प्रतिनिधी/पुणे
संपूर्ण शेतकरी वर्गासह सामान्यांसाठीही दिलासादायक वृत्त असून निर्धारित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवमान विभागाने दिली आहे. रत्नागिरीच्या हर्णे येथे आज (शनिवारी) मान्सून दाखल झाला असून हवामान अनुकूल असल्याने तो अतिशय वेगाने घोडदौड करीत आहे. येथून पुढे राज्यात मान्सूनचा प्रवास असाच वेगवान राहण्याचे संकेत आहेत.
दक्षिण केरळमधून मान्सूनने तीन तारखेला भारतात प्रवेश केला. यावेळची हवामान व वाऱ्यांची दिशा आणि गती लक्षात घेता मान्सून 10 तारखेला महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर अचानकपणे अनुकूल परिस्थिती लाभल्याने मान्सून अधिक सक्रीय झाला व त्याची वाटचाल वेगाने झाली. परिणामी, केरळ आणि तमिळनाडू व्यापून पुढे कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीसह निम्म्या कर्नाटकात तो शुक्रवारी दि. ४ जूनला दाखल झाला. त्यानंतर वेगवान वाटचाल करत गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्रप्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील काही जिल्ह्यातही आज शनिवारी (दि. 5) मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी आज ट्वीटरद्वारे दिली .
राज्यातील हवामानाची परिस्थिती मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल असल्याचे हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकणार आहे. हर्णेपर्यंत पोहचलेला मान्सून नंतर द. मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत, मराठवाडा काही सलग्न भागात पोहचून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.