आज जग महिला सक्षमीकरण व आरक्षण याबाबत जागरूक झाले आहे. याबाबतीत पाश्चिमात्य देश जास्तच पुढारलेले आहेत. त्यांच्यामते पूर्वीपासून त्यांच्या देशात महिला या आधुनिकीकरण अंगीकारून विविध क्षेत्रात नेतृत्व करतांना दिसतात. आपल्याकडे अलीकडील काळात पितृसत्ताक (पुरुषप्रधान) संस्कृती आल्याने साधारणपणे आपलाही हाच ढोबळ अंदाज आहे की महिला या फक्त चूल आणि मुल याच फेऱ्यात गुरफटून गेलेल्या आहेत. पण तुम्ही जर थोडं इतिहासात डोकावलं तरी तुमचा हा अंदाज एकदम चुकीचा ठरेल. इतिहासात तुम्हाला कर्तृत्ववान महिलांची लांबलचक यादीच दिसेल. याच यादीमध्ये मणिपूर मधील महिलांनी ५०० वर्षांपासून एक वेगळी ओळख जगभरात तयार केली आहे व आजही ही ओळख जपली आहे.
इतिहासात डोकावतांना
आर्यांच्या आगमनापूर्वी भारतामध्ये राहणाऱ्या सिंधू संस्कृती व अन्य द्राविडी जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती होती. आर्यांच्या आगमनानंतर पितृसत्ताक पद्धतीच प्रभावी ठरली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतात ईशान्येस खासी व गारो या जमाती आणि दक्षिणेस तोडा, कादर, नायर हे मातृसत्ताक व्यवस्था पाळणारे समाज होते. परंतु आधुनिक समाजाच्या संपर्कामुळे त्यांच्यात पितृसत्ताक पद्धतीचा हळूहळू शिरकाव होत गेला. हाच प्रकार ईशान्येस असलेल्या खासी व गोरो या समजाबाबत होत असून तेही हळूहळू पितृसत्ताक होण्याच्या मार्गावर आहेत.
पितृसत्ताक किंवा मातृसत्ताक कुटुंब पद्धती असली तरी कर्तृत्ववान महिलांची लांबलचक यादी येथे देणे शक्य नसले तरी, इतिहासकालीन कालखंडातील काही प्रातिनिधिक महिलांची नावे येथे सांगता येतील ज्यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप सोडली असून ती वरील अंदाज चुकीचे ठरवतील. विदर्भकन्या म्हणून राज्य करणारी महन्मंगल, स्वराज्य प्रेरक राजमाता जिजाऊ, सर्वोत्तम प्रशासन देणाऱ्या अहिल्याबाई, ब्रिटीशांच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या लक्ष्मीबाई, १८५७ च्या उठावात क्रांतीकारकांना रसद पुरविणाऱ्या नर्तकी अजीजान या वीरांगनाप्रमाणेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी यासारख्या सामाजिक व राजकीय पटलावरील महिलांचादेखील राज्याला इतिहास आहे. देशाचा इतिहास पाहिल्यास ताराबाई, आनंदीबाई, सुलताना रझिया, नूरजहा, बंगालची राणी भवानी, गुजरातची राणी मयणल्लम, कित्तूरची राणी चनम्मा येथपर्यंचा हा प्रवास तो असून निरंतर असाच सुरु असून आहे. त्यामुळे भारतीय महिला या कर्तृत्ववान होत्या नव्हे; आजही आपली संस्कृती जपत त्या आपले महत्व वेळोवेळी दाखतच आहे. अशीच एक संकृती मणिपूर मधील महिलांनी जपली आहे.
मणिपूर दृष्टिक्षेपात
१९७२ ला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेल्या भारतातील पूर्व सीमेवरील एक राज्य ‘रत्नभूमी’ (द लँड ऑफ ज्युवेल्स) नावाने परिचित, सेव्हन सिस्टर मधील प्रमुख राज्य असलेल्या मणिपूर राज्यातील महिलांनी देखील इतिहासाची ही श्रुंखला ५०० वर्षापासून सुरु ठेवली आहे; तीही एका बाजाराच्या माध्यमातून, हो मणिपूर मध्ये ५०० वर्षापासून फक्त महिलांद्वारे चालविला जाणारा बाजार सुरु असून आजगयात तो अखंडपणे सुरु आहे. २२,३५६ चौ. किमी. क्षेत्रफळ असलेल्या मणिपूरमध्ये ६० टक्के लोक मेइतेई-प्रंगाल जमातीची आहेत, परंतु आश्चर्य म्हणजे राज्याच्या एकूण जमिनीपैकी केवळ १० टक्के जमीनी त्यांच्या मालकीच्या आहेत. नागा, कुकी, जोमिस इत्यादी समुदायाची राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के आहेत. परंतु ९० टक्के जमीन या लहान समुदायांच्या मालकीची आहे. मणिपूर प्रदेश त्याच्या इतिहासात २०-२५ विविध नावांनी ओळखला जातो. मेइती व मेइतेई संबंधित नावे मेइत्राबाक, मेइत्रिलेपीपाक आणि इतरही विविध नावे आहेत. परंतु सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात या भागातील राजा भाग्यचंद आणि त्याच्या वंशजांनी जारी केलेल्या नाण्यांवर ‘मणिपुरेश्वर’ हे नाव कोरले आहे. याच्या आधारे त्याचे नाव मणिपूर असे ठेवले गेले.
राज्याच्या मध्यभागी असलेला मैदानी प्रदेश आणि त्याच्या भोवतालचा पर्वतमय प्रदेश असे मणिपूरचे दोन विभाग पडतात. राज्यातील सुमारे ५९ टक्के लोकसंख्या खोऱ्यात असून ४१ टक्के लोक डोंगराळ भागात आहेत. डोंगराळ भागात नागा, नागा, कुकी, पाइते तर मैदानी भागात मेइती राहतात. मेइती लॉन (मणीपुरी) ही या राज्याची मुख्य भाषा आहे. मणिपुरी ही संपूर्ण राज्यातील सामान्य संपर्क भाषा आहे. मणिपूर हे एक अतिशय समृद्ध संस्कृती असलेले राज्य आहे. इथली हिंदू लोकसंख्या सर्वात जास्त वैष्णवामुळे प्रभावित आहे. येथील मैदानी भागातील लोकांमध्ये कृष्ण भक्ती प्रचलित आहे. केरळच्या कथकली प्रमाणेच मणिपुरी नृत्य जगभरात प्रसिद्ध आहे. राज्याचे ६८% क्षेत्र वनाच्छादित असून ते पर्वतीय भागात आढळते. पाइन, फर, ओक, बांबू, साग, सिंकोना, पाम हे येथील प्रमुख वृक्षप्रकार आहेत. जरदाळू, सफरचंद, नासपती, अलुबुखार ही फळझाडेही भरपूर आहेत. काही ठिकाणी चहाचे मळे आहेत. गवताची कुरणेही पुष्कळ आहेत. मणिपूर खोऱ्यात मात्र विरळ वनश्री आढळते. जळाऊ व इमारती लाकूड हे जंगलातून मिळणारे प्रमुख उत्पादन असून बांबू, गवत, सुगंधी द्रव्ये, दालचिनी ही इतर उत्पादनेही मिळतात. वनसंपत्तीपासून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळाले.
चीनला हरविणारे राज्य मणिपूर
प्राचीन मणिपूरसंबंधी काही पुराणकथांतून माहिती मिळते. प्राचीनकाळी हा प्रदेश सागरमग्न होता; परंतु अनेक देवदेवतांनी येथे मातीची भर घालून भूभाग निर्माण केला. या भूमीवर शंकर– पार्वती क्रीडेसाठी अवतरले असताना नागराज अनंताने आपल्या मस्तकावरील मण्याने हा प्रदेश प्रकाशित केला, त्यामुळे या प्रदेशाला ‘मणिपूर’ हे नाव प्राप्त झाले, असे विविध समज या राज्याच्या निर्मितीबाबत आहे. म्हटले जाते. मेकलाय, कासी, मकेली, मागली, मागलन इ. नावांनीही हा प्रदेश वेळोवेळी ओळखला जात असे. अर्जुनाची पत्नी चित्रांगदा ही येथील राजकन्या होय. तिचा पुत्र बभ्रुवाहन हा या प्रदेशाचा राजा झाला, अशी महाभारतात कथा आहे. आर्याच्या आगमनापूर्वी भारतात मणिपूरमध्ये एक स्वतंत्र व प्रगत राज्य नांदत होते, असे सांगितले जाते. त्यानंतर मात्र येथे आर्यांनी वस्ती केली. सतराव्या शतकापर्यंत येथील राजघराण्यात ३६ राज्यकर्ते होऊन गेल्याचे सांगितले जाते. तेराव्या शतकात या प्रदेशावर चिनी आक्रमकांनी हल्ला केला होता; परंतु त्यात त्यांचा पराभव होऊन अनेक चिनी आक्रमक पकडले गेले. त्यांच्याकडूनच रेशीम उत्पादन व वस्त्रे विणण्याची तसेच विटांची घरे बांधण्याची कला येथील लोकांना अवगत झाल्याचे सांगितले जाते. पंधराव्या शतकातील राजा क्याम्बाच्या कारकीर्दीत श्रीचैतन्य प्रभूंच्या प्रभावामुळे या प्रदेशात वैष्णव धर्माचा प्रसार झाला.
तत्कालीन राजा (१८५०) देवेंद्रसिंह गादीवर आला. त्यानंतर चंद्रकीर्तीने ३५ वर्षे राज्यकारभार केला. त्याच्यानंतर मात्र राजघराण्यात अनेक प्रतिस्पर्धी गट निर्माण झाले.या गटांच्या सत्तास्पर्धेचा फायदा घेऊन इंग्रजांनी मणिपूर आपल्या ताब्यात घेतले (१८९१). त्यावेळी युवराजपदावर असलेला टिकेन्द्रजित (चंद्रकीर्तीचा मुलगा) आणि सेनापती खंगाल यांना १३ ऑगस्ट १८९१ रोजी इंफाळच्या पोलो मैदानावर फाशी देण्यात आले आणि कुलचंद या शेवटच्या राजाला हद्दपार करण्यात आले आणि मणिपुरमधील राजसत्ता संपुष्टात आली तरीही या विविध कालखंडातील घडामोडींचा परिणाम येथे सुरु असलेल्या ५०० वर्षांच्या परंपरेवर झाला नाही.
फक्त लग्न झालेल्या महिलाच चालवितात दुकान
या बाजाराचा एक न बदलणारा नियम आहे त्यानुसार या ठिकाणी फक्त लग्न झालेल्या महिलांनाच दुकान सुरु करण्यास परवानगी आहे. भारतातील हे एकमेव असे मार्केट आहे, ज्याठिकाणी कोणत्याच कामांना पुरुषांना परवानगी नसून सर्व काम ही महिलांच्याद्वारे केली जातात. महिला शक्ती अनुभवायची असेल तर एकवेळ अवश्य इंफालच्या इमा मार्केटला अवश्य भेट द्या. इमा मार्केटचा स्थानिक भाषेतील अर्थ आहे ‘मदर मार्केट’ यालाच नुपी कीथल नावाने देखील ओळखले जाते.मणिपूरची ५०० वर्षांची परंपरा
पाश्चिमात्य देशांच्या महिला पुढारलेल्या होत्या व भारतात महिलांवर विविध बंधने होती या भ्रमाला/आरोपाला मणिपूरची राजधानी इंफाळ मध्ये असलेले ५०० वर्षांपासून महिलांच्याद्वारे संचालित केले जात असलेले ‘मदर मार्केट’ हे एक ठोस प्रातिनिधिक उत्तर आहे. ४००० दुकाने असलेला हा संपूर्ण बाजार ५०० वर्षापासून फक्त महिला चालवितात हा आशियातील सर्वात मोठा बाजार असून दैनंदिन गरजेच्या जवळपास सर्वच वस्तू या ठिकाणी मिळतात. दररोज येथे शेकडोच्या संख्येने ग्राहक येतात. याठिकाणी जवळपास ४०००+ महिला व्यापारी असून येथे तुम्हाला भाजीपाला ते घरात लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतील.
५०० वर्षापूर्वी राजे महाराजांच्या कालखंडापासून ज्या पद्धतीने हा बाजार सुरु केला होता त्याच पद्धतीने तो आजही सूरुच आहे. हा बाजार सुरु करण्यामागे अनेक रंजक कथा आहे. मणिपूरमध्ये तेव्हा “लैलप” नावाची परंपरा अस्तित्वात होती अशी मान्यता आहे, त्या परंपरेनुसार मेइतेई समुदायाच्या पुरुषांना कामासाठी राजाच्या दरबारात जावे लागत असे. त्यामुळे घरी असलेल्या महिलांनाच घर सांभाळावे लागत असे. त्यावेळी या महिलांनी घराबरोबरच शेती व दुकान अशी तिहेरी जबाबदारी स्विकारली तेव्हापासून अजगयात ही परंपरा सुरूच आहे. कालांतराने राजेरजवाडे समाप्त झाले आणि “लैलप” प्रथा संपुष्टात आली, तरीही पुरुषांनी नंतर बाहेर इतर कामे करणे सुरु केले आणि महिलांनी दुकान सांभाळणे सुरूच ठेवले.
अजून एका मान्यतेनुसार १७८६ मध्ये महिलांनी या बाजाराची सूत्रे हाती घेतली. चीन-बर्मा युद्धाच्या वेळी सर्व पुरुष हे युद्धाला गेले त्यावेळी परिवाराची जबाबदारी ही महिलांवर आली आणि त्यांनी तेव्हापासून बाजार सांभाळायला सुरुवात केली आणि आजही त्याच हा बाजार सांभाळतात. तसेच अजून एका प्रचलित कथेनुसार १५३३ मध्ये हा बाजार सुरु झाला कारण त्यावेळी घरातील सर्व पुरुष मंडळी ही भातशेतीच्या कामासाठी शेतात जात असत, त्यामुळे घरी एकट्याच राहणाऱ्या महिलांनी हळूहळू विविध व्यवसाय सुरु करत या बाजाराला सुरुवात केली. बाजार सुरु होण्याबाबत मतभिन्नता असली तरी आशियामधील हा एकमेवाद्वितीय महिलांद्वारा संचालित केला जाणारा बाजार आहे. आणि हा एक आंतरराष्ट्रीय विक्रमच आहे. सरकारने २०१० मध्ये याठिकाणी जवळच अजून एक नवीन मार्केट सुरु करून दिले आहे. येथे तुम्ही गरजेच्या सर्वच वस्तू घेऊ शकतात. याठिकाणी ४००० महिला आपल्या दुकानातून विविध वस्तूंची विक्री करतात. इतर मार्केट प्रमाणे याठिकाणी व्यावसायिक स्पर्धा नाही. जर तुम्हाला एखाद्या दुकानातील वस्तू आवडली नाही, तर तीच दुकानचालक महिला तुम्हाला दुसऱ्या दुकानात जायला मदत करते. अशा प्रकारची निकोप व्यावसायिक स्पर्धा येथे आहे.
भूत झोलकिया ४०० पट जास्त तिखट
भूत झलोकिया ही मिरची इतर मिरचीच्या तुलनेत ४०० पट अधिक तिखट आहे त्यामुळेच तिची नोंद २००७ साली गिनीज बुक ऑफ रिकॉडर्स मध्ये नोंद झाली असून, आसाम, मणिपूर व नागालैंड या ठिकाणी तिची शेती केली जाते. मिरचीचा तिखटपणा स्कोवाइल हीट यूनिट (एसएचयू) असा मोजला जातो. सामान्य मिरचीचा स्तर 2500-5000 एसएचयू असतो तर, भूत झोलकिया मिरचीचे तिखट माप 10,41,427 एसएचयू इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. याला स्थानिक लोक काली मिर्च, घोस्ट चिली, घोस्ट पेपर व नागा झोलकिया या नावाने देखील ओळखतात. जवळपास ९० दिवसात तयार होणाऱ्या या मिरचीचा वापर हा मुख्यत्वे मसाला म्हणून केला जातो. तसेच DRDO ने याचा वापर करून महिलांच्या सुरक्षेसाठी वापरला जाणारा स्प्रे देखील तयार केला आहे. याचबरोबर सुरक्षा दल याच्या पासून निर्मित अश्रुधूर देखील वापरतात.
यासाठीही प्रसिद्ध
मदर मार्केट प्रमाणेच मणिपूर खालील अजून काही गोष्टींसाठी देखील प्रसिद्ध आहे. सतराव्या शतकापासून वैष्णव संप्रदायाच्या प्रभावामुळे येथील राहणीमानावर बराच फरक पडला. केळीच्या पानाचे इथे फार महत्त्व आहे व त्याचेच विविध आकाराचे द्रोण व ताटे बनवून पारंपरिक प्रकारे अन्न वाढले जाते. दक्षिणेतही केळीच्या पानाचे महत्त्व व वापर दोन्ही आहे, परंतु कलात्मक वापरामध्ये मणिपुरी लोक फार पुढे आहेत. नृत्याशिवाय मणिपूरचा संदर्भ पूर्ण होत नाही. प्रसिद्ध मणिपुरी नृत्य ही येथील खासियत. या जगप्रसिद्ध मणिपुरी नृत्याविष्काराने तर सर्वांनाच भुरळ घातली आहे. प्राचीन जागोई नृत्यशैलीत भरतऋषींच्या नाट्यशास्त्राच्या आधारे भर घालून सतराव्या शतकात महाराज भाग्यचंद्रांनी या नृत्यशैलीस आज ओळखतो ते स्वरूप दिले. त्याचप्रमाणे हा प्रदेश जगातील सर्वात तिखट मिरच्या पिकवणारा व खणाराही असून, भूत झोलकिया, नागा मोरीच अशा जगातील सर्वात तिखट मिरच्यांच्या जातीसाठी हे राज्य प्रसिद्ध आहे.
पोलो या खेळाचे मणिपूर हे जन्मस्थान. इथे ब्रिटिशांनी पुलु खेळ सर्वप्रथम पहिला व पुढे थोड्याफार बदलाने पोलो खेळाची बांधणी करण्यात आली. राज्य लहान असले तरी क्रीडा प्रकारात खूप अग्रस्थानी आहे. सर्वश्रुत मेरी कोम, वेट लिफ्टर कुंजूरानी देवी व संजिता चानू , बॉक्सर सरिता देवी, देवेंद्र सिंग व डिंको सिंग, जुदो चॅम्प कल्पना देवी, आर्चर बोम्बयला देवी, मिस्टर वर्ल्ड सौष्ठवपटू गंग्बाम मैतेई अशी विविध क्षेत्रांतील तारांकित नावे या राज्याशी निगडित आहेत. याशिवाय आय लीग व इंडियन सुपर लीग फॉलो करणाऱ्यांना तेथील बोइथान्ग हाओकीप व इतर फुटबॉलपटू परिचयाचे आहेच.
निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या विविध परंपरा जपणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या राज्यात प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या महिला आहेतच. मात्र इंफाळच्या या मार्केटमध्ये आजही बाजारात महिला राज असून खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या देखील महिलाच आहेत. जगातील अन्य बाजारांचे नियम वेळोवेळी बदलतात मात्र येथील नियम अजूनतरी बदललेले नाहीत. विक्रेत्याही महिला आणि खरेदीदारही महिला जणू पुरुषांना अघोषित बंदीच असलेल्या या मार्केटचा प्रवास लैलप नावाची परंपरा पाळत हाच वारसा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालू सोपवत आपला प्रवास करत आहे आणि ही ५०० वर्षांची परंपरा टिकवुन आहे.