औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योग, इंजिन तेल, इमारती बांधकाम इत्यादींसाठी नागकेशराच्या विविध भागांचा वापर केला जातो. बागबगीचे, घरांच्या परसबागा, मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी या वृक्षांची मुद्दामहून लागवड केली जाते. दक्षिण कोकण, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी दक्षिणेकडील राज्ये आदी ठिकाणी सदाहरित, निमसदाहरित जंगलांत हा वृक्ष निसर्गतः आढळतो. श्रीलंका या देशातही ही प्रजाती आढळते. ओळख आणि स्वरूप ः नागकेशर हा अत्यंत देखणा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष बऱ्याचदा मंदिराच्या परिसरात लावलेला आढळतो.
या वृक्षाचे खोड एक ते दोन मीटरपर्यंत सरळ वाढते. खोडाची साल गुळगुळीत, राखाडी रंगाची असते. नवीन येणाऱ्या पालवी आणि फांद्या पांढऱ्या मखमली केस असलेल्या असतात. पाने साधी, भाल्यासारखी, तीक्ष्ण टोक असलेली असतात. फुले छान सुगंधाची एक ते तीन इंच आकाराची असतात. फुले फांद्यांच्या शेंड्याला येतात. फुलांमध्ये चार पांढऱ्या रंगाच्या मोठ्या पाकळ्या असतात. फुलांमध्ये सोनेरी पिवळ्या रंगाचे अनेक पुंकेसर असतात. फळे शंकूसारखी लंबगोल, बाह्य दलाने वेढलेली असतात. एका फळात बदामी रंगाच्या एक ते चार बिया असतात.
औषधी उपयोग
औषधे निर्मितीसाठी फुलांमधील वाळलेले पुंकेसर आणि बिया वापरल्या जातात. वेदना थांबविण्यासाठी, अति घाम व घामाची दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी, मूळव्याध प्रतिबंधक, जंतुनाशक, आम्ल-पित्तनाशक, पित्तातिसार, रक्तधातू इत्यादी विकारांत त्याचा उपयोग आयुर्वेदात सांगितलेला आहे. मूळव्याधीत रक्त जात असल्यास लोण्याबरोबर सेवन केले जाते. बियांमधील तेलामध्ये “मेसुईन’ नावाच्या रसायनामुळे श्वसनाचे विकार बरे होतात, असे म्हटले जाते.
रोपवाटिका आणि लागवड
या वृक्षांस फुल फेब्रुवारी-मार्च महिन्यात येतात आणि फळे एप्रिल-मे महिन्यात परिपक्व होतात. फळांतील बिया काढून दोन ते चार दिवस सावलीत सुकवून 12 तास कोमट पाण्यात ठेवल्यास रुजवा चांगला मिळतो. रोपे तयार करण्यासाठी पाच ते आठ सें.मी. आकाराच्या पिशवीमध्ये पोयटा किंवा गाळाची माती, वाळू, चांगले कुजलेले शेणखत 2ः1ः2 या प्रमाणात चांगले मिसळून भरावे. प्रत्येक पिशवीत दोन बिया दोन सें.मी. खोलीवर टाकून आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. रुजवा 15 ते 21 दिवसांनी झाल्यानंतर प्रति पिशवी एकच रोप ठेवून सेंद्रिय खतांची मात्रा आवश्यकतेनुसार द्यावी. रोपे 20-30 सें.मी. उंचीची झाल्यानंतर मोठ्या पिशवीत लावावीत. लागवडीयोग्य रोपे एक वर्षाने तयार होतात.
लागवडीसाठी शक्यतो दोन ते तीन फुटांची रोपे वापरावीत. मध्यम, भारी, निचरा होणाऱ्या जमिनीत 4 ु 4 मीटर अंतराने 2 ु 2 ु 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन लागवड केली जाते. रोपे लहान असताना तीव्र ऊन, अति थंडी, अति पाऊस यापासून संरक्षण करावे. सुरवातीला या वृक्षाचा वाढीचा वेग कमी असतो. लागवडीनंतर काळजी घेतल्यास पाच-सात वर्षांत फुले येण्यास सुरवात होते. अतिशय देखणा, सुंदर असा हा वृक्ष दुर्मिळ होत असल्याने आणि परंपरागत औषधी पद्धतीमध्ये उपयोग होत असल्याने याची लागवड व संवर्धन होणे आवश्यक आहे.
ः (02358) 282717 (लेखक दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयात कार्यरत आहेत.)