शेतीतील नविन पिढीचा रासायनिक शेती पध्दतीवर जास्त विश्वास आहे, आज शेतीत वापरल्या जाणाऱ्या विविध कृषी रसायनांमुळे पर्यावरण व आरोग्याची अपरिमित हानी होत आहे. आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत व खाद्यान्नाच्या गुणवत्तेच्या बाबत ग्राहक आता सजग झाले असून विकसित व विकानशील देशांच्या नागरिकांमध्ये आता सेंद्रिय शेतमालाच्या बाबतीत जागरुकता निर्माण झाली असून या देशांत आता सेंद्रिय शेत मालाची मागणी . दिवसेंदिवस वाढत असून प्रतिवर्ष यात २०-२५ % वाढ होत आहे. हीच जागतिक संधी हेरून महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी या दिशेला पाऊल टाकले असून अनेक गावांचा सेंद्रिय शेतीच्या दिशेला प्रवास सुरु आहे. आपण सेंद्रिय पद्धतीने अन्नधान्य पिकवणारे शेतकरी पहिले असतील पण संपूर्ण गावच अशा पद्धतीने शेती करत असेल असे उदाहरण दुर्मिळच.. आज आपण अशाच एका गावाविषयी जाणून घेणार आहोत जेथे रासायनिक कीडनाशके संपूर्णपणे बंदी आहे.
रत्नागिरी पासून साधारणपणे २५ किमीवर असणारे खानु हे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. जवळपास ४३५ घरांचं गाव असलेल्या खानुमध्ये ३० एकर क्षेत्रावर जैवविविधता उद्यान आहे. भारताचे पहिले पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरू यांनी या गावाला भेट दिली असल्याचे समजते. याच गावात संदीप कांबळे या एक प्रयोगशील शेतकरी असलेल्या व्यक्तीने संपूर्ण गावाच्या मदतीने सेंद्रिय शेतमाल उत्पादित करण्याचा हा अविश्वसनीय प्रयोग राबविला आहे. कोणतीही रासायनिक खते नाही किंवा कीटकनाशक नाही. इथं होते फक्त शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीची शेती ! म्हणूनच हे गाव महाराष्ट्रातील पहिले सेंद्रिय गाव म्हणून गौरविलं गेलंय.
सद्यस्थिती जगभरातील लोक हे आरोग्याच्या बाबतीत सजग झालेले आहे त्यामुळे सेंद्रिय उत्पादन वापराविषयी काही माहिती मिळाल्यास ती लगेच सर्वत्र माहिती होते आणि ग्राहक आपसूकच तयार होतात. असेच या गावाच्या बाबतीत देखील झाले, केवळ भारतच नाही तर जागतिक बाजारपेठेत संपूर्ण गावातील उत्पादित वस्तू विक्रीसाठी आता हे गाव ओळखले जात आहे. तृतीय पक्ष प्रमाणीकरण मिळविणारे राज्यातील पहिले गाव अशीही या गावाची ओळख. गावातील प्रत्येक घरातील कंपोस्ट होऊ शकणारा ओला, सुका कचरा एकत्र करून त्याचे खत तयार करण्यात येते. सेंद्रिय गटाव्दारे शेती करीत असताना कोणत्याही प्रकारची रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर केला जात नाही फक्त दशपर्णी अर्क व जीवामृत तेही स्वतः तयार केलेलं वापरले जाते. एकूणच सेंद्रिय शेतीतून पारंपरिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यात आले आहे. रासायनिक खतांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळू लागल्यानेच सेंद्रिय शेतीला वाढता प्रतिसाद आहे. उत्पन्न जरी कमी असले तरी उच्च प्रतीचा विषमुक्त शेत माल असल्याने जागरूक ग्राहक वाढीव दर देतात. त्यामुळे या प्रकारच्या शेतीत नुकसान न होता फायदाच होत असल्याचे गावकरी सांगतात.
खानू गावातील १८६६ शेतकरी एकूण ९९८ हेक्टर जमिनीचे मालक असून संपूर्ण जमीन सेंद्रिय पिकाखाली असून, आंबा, काजू, काळीमिरी, कोकम, नाचणी, भात, फणस अशा विविध पिकांची लागवड करण्यात येते. गावात नियोजित उद्दिष्टापेक्षा अधिक काजू लागवड करण्यात आली आहे. गावातील सर्व शेतक-यांनी मातीचे प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतातील उत्पादने जगाच्या कोणत्याही बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू शकतात.
रंगीत तांदूळ पिकविणारे गांव
आजवर तुम्ही फक्त पांढरा तांदूळ प्रामुख्याने पहिला असेल. पण रंगीत तांदूळ तर दुर्मिळच हा तांदूळ फक्त वेबसाईट किंवा क्वचित प्रत्यक्षात पहिला असेल. पण प्रामुख्याने ‘वाडाकोलम’ प्रमाणे खानू येथील लाल, काळा तांदूळ स्वत:च्या ब्रॅण्डनेमने बाजारपेठेत दाखल झाला असून, त्याला मागणीही सर्वाधिक आहे. याशिवाय तांबडा काळा पोहा, चुरमुरा उत्पादने बाजारात उपलब्ध असून, त्यासाठीचीही मागणी उत्कृष्ट आहे. या सर्व सेंद्रिय मालाची विक्री ही संपूर्ण गावासाठी एकच ब्रॅण्डनेम वापरून होते
लाल भात हे पारंपरिक पीक असून, काळाभात ‘बेंगलोर’ मधून मागविण्यात आला आहे. भाताचा रंग काळा, लाल असला तरी दोन्ही भात चवीला अप्रतिम आहेत. लोह, जीवनसत्त्व, स्टार्च सर्वाधिक आहे. शिवाय साखरेचे प्रमाण अल्प आहे. खिरीसाठी तसेच आजारपणात मऊ भातासाठी या भाताचा सर्वाधिक वापर केला जातो. पचायला हा भात चांगला असल्यामुळे या भाताला सर्वाधिक मागणी आहे. १३५ ते १४० दिवसात हा भात तयार होत असल्यामुळे शेतकरीवर्गासाठी फायदेशीर ठरत आहे.
खानूखजाना’ या एकाच ब्रॅण्डनेमखाली सर्व बचत गट
या गावामध्ये २८ बचत गट आहेत. याबचत गटांची विविध उत्पादने आहेत मात्र ‘खानूखजाना’ या एकाच ब्रॅण्डनेमने त्याची विक्री सुरू आहे हे विशेष ! गावातील शंभर एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. आरोग्यवर्धक लाल व काळा भात लागवड करून त्यापासून लाल/काळा तांदूळ, पोहे, चुरमुरे यांना मुंबई, पुणे शहराबरोबर अन्य ठिकाणांहूनही चांगली मागणी आहे. त्याच्याही विक्रीसाठी बाहेर जावे लागत नाही, ग्राहकांकडून आगावू मागणी केली जात आहे. यासोबतच या वाणाच्या प्रचारासाठी लाल, काळ्या भाताचे बियाणेही तयार करून विक्री करण्यात येते. लाल तांदुळामध्ये सोनफळ, मूडगा, तूर्ये, सरवटया लुप्त होत चाललेल्या प्राचीन वाणांचे जतन करण्यात आले आहे. काळ्या तांदुळामध्ये गोविंद भोग व काळबायो (स्थानिकवाण) लावण्यात येत आहे.
रसायन मुक्त वि.का.सोसायटी
गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे रासायनिक खते, कीटकनाशके विक्री शंभर टक्के बंद असून, शेतकरी बाहेरूनही रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करीत नाहीत. घर तेथे कंपोस्ट युनिट ही संकल्पना वापरून शेतात लागणाऱ्या सर्व कृषी निविष्ठा या गावातच निर्माण केल्या जातात. घराशेजारी किंवा शेतात कंपोस्ट युनिट बांधण्यात येत आहेत. यामुळे येथील शेतक-यांना सेंद्रिय खतासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरातील ओला, सुका कचरा, परसदारातील पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहेत. त्यासाठी ‘इको-फ्रेण्डली फार्मस’ गटाचे प्रमुख संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गावामध्ये जैवविविधता समिती असून, वृक्षतोडीसाठी शंभर टक्के बंदी आहे. जीवामृत व इतर जैविक कीडनाशक तयार करण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात देशी गाईंचे संवर्धन केले जाते म्हणूनच की काय गावात म्हशींच्या तुलनेत गाईंची संख्या अधिक आहे.
भात लावणीची स्वतःची पद्धत
भात लागवडीसाठी तीन फूट रुंदीचा पाहिजे त्या लांबीचे वाफे तयार करून त्यामध्ये आडव्या रेषा आखण्यात येतात. त्यावर चिमटीने भात पेरणी केली जाते. यापद्धतीमुळे २० किलो बियाणे जेथे लागते तेथे फक्त तीन किलो बियाणे पुरेसे होते. लाल भाताची लागवड सुधारित पेरपद्धतीने केली जाते. यामध्ये लावणी / काढणी केली जात नाही. गावामध्ये शासकीय रोपवाटिका आहे. इथेही सेंद्रिय पद्धतीनेच आंबा, काजू तसेच अन्य रोपे तयार करण्यात येतात.
शासनाकडून गौरव
सेंद्रिय शेतमालाच्या माध्यमातून नाव कमाविणाऱ्या गावाने स्वच्छतेच्या बाबतीतही गौरवास्पद कामगिरी केली आहे. गावामध्ये शोषखड्डा घरोघरी बांधण्यात आला असून, त्यामुळे गावातील डासांचे प्रमाण संपुष्टात आले आहे. गावात स्वच्छता अधिक आहे. सेंद्रिय शेतमालाच्या वापरणे गावातील आजारांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. गावामध्ये एकही क्षय रुग्ण, कुष्ठरोग रुग्ण नाही. त्यामुळे खानू प्राथमिक आरोग्यकेंद्राला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर प्राप्त आहे.
४३५ घरे असलेल्या या गावात घरोघरी शोष खड्डा बनविण्यात आला आहे. या शोषखड्ड्याच्या मॉडेलला जिल्ह्यात व जिल्ह्या बाहेर चांगली मागणी आहे. शोषखड्ड्यामुळे गावातील डासांचे प्रमाण कमी झाले आहे. शोष खड्डा वर्षानुवर्षे भरत नसल्यामुळे त्याचा फायदा तर होतोच शिवाय कचरा शोषखड्ड्यातील बादलीत जमा होऊन दुर्गंधी विरहित सांडपाणी परसदारातील झाडांमध्ये सोडण्यात आले आहे. गावाने तयार केलेल्या या शोषखड्ड्याच्या ‘पेटंट’ साठी प्रयत्न सुरू आहेत.
संपूर्ण गावात सेंद्रिय शेती खालील काही प्रमुख कारणामुळे येथे यशस्वी झाली
* घर तेथे शोषखड्डा, नाडेप कम्पोस्ट टाकी व गांडूळखत युनिट बनवायला लावले.
* एक गाव एक ब्रँड (खानुखजाना) तयार केला.
* सर्व शेतकऱ्यांना 3rd पार्टी सर्टिफिकेशनमध्ये आणले.
* लाल व काळ्या भातावरच काम करायचे ठरविले. त्यामुळे लाल व काळाभात, पोहे व चुरमुरे विक्रीला आणले.
* स्वतःचे लालभाताचे 4 व काळ्या भाताचे 2 प्रकार संवर्धन विकसित केले. यामध्ये लालभात- सोनफळ,
* मुडगा, सर्वट व तुर्ये आणि काळेभात- गोविंदभोग व स्वतःचे प्राचीन काळेबयो अशा 6 जाती आहेत.
* येथील शेतमालाचा भारतभर, नेपाळ व भूतान इ. देशात प्रचार प्रसार करत आहे.
कसा झाला राज्यातील पहिल्या सेंद्रिय गावाकडे प्रवास
गावाच्या या सर्व प्रवासाला सुरुवात करणारे व अंतिम ध्येयापर्यंत पोहचाविण्यात मोलाचा वाटा असणारे प्रयोगशील शेतकरी संदीप कांबळे यांनी हा सर्व प्रवास उलगडला आहे.
मागील १२ वर्षांपासून पाडीत असलेली जमीन त्यांनी २००९ साली कसायला घेतली आणि त्यांना 2009 ला तालुकास्तरीय व 2010 ला जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला मात्र यावेळी युरिया-डीएपी ब्रिकेट वापरल्या होत्या. नंतर त्यांना अभ्यासाअंती असे लक्षात आले की उत्पादन कमी कमी व्हायला लागले आहे. त्यानंतर खरा अभ्यास चालू झाला. शासनामार्फत शेतकरी सहली, अभ्यासदौरे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटी करू लागले. वारंवार कॅन्सरसारखे आजारांबाबत बातम्या वाचायला मिळत होत्या. आणि हे रासायनिक खत-कीटकनाशकांचे परिणाम असल्याबाबत तज्ज्ञांचे मत वाचनात येत होते.
शेतकरी घडविणारे अधिकारी …
नेमकी सेंद्रिय शेतीला सुरुवात कशी करायची याचे ज्ञान त्यांना मिळत नव्हते. त्यावेळी रत्नागिरीचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आरिफ शाह यांची ओळख झाली आणि त्यांच्या एका लेक्चरला बसण्याचा संदीप यांना योग आला आणि सर्व प्रवास सुरु झाला. ते सेंद्रिय शेतीतले तज्ञ आहेत. पुढे त्यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. 2014 ला प्रवर्तकांचे प्रवर्तक या 20 दिवशीय सेंद्रिय शेती प्रशिक्षणात परिपूर्ण शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळाले. आणि तिथून प्रत्यक्ष शेतीला आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना शिकवायला सुरुवात झाली.
शाह साहेबांमुळेच समृद्धी ऑरगॅनिक फार्म पुणेमार्फत जिल्हयातील 2500 शेतकऱ्यांना NPOP अंतर्गत तृतीयपक्ष प्रमाणीकरण प्रक्रियेत शेतकऱ्यांना लाभ मिळवून मिळाला. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आरिफ शाह यांच्या रूपाने त्यांना खरा मार्गदर्शक मिळाला.
सुरुवात ‘न’ च्या पाढयाने
संदीप यांनी गावात एकट्याने सेंद्रिय सुरुवात केली. कोणीही आशा पद्धतीची शेती करायला तयार होत नव्हते. पुढे 4 गावचा मिळून 50 शेतकऱ्यांचा आत्मा अंतर्गत इको फ्रेंडली फार्मर्स ग्रुप तयार केला. लोकांना स्वतःच्या पैशाने घरी आणून शेती दाखवत हळूहळू प्रचार-प्रसार होऊ लागला. ग्रामपंचायत, ग्रामसभा, सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी माहिती देऊ देत गावातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलू लागली. आता 28 बचत गटांना एकत्रित करून लाल व काळ्या भातावर काम करण्यास सुरुवात केली.
त्याआधी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष व संचालकांना याबाबत जागृती करून या पुढे गावात कोणत्याही प्रकारचे रासयनिक खते- कीटकनाशके विक्री करण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे आरोग्यावर त्याचा दृश्य परिणाम जाणवू लागला. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिले व एकमेव संपूर्ण गावच सेंद्रिय झाले. एवढेच नव्हे तर संपूर्ण गावच प्रमाणिकरणाखाली आले. आज रोजी लाल तांदळाला 100/- रु. व काळ्या तांदळाला 140/- रु. दर मिळत आहे. मुंबई व पुण्यातून मोठी मागणी आहे.
रत्नागिरी ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
आज गावातील शेतमाल हा आत्मा अंतर्गत थेट ग्राहकांना विक्री केला जातो. गटाला आत्मा अंतर्गत पिकअप, बोलेरो घेऊन आंबा- काजूची थेट विक्री करण्यासाठी वापर करत आहे. गटामार्फत शेती करायला देखील काही सीमा असल्याने व यापेक्षा मोठे काम करायचे असल्यामुळे रत्नागिरी ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना 2018 साली करून कंपनी मार्फत विक्री व्यवस्था उभी केली आहे. कंपनीचा संस्थापक /अध्यक्ष स्वतः संदीप आहे. आजवर त्यांनी दीड लाखांच्यावर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. Wtsp, मेसेज, वेबिनार व प्रत्यक्ष फोनवरूनही ते मार्गदर्शन करत आहे. संपूर्ण भारत भर तसेच भूतान व नेपाळ येथेही शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.
विना सहकार नाही उद्धार!
विना सहकार नाही उद्धार या उक्ती प्रमाणे शेतीव्यवसायामध्ये देखील एकत्र येऊनच काम करावे लागेल. अन्यथा शेतीचे तुकडे होत आहेत आणि या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये शेती करून आपला उद्धार होणे कठीणच आहे! त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गटशेतीला प्राधान्य देत एकत्र येणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून शेती केली तर जगाचे मार्केट आपण काबीज करू शकतो हे यशस्वी उदाहरण या गावाने आज संपूर्ण राज्यासमोर ठेवले आहे.