धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे येथील युवा शेतकरी संजय दौलत कोळी यांचे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, त्यांनी काळाची पावले ओळखत तीन वर्षांपूर्वीच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून 35 बाय 15 फुटाच्या जागेत ट्रायकोडमा (जैविक किटकनाशके) निर्मितीचा प्लान्ट सुरु केला होता. या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे 12 हजारांप्रमाणे वार्षिक सुमारे दीड लाखांचे उत्पन्न सुरू झाले. ज्यामुळे त्यांना शेतीतील नुकसानीची फारशी झळ जाणवली नाही. शिवाय कोरोना काळातही शेतीत होणारे नुकसान ट्रायकोडर्मानेच भरुन काढले. विशेष म्हणजे, ते ट्रायकोडर्माची निर्मिती करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करीत नाहीत. त्यामुळे आजमितीस त्यांचे सुमारे 4 हजार शेतकरी ग्राहक आहेत. वाढती मागणी लक्षात घेता, आणखी एक प्लान्ट सुरु करण्याचा संजय कोळी यांचा मानस आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा गावापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर चुडाणे हे लहानसे गाव आहे. या गावात संजय कोळी यांची वडिलोपार्जीत 2 हेक्टर शेती आहे. संजय कोळी यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले असून इतरांप्रमाणे त्यांनीही सुरवातीला नोकरीसाठी भरपूर प्रयत्न केले. ते सातवीत असतानाच 1995 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना नोकरीसाठी अजून प्रयत्न करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यांच्या आईनेच शेती सांभाळून त्यांना बी. ए.पर्यंत शिकवले होते. शिक्षणासोबत ते आईला शेतीकामातही मदत करायचे. त्यामुळे लहानपणापासून त्यांना शेतीचे आकर्षण होऊन शेतीकामाविषयीची गोडी निर्माण झाली होती. यात विशेषतः शेतातील मित्र किटकांविषयी त्यांना अधिक जिज्ञासा होती. त्यामुळे धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या आत्मामार्फत आयोजित वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबिरांना ते आवर्जुन हजेरी लावू लागले. अशातच त्यांना ट्रायकोडर्माचे प्रशिक्षण अधिक आवडले. त्यातून ट्रायकोडर्मा निर्मितीचा प्लान्ट सुरु करण्याबाबत त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली.
अवघ्या 15 बाय 35 जागेत प्लान्ट
संजय कोळी यांनी शेती करीत असताना पूरक व्यवसाय म्हणून 2018-19 मध्ये ट्रायकोडर्मा निर्मिताचा प्लान्ट सुरु केला. तत्पूर्वी, या प्लान्टसाठी लागणारी यंत्रसामुग्रीचा त्यांनी तपास केला. त्यांना एअर कुलिंग बॉक्स बाजारात 90 हजारांना मिळत होता. या कुलिंग बॉक्सची रचना पाहून त्यानुसार प्लायवूडचा बॉक्स त्यांनी स्वतः तयार करुन घेतला. त्यात मोटार, पंखा, लाईट बसविला. हे एअर कुलिंग यंत्र त्यांनी अवघ्या 40 हजारात तयार केल्याने त्यांचा जवळपास 50 टक्के खर्च वाचला. त्यानंतर त्यांनी ऑटोक्लेव यंत्र, मिक्सर (स्वयंपाक घरात वापरले जाणारे), ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठीच्या काचेच्या बाटल्या ठेवण्यासाठी रॅक आदी साहित्य घेतले. ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठी लागणार्या काचेच्या बाटल्या त्यांनी विविध दवाखान्यांमधून गोळा केल्या तर काही विकत आणल्या. त्या स्वच्छ धुवून त्यांचे निर्जंतुकीकरण केले. यातूनही त्यांच्या खर्चात बचत झाली. असे एकूण दीड लाखात त्यांनी संपूर्ण भांडवल उभे केले. चुडाणे गावातच 15 बाय 35 चौरस फुटाचे घर भाड्याने घेऊन त्यात त्यांनी ट्रायकोडर्मा निर्मितीचा प्लान्ट उभारला.
अशी केली जाते ट्रायकोडर्माची निर्मिती
ट्रायकोडर्माची निर्मिती करण्यासाठी 1 किलो बटाटे घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्याची साल काढली जाते. त्यानंतर बटाट्याचे बारीक तुकडे केले जातात. हे तुकडे पाच लिटर पाण्यात टाकून शिजवले जातात. शिजवलेल्या स्टार्चमध्ये 200 ग्रॅम साखर टाकली जाते. त्यानंतर सायक्लिन हे सल्फेट 1 ग्रॅम टाकले जाते. त्यानंतर संपूर्ण द्रावण मिक्स केले जाते. त्यातील 60 ते 80 मिलीलीटर द्रावण एका काचेच्या स्वच्छ बाटलीत टाकले जाते. त्या बाटलीला बुच न लावता, त्या जागी कापसाच्या बोळ्याने बाटलीचे तोंड घट्ट बंद केले जाते. त्यावर कागद लावून त्याला रबर लावले जाते. त्यानंतर ही बाटली ऑटोक्लेव या यंत्रात ठेवली जाते. हे यंत्र सुरु केल्यानंतर यंत्रावरील मीटरचा काटा 15 पर्यंत येऊन द्यावाा लागतो. शिटी झाल्यानंतर त्यातील हवा आपोआप निघते. हे द्रावण स्टेरीलाईज (निर्जंतुकीकरण) झाल्यानंतर चिमट्याच्या साहाय्याने काचेची बाटली काढून एका ट्रे मध्ये ठेवली जाते. त्यानंतर ही बाटली लॅमिनर एअर फ्लो या यंत्रात ठेवली जाते. या यंत्रातील पंख्याच्या साहाय्याने बाटली 15 मिनिटे थंड करुन बाटली बाहेर काढली जाते. या बाटलीत थोडेसे मुख्य कल्चर (जे राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून आणले होते) हे निर्जंतूक केलेल्या सुईच्या सहाययाने टाकले जाते. त्यानंतर पुन्हा कापसाचा प्लग घट्ट बसवला जातो. त्यावर पुन्हा पेपर लावून रबराच्या सहाय्याने बाटलीचे तोंड बंद केले जाते. त्यानंतर ही बाटली एका रॅकवर आडवी ठेवली जाते. दहा दिवसात या बाटलीत ट्रायकोडर्मा बुरशीची पूर्णपणे वाढ होते. अशा अनेक बाटल्यांचा लॉट एकाचवेळी लावता येऊ शकतो. मात्र, हे करत असताना रॅकवर तारखेची नोंद करणे हिताचे ठरते. जेणेकरुन कोणता लॉट कधी लावला, हे समजते. दहा दिवसात या बाटलीत पूर्णपणे ट्रायकोडर्माचे कल्चर तयार झालेले दिसते.
पावडर व लिक्विड स्वरुपात पॅकिंग
दहा दिवसानंतर तयार झालेले कल्चर लिक्विड किंवा पावडर स्वरुपातही वापरता येते. म्हणजेच, त्याची लिटरमध्ये किंवा किलोमध्ये पॅकिंग करता येऊ शकते. दहा दिवसात तयार झालेला ट्रायकोडर्मा हा पूर्णपणे हिरव्या रंगाचा दिसतो. यापासून एक किलो ट्रायकोडर्माची पावडर बनविण्यासाठी दोन बाटलीतील कल्चर लागते. दोन्ही बाटल्यांमधील ट्रायकोडर्मा हे मिक्सरच्या भांड्यात टाकून ते बारीक करुन घेतले जाते. हे मिश्रम टेल्कम पावरमध्ये मिक्स करुन मळले जाते. त्यानंतर हवेत थोडा वेळ सुकवून पारदर्शक (ट्रान्सफरंट) असलेल्या प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग केले जाते. तर लिक्विड स्वरुपात तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात गुळ टाकून ते मंद आचेवर उकळले जाते. त्यानंतर ते थंड झाल्यावर त्यात दोन बाटल्यांमधील तयार झालेला ट्रायकोडर्मा मिक्स केला जातो. तथापी, एक लिटरच्या पॅकिंगला खर्च जास्त येत असल्याने पाच लिटरच्या कॅनमध्ये त्याची पॅकिंग केली जात असल्याचे श्री. कोळी यांनी सांगितले. मागणीनुसार माल तयार करुन त्याचा पुरवठा केला जातो. ट्रायकोडर्माचा वापर कसा व केव्हा करावा, याबाबतचे मार्गदर्शनही ते शेतकरी ग्राहकांना करीत असतात. विशेष म्हणजे, ट्रायकोडर्माच्या निर्मितीसाठी संजय कोळी यांना पत्नी मनीषा कोळी या देखील मदत करीत असतात. शिवाय एका युवकालाही या प्लान्टमुळे रोजगार मिळाला आहे.
नुकसानीवर केली मात
संजय कोळी हे आपल्या दोन हेक्टरवर कापूस, मिरची व कडधान्याचे उत्पादन घेतात. यंदा त्यांनी कापसाची लागवड केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने कापसाची दुबार करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले. अशातच बोंडअळीचीही लागण झाली. त्यामुळे सुमारे 40 टक्के नुकसान झाले. कापसातून 90 हजारांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, तेवढेही मिळणार नाही, अशी भीती आहे. ट्रायकोडर्माच्या प्लान्टमधून दरमहा नियमित उत्पन्न मिळत असल्याने या नुकसानीची फारशी झळ जाणवली नाही, असे संजय कोळी आवर्जुन सांगतात. विशेष म्हणजे, कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प असताना आपल्याला ट्रायकोडर्मानेच तारले, असे श्री. कोळी यांनी सांगितले. ट्रायकोडर्माचे प्रशिक्षण घेतले नसते, तर अक्षरशः दोन वेळचे अन्नही मिळणेही कठीण झाले असते, असेही श्री.कोळी यांनी सांगितले. ट्रायकोडर्मा निर्मितीच्या प्लान्टमधून पहिल्यावर्षी 65 हजार, दुसर्यावर्षी 90 हजार व आता तिसर्यावर्षी सुमारे 1 लाख 20 हजारांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. आता 3 लाखांपर्यंत उलाढाल नेण्याचा त्यांना मानस आहे.
चार हजार ग्राहक
तयार होणारा माल कसा विकावा हा प्रश्न संजय कोळी होताच. मात्र, शेतकर्यांना आता जैविक किटकनाशकांचे महत्त्व पटू लागले आहे. रासायनिक किटकनाशकांमुळे जमिनीचा पोत खालावतो. त्यामुळे संजय कोळी यांना ट्रायकोडर्माच्या विक्रीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. शिवाय गुणवत्तापूर्ण ट्रायकोडर्माची निर्मिती ते करीत असल्याने त्यांच्या विक्रीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. संजय कोळी हे भूमिपुत्र गटाचे सदस्य असून कृषीरत्न नावाच्या फार्मर प्रॉड्युसर कंपनीचेही सदस्य होते. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या परिचयाचा त्यांना विक्रीसाठी लाभ झाला. आज त्यांच्याकडून परिसरातील शेतकर्यांसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे चार हजार शेतकरी ट्रायकोडर्माची नियमित मागणी करतात. त्यांना जागेवर माल पोहचविला जात असल्याचे श्री. कोळी सांगतात. ट्रायकोडर्माच्या वापरामुळे मोठा लाभ होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्यांकडून त्यांना मिळू लागल्या आहेत. कृषीरत्न फार्मर प्रोड्युसर कंपनी, शिरपूर या नावाने ते ट्रायकोडर्माची पॅकिंग करुन विक्री करतात.
कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन
संजय कोळी यांना ट्रायकोडर्मा निर्मितीचा प्लान्ट सुरु करण्यासाठी धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे (फळबाग लागवड तंत्रज्ञान), डॉ. पंकज पाटील (एकात्मिक किड रोग व्यवस्थापन), जगदीश काथेपुरी (कृषी विद्या), रोहित कडू (उद्यान विद्या) आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवाय निर्मिती करताना काही अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्याचे कामही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे या प्लान्ट निर्मितीपासून ते उद्योग सुरळीत ठेवण्यापर्यंत आपल्याला कृषी विज्ञान केंद्राचे भक्कम पाठबळ मिळत असल्याचे श्री. कोळी आवर्जुन सांगतात. हा प्लान्ट सुरु केला नसता तर कोरोना काळातील लॉकडाऊन व आताच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे आपल्यावर अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली असते, असेही त्यांनी अधोरेखीत केले. आत्मा कार्यालयाकडून मिळालेले प्रशिक्षणही मैलाचा दगड ठरल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे ट्रायकोडर्मा?
ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे. बुरशी म्हटली की पिकांच्या नासाडीचे चित्र आपल्यासमोर येते. मात्र, काही बुरशी या शेतीसाठी फायद्याच्या असतात. मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात शत्रू व मित्र बुरशी या दोन प्रकारच्या बुरशी असतात. ट्रायकोडर्मा हा सूक्ष्म कामगार आहे, जो रोपांच्या मुळांजवळील भागात (राइजोस्फियर) मध्ये काम करतो. ही बुरशी बहुतेकवेळा सेंद्रिय अवशेषांवर आढळते. म्हणूनच, जमिनीत बुरशीच्या माध्यमातून होणार्या अनेक प्रकारच्या पीक रोगांच्या व्यवस्थापनासाठी ही एक महत्त्वपूर्ण बुरशी आहे. ही मातीत वाढते व तेथेच जगते आणि मुळांजवळील भागात राहून रोपाचे संरक्षण करते. ट्रायकोडर्माच्या जवळपास सहा प्रजाती ज्ञात आहेत. परंतु केवळ दोन ट्रायकोडर्मा विरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आणि उपयुक्त आहे. हे एक जैव बुरशीनाशक आहे आणि विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग टाळण्यास मदत करते. हे रासायनिक बुरशीनाशकांवरील अवलंबन कमी करते. हे प्रामुख्याने रोगजनक जीवांच्या प्रतिबंधासाठी वापरले जाते. त्याचा वापर नैसर्गिकरित्या सुरक्षित मानला जातो. कारण त्याचा वापर केल्याने निसर्गात कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
ट्रायकोडर्मा वापरण्याचे फायदे
ट्रायकोडर्मा हे रोगजनक जीवांच्या वाढीस प्रतिबंध करते किंवा रोगाचा नाश करून रोगमुक्त करते. हे वनस्पतीच्या रासायनिक प्रक्रियेत बदल करून वनस्पतीची प्रतिकारशक्ती वाढवते. म्हणूनच याच्या वापरामुळे रासायनिक औषधांवर अवलंबून असणारी विशेषत: बुरशीनाशक कमी होते. वनस्पतींमध्ये अँटीऑक्सिडेंट क्रियाकलाप वाढवते. टोमॅटोच्या वनस्पतींमध्ये असे आढळून आले, की ज्या मातीमध्ये ट्रायकोडर्माचा वापर केला गेला, त्या मातीत पोषकद्रव्ये, खनिजे आणि अँटीऑक्सिडेंट्सची गुणवत्ता अधिक असल्याचे आढळून आले आहे. ट्रायकोडर्मा हे स्फुरद आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांना विद्रव्य बनवते. त्यामुळे वनस्पतीची वाढ वाढते.
याच्या वापरामुळे अनेक वनस्पतींमध्ये खोलवर मुळांच्या संख्येत वाढ नोंदविली गेली आहे. ज्यामुळे त्यांना दुष्काळातही वाढण्याची क्षमता मिळते. यामध्ये ऑर्गेनोक्लोरिन, ऑर्गनोफॉस्फेट आणि कार्बोनेट कीटकनाशकांसारख्या विस्तृत कीटकनाशकांचा नाश करण्याची सुद्धा क्षमता असते. यामुळे रोपांच्या मुळांच्या संख्येत आणि लांबीत वाढ होऊन पिकांची वाढ जोमदार होते. तसेच रोपांच्या मुळांवर पातळ थर निर्माण होऊन रोगकारक बुरशीचा प्रवेश मुळापर्यंत होऊ शकत नाही. ट्रायकोडर्मामुळे काणी, करपा, रोप कुजणे, मुळकूज, कंठिका कूज, कोळशी कूज, चिकट्या काणी, बोट्रायटिस, ब्लॅक सर्फ यासारख्या अनेक रोगांपासून संरक्षण मिळते. पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते. किफायतशीतर असल्याने खर्चही कमी होतो.
मला ट्रायकोडर्मा प्लान्टच्या उभारणीसाठी कृषी विज्ञान केंद्र तसेच आत्मा कार्यालयाची मोठी मदत झाली. विशेषतः कृषी विज्ञान केंद्राचे मी आभार मानतो. कारण प्लान्टमध्ये येणार्या अडचणींबाबत त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. जैविक किटकनाशकांचे महत्त्व शेतकर्यांना आता पटू लागले आहे. रासायनिक किटकनाशकांच्या वापरामुळे मित्र किटकही मरतात. त्यातून पिकांवर रोग येण्याची शक्यता अधिक असते. कारण मित्र किटक हे शत्रु किटकांना खाऊन जगतात. तर शत्रू किटक हे शाकाहारी असतात. त्यामुळे ते रस शोषण करुन जगतात. परंतु, रासायनिक खतांच्या वापरामुळे ही साखळी ब्रेक होते. त्यामुळे शेतकर्यांनी शेतीसोबतच मित्र किटकांची ओळख करुन घेणे, त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. पुढील काळात मला स्वतःची फार्मर प्रॉड्युसर कंपनी तसेच बचत गट स्थापन करायचा आहे. शिवाय सुडोमोनसया जैविक किटकनाशक निर्मितीचा प्लान्टही सुरु करण्याचा मानस असून वार्षिक उत्पन्न 3 लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. शेतकर्यांनी पुरक व्यवसाय म्हणून ट्रायकोडर्मा निर्मितीकडे वळले पाहिजे.
– संतोष दौलत कोळी, चुडाणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे, मो. 9764482987