रामीण भागात वैद्यकीयदृष्ट्या शेतकरी फार जागरूक नाहीत. बरेचसे पशुपालक हे नको त्या बाबीवर पैसा खर्च करतात पण आरोग्य विम्याच्या बाबतीत ते फार उत्सुक नाहीत. त्यामुळे एखाद्या वेळी अशी वेळ आल्यास पशुपालक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या नुकसान होते. यासाठी आमच्या दुध सोसायटीशी जुडलेल्या सर्व पशुपालाकांचा आरोग्य विमा आम्ही काढणार आहेत.
पशुपालकांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ नाही.
शासनाच्या कामधेनु किंवा दुध व्यवसाय वाढीसाठी इतरही काही योजना आहेत. परंतु विविध कागदपत्रे जमा करणे आणि नंतर सर्वोतोपरी स्थानिक बँकेच्या भरवश्यावर अवलंबून राहणे यासारख्या अडचणीमुळे पशुपालकांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वतःच्या भांडवलावर व काहींनी गरजप्रमाणे डेअरीच्या वित्तसह्यावर आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे.
भविष्यातील नियोजन
आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे सोसायटी स्वतःचे चिलिंग सेंटर उभारणार असून ते दुध संघाला प्रती लिटर्स दराने वापरण्यास देणार आहे. यासाठी सोसायटी स्वतःची जागा विकत घेणार असून भविष्यात याच जागेत दुध संघाच्या दुग्धजन्य पदार्थाचे विक्रीचे दालन सुरु करणार आहे. आज गावात मध्य प्रदेशातून पाकीटबंद दुध विक्रीसाठी येते त्याएवजी या जागेतून आपल्याच दुध संघाचे (विकासचे) पॅकिंग दुध व इतर दुग्धजन्य पदार्थ विक्री होतील. जेणेकरून दुध सोसायटीच्या उत्पन्नात अजून वाढ होईल.
हे भविष्यातील नियोजन सांगताना त्यांच्यातील परिपक्व सहकार अभ्यासकाचा अनुभव आला.
शंभर वर्षापासून वि.का.सोसायटी ताब्यात
सहकाराचे बाळकडू मला घरातूनच मिळाले आहे. साधारणपणे आमच्या घरात मागील १०० वर्षांपासून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन पद असून परिसरात केलेले विविध विकासकामे व शेतकरी हितार्ह घेतलेल्या निर्णयाच्या प्रभावाने हा विक्रम साध्य झाला आहे. याचबरोबर आम्ही ग्राहक संस्था देखील सुरु केली असून त्या माध्यमातून पेट्रोल पंप देखील सुरु केला आहे. गावातच भव्य असे मंगल कार्यालय उभारले असून सोसायटीला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी गावाला भेट दिली होती त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात या मंगल कार्यालयाचे लोकार्पण केले गेले. लोकांचे प्रेम व विश्वास यामुळेच सहकार क्षेत्रात काम करणे सोपे होते.घरी दुध वापरून राहिलेल्या दुधापासून अतिरिक्त उत्पन्न
माझ्याकडे ३ म्हशी असून घरी गरजेप्रमाणे दुध वापरून राहिलेले साधारणपणे १० लिटर्स दुध हे दुध सोसायटीला दिले जाते. त्यामुळे घरी गरज भागून राहिलेल्या दुधापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते. बऱ्याच वेळा गरजेप्रमाणे पशुधन खरेदीसाठी डेअरीकरून आर्थिक मदत केली जाते. डेअरीचे पैसे वेळेत मिळत असल्याने कधीही आर्थिकदृष्ट्या अडचण या व्यवसायामुळे येत नाही.
प्रल्हाद दवंगे, पशुपालक
९०४९८७४२५८
शेतीच्या मजुरीचा खर्च दुध व्यवसायातून निघतो
माझी एकूण ४ एकर जमीन असून जोडधंदा म्हणून पशुपालन सुरु केले आहे. आज रोजी माझ्याकडे ५ म्हशी असून त्यांचे एका वेळेचे १५ लिटर्स दुध हे दादासो रामभाऊजी तराळ दुध उत्पादक सोसायटी या गावातीलच सोसायटीमध्ये दिले जाते. दुध व्यवसायामुळे सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेतीच्या मजुरीसाठी लागणारा खर्च हा या व्यवसायातून निघतो आणि शेतीला मुबलक प्रमाणात शेणखत उपलब्ध होते.विलास पाटील, पशुपालक
९७६७०६८०३३
शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये डेअरीचा हातभार
गावात दुध सोसायटी सुरु झाल्यापासून पशुपालक सतत आमच्याशी जुडलेले आहेत. आज ज्या पशुपालकांकडे १ म्हैस किंवा गाय होती त्यांनी यात वाढ करून आज सरासरी ४ ते ५ दुधारू पशु त्यांच्या गोठ्यात आहे. यासाठी गरजेप्रमाणे लागल्यास पशुपालकांना वित्तपुरवठा देखील केला जातो. दुध सोसायटीचे सध्याचे चेअरमन श्रावण महाजन व व्हाईस चेअरमन रविंद्र पाटील व सर्वच १५ संचालक मंडळ विनोद भाऊ तराळ यांच्या सहकारातील प्रदीर्घ अनुभाचा उपयोग करून पशुपालकांच्या हितार्थ विविध कार्यक्रम दुध सोसायटीच्या माध्यमातून राबवीत असतात.
विजय पांडुरंग धनगर
सचिव, दुध सोसायटी