अमोल शिंदे/सांगली
भुई भेगाळली खोल, वल्लं र्हाईली न कुटं
पाल्या-पाचोळयाचा जीव वहाटुईशी घुस्महटं
निसर्गकवी ना.धो.महानोरांच्या या ओळी सहज दुष्काळाची दाहकता सांगून जातात. भिषण दुष्काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण दहिवडी ता. तासगांव जि.सांगली येथील मामा-भाचे सुखदेव राजाराम जाधव व प्रशांत ज्योतिराम दगडे हे आहेत. भिषण दुष्काळा असतानांही पुर्वतयारीतून या संकटावर कशी मात करता येते हे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखविले आहे. त्यांनी शेततळ्याचा वापर करीत फायदेशीर अशी द्राक्ष शेती फुलविली आहे. शेततळ्यावरील या बागेतून त्यांना हेक्टरी १५ लाखांचा नफा देखील मिळाला आहे.
सुखदेव राजाराम जाधव यांची दहिवडी येथे वडिलोपार्जित २० एकर जमीन आहे. त्यांची संपूर्ण शेती ही जिरायती होती. डोंगराळ भाग असल्याने तेथे पाण्यासाठी कालवा होणे पण शक्य नव्हता, त्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी इतर दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नव्हता. या भागात पर्जन्यमान अत्यल्प असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी देखील १००० ते १५०० फुट पर्यंत खोल गेली आहे. अशा दुष्काळी स्थितीमुळे स्थानिक तरुणाचा ओढा हा रोजगारासाठी शहाराकडे असतो. पिण्याच्या पाण्यासाठी देखील ५०-६० फुट खोल विहरीत उतरून पाणी काढावे लागते. अशा पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गांवात जाधव व त्यांच्या भाच्याने नोकरीची संधी नाकारून द्राक्ष शेती फुलविली आहे.
दुष्काळामुळे कळली शाश्वत पाण्याची गरज
२००४ या वर्षी जाधव यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुपनलीकेच्या थोड्या पाण्यावर अर्धा एकर द्राक्ष बाग होती. पण २००४ साली पाण्याच्या कमतरतेमुळे पशु पक्षी, जनावरे यांना देखील पिण्यास पाणी नव्हते, तेथे शेतीसाठी पाणी पुरवठा म्हणजे अशक्य होते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील जनावरे कवडीमोल भावाने विकली. पिण्याच्या पाण्यासाठी फक्त टॅकर्सनी पाणीपुरवठा केला होता. त्यामुळे या भीषण दुष्काळात त्याची द्राक्ष बाग देखील काढून फेकावी लागली. याच परीस्थितीची पुन्हा २००९ पुनरावृत्ती झाली. २००४ प्रमाणे याच परिस्थितीने द्राक्ष बाग उपटून फेकावी लागली. लाखो रु खर्च करून जगविलेली फळबाग काढतांना त्यांना शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करणे गरजेचे वाटले .
मामा-भाचे आतुट नाते
जाधव यांचे भाचे प्रशांत दबडे हे त्यांच्याकडेच राहतात. प्रशांत हे २.५ वर्षाचे असतांना वडिलांचे छत्र हरपले तेव्हापासून ते मामाकडेच राहतात. शेती क्षेत्रात नाविन्याचा ध्यास घेतलेल्या जाधव यांनी आपल्या भाच्याला कृषी शाखेतील पदवी शिक्षण दिले. समाजात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत असतांना मामा-भाचा असलेल्या त्यांच्या या जोडीने एक नवीन आदर्श पंचक्रोशीत निर्माण केला आहे. प्रशांतच्या कृषी शाखेतील शिक्षणाचा लाभ जाधव यांना शेतीमध्ये होत आहे. द्राक्ष शेतीसाठी त्यांची कृषी सहायकपदी निवड झालेली असतांना त्यांनी ते पद नाकारले. आणि शेती क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज ते परिसरातील शेतकऱ्यांच्या सेवार्थ कृषी सेवा केंद्र चालवतात.
शेततळे साकारले प्रत्यक्षात
जर शेतीला सोन्याचे दिवस दाखवायचे असेल तर शाश्वत पाण्याची सोय आवश्यक आहे. हे मागच्या दुष्काळात त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यामुळे सतत नवीन काहीतरी करण्याची ध्यास असलेल्या मामा-भाच्यांनी दोन दुष्काळात आपल्या द्राक्ष बागा काढल्यामुळे आता पाण्यासाठी शाश्वत असा पर्याय उभारण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी पुन्हा एकदा द्राक्ष शेतीत आपले नशीब आजमावण्यासाठी कंबर कसली. त्यांनी या सर्व उभारणीसाठी बँक ऑफ इंडिया कडून २० लाख रु कर्ज घेतले. २०१४-१५ या वर्षी त्यांनी शासनाच्या “मागेल त्याला शेततळे ” या योजनेच्या माध्यमातून २५ X २५ आकाराचे ३ कोटी ५० लाख लिटर्स क्षमतेचे शेततळे तयार केले.
द्राक्ष बाग लागवड
पाण्याचे नियोजन झाल्यावर दोन हेक्टर क्षेत्रावर २०१७ या वर्षी द्राक्ष लागवड केली. सुरुवातीला बंगलोर ड़ॉग्रेंज वाणाची रोपे ७.५ X ४ अंतरावर लावली. त्यानंतर साधारणतः ८ महिन्यानंतर ली माणिक चयन १६५० झाडे, तर आर के १३५० या वाणांची झाडे लावून बाग तयार केली. लागवडीनंतर बागेची छाटणी ही ऑगस्ट किंवा ऑक्टोबर या महिन्यात केली जाते.
पाण्याचे नियोजन
शेतीचा बँकबोन हा पाणी आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेती ही किफायतशीर होते. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रासाठी त्यांनी नामाकिंत कंपनीचे ठिबक सिंचन यंत्रणा वापरली आहे. पिकांना एका तासाला साधारणतः ८ लिटर याप्रमाणे पाणी दिले जाते. घरातील सांडपाणी देखील त्यांनी घराच्या आवारात मुरविले जेणेकरून पाण्याच्या पातळीत वाढ होईल.
कृषी केंद्राची स्थापना
द्राक्ष बागेसाठी खुप मोठ्या प्रमाणावर औषध लागते. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या औषधांचा योग्य भावात पुरवठा होण्यासाठी व मोफत सल्ला देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध ठिकाणी पिक पाहणीसाठी त्यांच्या मार्फत इतर प्लॉटवर सहलीचे आयोजन केले जाते. तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.
द्राक्ष मणी लांबीची स्पर्धा
जाधव यांनी त्यांच्या बागेची १० ऑक्टोबर २०१९ रोजी छाटणी केली, तेव्हा प्रतिकूल वातावरणामुळे त्यावर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यासाठी स्थानिक बाजारातील गरजेप्रमाणे विविध औषधे फवारणी करून कीड रोग नियंत्रण केले. द्राक्ष शेतीमध्ये विविध सुधारित वाणाचा प्रवेश झाला आहे, त्याचप्रमाणे बागेतील द्राक्ष मणी किती लांब होईल याबाबत स्पर्धा देखील वाढली आहे. ज्या द्राक्षाला जास्त लांबी आहे त्याची टिकवण क्षमता आणि बाजारभाव देखील जास्त मिळतो असे जाधव सांगतात. पण त्यासाठी द्राक्ष फुलामध्ये असतांना फवारणीचे वेळापत्रक सांभाळावे लागते. जाधव यांना त्यांच्या बागेत केलेल्या काटेकोर नियोजनामुळे द्राक्ष मण्याची लांबी १.८ इंच तर जाडी २२ mm मिळाली
प्रशांत दबडे यांच्या द्राक्षबागेची काही वैशिष्टे
* द्राक्ष घडांची टिकवण क्षमता जास्त
* प्रत्येक घड १ किलोपेक्षा जास्त वजनाचा
* घडास सोनेरी रंग
* एका झाडावर २० किलो माल मिळाला
उत्पादन खर्च व निव्वळ नफा
जाधव यांना त्यांच्या अडीच एकर जमिनीसाठी मजूर, औषधी व इतर वाहतूक व इंधन खर्चासाठी एकूण ५ लाख रु खर्च झाला. पूर्ण क्षेत्रातून ११ हजार पेटी द्राक्ष माल निघाला. चार किलो वजनाच्या एका पेटीसाठी सरासरी १८० रु भाव मिळाला. एकूण उत्पादन २० लाख रु. मिळाले. खर्च वजा त्यांना १५ लाख रु निव्वळ नफा मिळाला.
शेततळ्यारूपाने हमीचा पाण्याचा पर्याय उपलब्ध
द्राक्ष शेती ही खरोखच किफायतशीर आहे, फक्त तुमच्याजवळ पाण्याचा शाश्वत असा पर्याय हवा. आम्हाला शेततळ्यारूपाने हमीचा पाण्याचा पर्याय उपलब्ध झाला. उपलब्ध पाणी साठ्याचा सुक्ष्म सिंचन प्रणाली द्वारे वापर केल्यास नक्कीच शेततळे हा शेतीसाठी चांगला मार्ग आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात एका भागात शेततळे केल्यास शेतीसाठी पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करता येईल.प्रशांत जोतीराम दबडे
मु.दहिवडी ता.तासगांव जि. सांगली
९८९०६३१८४०