परभणी जिल्ह्यातील ब-याच शेतक-यांनी अलिकडच्या काही काळापासून शेतीपासून शास्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून तूतीची लागवड करुन त्यापासून रेशीम कोष उत्पादनास सुरुवात केली आहे. वर्षाकाठी सहा-सात कोष निर्मीतीचे पिके घेता येवू शकत असल्याने दिवसेंदिवस रेशीम उत्पादनाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यातील देवठाणा, बरबडी, कळगाव, चुडावा गावातील शेतकरी रेशीम कोष उत्पादनात अघाडीवर आहेत. त्यातून खर्च जाता चांगला नफा मिळत आहे. त्यामूळे या कृषीपुरक उद्योगाकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. पूर्णा तालूक्यातील चुडावा येथील शेतकरी गोविंद टिकारामजी देसाई या युवा शेतक-याने तर तब्बल तिन एकर क्षेत्रात तूती लागवड करुन रेशीम कोष निर्मीतीत उत्तूंग भरारी घेतली आहे. रेशीम शेती त्यांच्या शेतीच्या अर्थकारणाला चालना देत आहे.
कला क्षेत्रातील पदवी घेतलेल्या २९ वर्षीय गोविंद यांनी नोकरी शोधण्यात वेळ न घालवता आपली वडिलोपार्जीत २४ एकर शेती करण्याचे ठरवले. त्यांची शेती चुडावा गावालगतच पूर्णा नांदेड रोडवर असून त्यांचे वडिल टिकारामजी पाटील देसाई यांनी आपल्या शेतीत विहीर, बोअर व शेततळे खोदून सिंचनाची सोय केलेली आहे. एकट्या वडिलास शेतीचे मोठे क्षेत्र कसण्यास जिकरीचे जात असल्याचे पाहून त्यांनी वडीलास शेती कामात मदत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या शेतीत सध्या ८ एकर ऊस, १० एकर सोयाबीन ही पीके असून तिन एकरवर तूतीतीची लागवड आहे. पारंपरिक पिका सोबतच शेतीत काही वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी २०१७ ला रेशीम उद्योगास प्रारंभ केला. सुरुवातीस शेडची उभारणी नसल्याने दुस-या शेतक-याच्या शेडमध्ये रेशीम कोषाचा पहिला हंगाम यशस्वी केला. त्यात १२५ अंडीपूंजा पासून १२० किलो रेशीम कोषाचे उत्पादन घेतले. त्यामुळे रेशीम शेती हक्काचे उत्पन्न मिळवून देते याची खात्री आल्याने तेंव्हा पासून आजपर्यंत रेशीम शेतीत सातत्य ठेवले आहे. ईतर पिकापेक्षा रेशीम पिक परवडणारे असल्याचा विश्वास आला. आता तिन एकरवर लागवड केलेल्या तूती चा-यापासून वर्षाकाठी १३ ते १४ क्विंट्ल रेशीम कोषाचे उत्पादन मिळत आहे.
२०१७ ला एक एकर तुतीची लागवड केली असताना पुढे क्षेत्र वाढवत आता तिन एकरवर नेले असून ४ बाय २ फूट अंतरावर तूतीची लागवड आहे. पावसाळा संपल्यानंतर ठीबकने तूतीस पाणी दिले जाते.
खत व्यवस्थापन
तूती चा-याची छाटणी केल्यानंतर अंतरमशागत करुन एकरी ४० कि.ग्रा. युरिया, ५० कि.ग्रा १०-२६-२६ हे रासायनिक खत पेरुन घेतात. प्रत्येक वेळची चारा पाला छाटणी केल्यानंतर याच खताची मात्रा देवून तूती चा-याचे व्यवस्थापन करतात. तसेच तूती पिकावर पाने आखडणे, मावा तुडतुडे हे रोग येतात. त्याच्या नियंत्रणासाठी जिल्हा रेशीम अधिकारी गोविंद कदम व अन्य रेशीम कर्मचारी यांच्या मार्गदर्शनानूसार योग्य ते औषधी फवारणी करुन घेतली जाते.
संगोपनगृहाची (शेड) ची उभारणी
रेशीम कोषाची निर्मीती करण्यासाठी त्यांनी शेतीत ६० बाय २९ फूट अकाराचे संगोपनगृह शेडचे बांधकाम केले आहे. यासाठी पूर्व-पश्चीम बाजूच्या भिंती १४ फूट उंच आणि दक्षिण-उत्तर बाजूच्या भिंती ५ फूट उंची अकारात विटा सिमेंटनी बांधून घेत लोखंडी एंगल बसवून वरती टिन पत्रे तर खाली शहाबादी फरशी बसवून शेडचे मजबूत बांधकाम केले आहे. आत मध्य रेशीम कोष निर्मीती व अळ्यांच्या संगोपनाकरीता २० बाय ५ फूट अकाराचे ४ तर १० बाय ५ फूट अकाराचे २ असे एकूण ६ लोखंडी रॅक बसवण्यात आले आहेत. या रॅकवर ३०० अंडीपूंज ठेवण्याची क्षमता आसून त्यापासून चांगले व्यवस्थापन झाले तर २५० किलो रेशीम कोष उत्पादीत होतात.
रेशीम कोषाचे उत्पादन
वर्ष २०१७ ला एक एकर तूती चा-यापासून रेशीम कोषाच्या एका क्राॅपचे १२५ अंडीपूंजापासून १२० किलो रेशीम कोष उत्पादीत झाले होते. त्या कोषाला कर्नाटक राज्यातील बेंगलौर जवळील रामनगर रेशीम बाजारात ३५० रु प्रती किलो दर मिळाला. कोष विक्रीतून ४२००० हजार रु उत्पन्न मिळाले. त्यानंतर वर्ष २०१८ ला तिन एकरवर तूतीतीची लागवड होती. तिन एकर तूती चा-यापासून एका वर्षात खालीलप्रमाणे उत्पन्न सुरु आहे.
वर्ष क्राॅप उत्पादन दर खर्च निव्वळ उत्पन्न एकूण उत्पन्न
२०१७-१८ ६ १४ (क्विंट्ल) ३०० रु ९० हजार ३,३०,००० ४,२०,०००
२०१९-२० ७ १५ (क्विंट्ल) १८० व ४०० रु १,००००० ४,२०,००० ५,२०,०००
यावेळी मार्च नंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे लाॅकडाऊन बंदीमुळे कोषाचे दर निम्यावर आल्याने प्रति किलोस १८० रु भाव मिळाला. आता पर्यंतच्या रेशीम कोष विक्रीतून ७,८०,०००(सात लाख ऐंशी हजार रु) निव्वळ उत्पन्न मिळाले असून या पुढे क्राॅप घेणे चालू आहे. शिवाय रेशीम उद्योगास प्रोत्साहनपर जिल्हा रेशीम अधिकारी यांच्या सहकार्याने रोजगार हमी योजनेतून तिन वर्षात २ लाख ८२ हजार रु आनूदान मिळाले आहे.
समर्थ रेशीम बाजारपेठेमुळे होतेय फायदा
पूर्णा येथील कृषी उद्योजक डॉ संजय लोलगे यांनी पांगरा रोडवरील आपल्या ७ एकर जमीनीत सर्व सोयीयुक्त बांधकाम करुन समर्थ कृषी बाजारपेठ व रेशीम कोष खरेदी बाजार सुरु करुन तेथेच नवकृषी उद्योजक संभाजी पाटील मोहीते महागावकर यांनी रेशीम धागा निर्मीती उद्योग चालू केल्याने संबंध महाराष्ट्र राज्यातील रेशीम उत्पादक शेतकरी आपला रेशीम कोष विक्रीला आणीत आहेत. तेथे चांगला दर मिळत असल्याने आता कर्नाटक येथे जाण्याची गरज नाही. असे गोविंद देसाई यांच्यासह असंख्य रेशीम उत्पादक शेतक-यांनी सांगीतले.
रेशीम उद्योग हा ईतर पिकाच्या तुलनेत शेतक-यांना परवडणारा असून शास्वत उत्पन्न देणारा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कमी खर्चात अधिक उत्पन्न देण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या उद्योगाला चालना मिळावी यासाठी कर्नाटक राज्याप्रमाणे प्रति किलो रेशीम कोषाला १०० रु आनूदान देणे गरजेचे आहे. आताच्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे लाॅकडाऊन झाल्यामुळे कोषाला अतिशय कमी दर मिळत असल्यामुळे रेशीम उत्पादक शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
गोविंद देसाई,चुडावा जि परभणी.
मो. ९५११२८५१७०