पालघर जिल्ह्यामधील विशेषतः डहाणू हा अत्यंत निसर्गरम्य भुभाग म्हणून परिसरामध्ये ओळखला जातो. या परिसराला लाभलेला समुद्रकिनारा हा त्या निसर्गसौंदर्ययामध्ये अजुन भर टाकतो. घोलवड येथील जीआय नामांकन मिळालेले चिकू हे जगविख्यात फळ उत्पादन याच परिसरामधील. त्याशिवाय नारळाच्या बागा, फणस, सफेद जांबू, लिची अशा विविध फळपिकांनी इथला भूभाग समृद्ध आहे. तसेच येथे वनसंपदा ही भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे वर्षभर नैसर्गिक फुलोराही मोठ्या प्रमाणामध्ये येतो तसेच येथील दमट व समशीतोष्ण हवामान यासारख्या अनेक गोष्टी यशस्वी मधमाशी पालन व्यवसायसाठी पूरक ठरल्या आहेत. याच नैसर्गिक समृद्ध वातावरणात ५१ वर्षीय राजू मंडल यांनी आपला मधमाशी पालनाचा व्यवसाय समृद्ध केला आहे.
नोकरी संभाळत मधमाशी पालन
मूळचे कलकत्ता येथील असणारे मंडल कुटुंब हे उदर निर्वाहाचे साधन शोधत सुमारे 75 वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाड टेकडी चिंबवे येथे स्थायिक झाले. कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये राजू मंडळयांचे वडील माळी म्हणून काम करायचे व फावल्या वेळेत आपला मधमाशी पालनाचा छंद जोपासायचे. वडिलांचा छंद स्वतःही आत्मसात करून तो जोपासत घोलवड येथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. काम संभाळून कामावरून घरी आल्यानंतर दररोज एक ते दीड तासाची व शनिवार,रविवारचा सुट्टीचा काळ यांमधील सातत्यपूर्वक मेहनत हे मंडल यांच्या यशाच्या प्रवासाचं याचं गमक आहे. नोकरी सांभाळून मधमाशीपालनातून मिळालेले अतिरिक्त उत्पन्न नक्कीच आयुष्यात मधुरता आणणारे आहे असे त्यांना वाटते.
शालेय जीवनापासूनच मधपेटी बनवण्याची प्रेरणा
मधमाशी पालनाचे धडे हे राजू मंडल यांना त्यांच्या वडिलांकडून वयाच्या पंधराव्या वर्षापासून मिळत राहिले. तेव्हापासून ही आवड अधिकाधिक वाढत गेली. सात वर्षापूर्वी वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यानंतरही राजू मंडळ यांनी मधमाशी पालन व्यवसाय आजही तितक्याच कष्टाने जिद्दीने व प्रामाणिकपणे सुरू ठेवला आहे. शालेय जीवनामध्ये सुतारकाम हा कार्यानुभव विषय शिकत असताना राजु मंडल यांना मिळालेली प्रेरणा पुढील काळामध्ये मधपेटी बनवण्यासाठी कामाला आली. कालांतराने मधपेटी बनण्यासाठी आवश्यक असणारे यंत्रसामग्री खरेदी केल्यानंतर राजू मंडळ यांनी मधपेट्या बनवून विक्री सुरू केली.
संपूर्ण कुटुंबच मधमाशीपालक
मी स्वतः ड्युटीवर असताना व माझा मुलगा काही कामासाठी बाहेर गेला असतांना माझी पत्नी मधमाशा पकडणे, मध काढणे यासारखी कामे करून मोलाची साथ देते असे राजू मंडल हे आवर्जून सांगतात. राजु मंडल यांचा 27 वर्षाचा इलेक्ट्रिकल क्षेत्रात आय. टी. आय. केलेला मुलगा हा मधमाशी शेती व्हिजिट करणे, मधमाशीच्या शेतीसाठी सर्वे करणे, माशा तपासणे, माश्या काढणे, माश्या भरणे, मध काढणे इत्यादी कामांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतो.
व्यवसायाचे व्यवस्थापन
मधमाशा या जंगलामधून पोळ्यासहित (वसाहतीसत) मडक्यामधून आणून ते मधपेट्या मधे जतन करण्यास ठेवल्या जातात. मधमाश्या मधपेटी मध्ये ठेवल्यापासून आठ ते दहा दिवसानंतर त्याला बांधलेली सुतळ सुटली आहे का हे पाहावे लागते व तिचे झालेले तुकडे साफ करावे लागतात. त्यांमध्ये अंड्याची निमिती झाली आहे का हे पहावे लागते. त्यामध्ये अंड्याची निर्मिती झाली नसेल तर तेथे दुसऱ्या वसाहतीमधून अंडी सोडावी लागतात. मधपेटीची दोन भागांमध्ये विभागणी केली जाते एका भागास मधकोटी असे म्हणतात दुसऱ्या भागात अंडीकोटी असे संबोधले जाते. एक ते दीड महिन्याच्या कालावधीनंतर या मधकोटीमध्ये मध तयार होते. पोळ्याला मेणकिडा लागुन मधमाशा उडून जाण्याची शक्यता असते म्हणून मध पेटीची आठ ते दहा दिवसानंतर स्वच्छता करावी लागते. पावसाळ्यामध्ये झाडांना फुलोरा येत नसल्यामुळे परागीकरण होत नाही त्यामुळे मधाचे उत्पादन आपल्याला मिळत नाही. या काळात मधपेटीत असणाऱ्या मधमाशा सांभाळणे हे मुख्य काम मधमाशी पालकास करावे लागते. जुन ते ऑगस्ट या दरम्यान च्या पावसाच्या काळामध्ये मधपेट्या भिजू नये म्हणून पेटीवर पत्र्याचे झाकण किंवा प्लास्टिकचा पेपर लावून ठेवला जातो. अन्य हंगामामध्ये सरडे, पाली, लाल मुंगळे, मुंग्या याचा त्रास होऊ नये म्हणून मधपेटी एका विशिष्ट उंचीच्या स्टँडवर ठेवावी लागते.
वसाहतींचे व्यवस्थापन
निसर्गतः डहाणू भागात सातेरी जातीच्या मधमाशा मुबलक प्रमाणामध्ये आढळून येतात. या मधमाश्या झाडांच्या ढोलीमध्ये डोंगरांच्या कपारीमध्ये आढळून येतात. एका विशिष्ट प्रकारचे मडके ठेवून त्यात मधमाशा पकडण्याचे तंत्र येथे वापरले जाते. मधमाश्या काढून झाल्यावर त्यामधून राणीमाशीला पकडले जाते. मधमाश्या पकडुन त्यांना मधपेटीमधे फ्रेमला बांधल्या जाते. राणीमाशी ही इतर माश्यापेक्षा आकाराने मोठी व चॉकलेटी रंगाची असते. मधपेटी मधील फ्रेम मध्ये एक राणीमाशी आणि त्याच्याबरोबर इतर कामकरी माशा भरलेल्या असतात. ज्या पुढे मध निर्मिती करतात. एका मधपेटीमध्ये आठ फ्रेम असतात त्यामधून काही कालावधीनंतर तीन फ्रेम वेगळ्या केल्या जातात. मधपेटी मधील कामकरी माश्यामध्ये राणीमाशी सोडली जाते. पुढील दोन ते तीन दिवसांनी राणीमाशी एका मधपेटी मधून निघून नराशी मिलन करून दुसऱ्या मधपेटी मध्ये जाते. सातेरी मधमशीचे वैशिष्ट्य म्हणजे जेवढी जागा तिला उपलब्ध होइल. तेवढे ती मधमाशी आपले पोळं मोठे बनवते. एप्रिल पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वसाहती मिळतात. पावसाळी हंगामध्ये नवीन वसाहती तयार होत नाहीत.
मधमाशीपालक ते मधुमाशी पालक प्रशिक्षक
वडिलांपासून वारसा हक्काने मिळालेला मधमाश्या पालनाच्या व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या हेतूने राजू मंडल यांनी मध विक्री, मधपेटी बनवून विक्री, मधमाशी पालन मार्गदर्शन, मधमाशी पालनासाठी जागेचा सर्वे करणे , मधपेटीची देखभाल करणे, मधमाशीच्या नवीन वसाहतींच्या मागणीची पूर्तता करण्यास सुरुवात केली. पण,मधपेटी देऊन किंवा वसाहती देऊन त्यांचे काम थांबत नाही तर तिथून खरे काम सुरू होते. त्याला त्यासंबंधी ज्ञान, माहिती द्यावी लागते, त्याचे अनेक प्रश्न, अडचणी तसेच शंकेचे समाधान करावे लागते. त्याच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागतात. अश्यामुळेच मधमाशीपालक ते मधुमाशी पालक प्रशिक्षक हा प्रवास घडला असे असे राजु मंडळ यांचे मत आहे.
पंचक्रोशीतुन तसेच जव्हार, मोखाडा, विक्रमगड पालघर येथील इच्छुक व्यक्ती तसेच शेतकरी राजू मंडल यांच्याकडून प्रत्यक्ष येऊन मधमाशी पालन करण्यासाठी मार्गदर्शन घेऊन मधपेट्या व वसाहती घेऊन जातात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पनवेल, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातून सुध्दा राजू मंडळ यांना व्यक्ती संपर्क करतात यावेळी राजू मंडल त्या त्या ठिकाणी खाजगी वाहन करून प्रत्यक्ष जाऊन मधपेट्या देऊन, तेथील जागेचे सर्वेक्षण करून, मधमाशी पालनास सुरुवात करून देतात व पुढील आवश्यक ते मार्गदर्शन,शंका समाधान करण्यासाठी केव्हाही फोनवर देण्यास उपलब्ध असतात.
मधमाशीपालनातील गुंतवणूक व परतावा
एखाद्या व्यक्तीने कमीत कमी १०मधपेट्यांच्या माध्यमातून सुमारे ३५००० रुपयांची गुंतवणूक केली तर सप्टेंबर ते मे या ९ महिन्याच्या कालावधीमध्ये १ मधपेटीच्या माध्यमातून सरासरी १० किलो मधनिर्मिती झालेल्या मधाची अंदाजे ८०० ते १ हजार रुपये किलो बाजारभावाने विक्री झाली तर त्यामधून एकूण १० मधपेटीच्या माध्यमातून अंदाजे १ लाख रुपयाचे उप्तन्न मिळू शकते. पुढे हळूहळू आपल्याला मिळालेल्या अनुभवांमधून यामध्ये आपल्या क्षमतेनुसार वाढ करून अधिकाअधिक उत्पन्न मिळवता येऊ शकते.
मधुर अर्थकारण
वर्षभरात सुमारे 40 ते 60 मधपेट्या तयार करतात. जंगली लाकडापासून बनविलेल्या रिकाम्या पेटीची विक्री दोन हजार रुपयांप्रमाणे होते. त्यात वसाहती भरून दिल्यास हाच दर साडेतीन हजार होतो. मंडल यांची सप्टेंबर ते मे या ९ महिन्याच्या कालावधीत मध विक्री, नविन वसाहतींची निर्मिती करून विक्री करणे, मध पेट्या तयार करून विकणे, मधमाशी पालन व्यवसायाचा इतरांना सुरू करून देणे, त्यांची नियमित देखभाल करणे या पासून अंदाजे 2.50 ते 3 रु निव्वळ उत्पन्न मिळते. यात मधाचा वाटा हा १ ते १.२५ लाख रुपयांचा असतो. नोकरी सांभाळून मिळालेले हे उत्पन्न नक्कीच आयुष्यात मधुरता आणणारे आहे असे त्यांना वाटते.
जोडधंदा म्हणून उत्पन्नाचा उत्तम स्रोत
नोकरी किंवा इतर कोणताही व्यवसाय सांभाळून मिळणारा मोकळा वेळ हा कोणताही अयोग्य ठिकाणी व अनावश्यक गोष्टींमध्ये न लावता उत्पन्नाचा नवीन स्त्रोत म्हणून मधमाशी पालन या व्यवसायाकडे पाहिले तर आपली आर्थिक बाजू भक्कम होण्यास हातभार लागू शकतो . गेल्या पंचवीस ते तीस वर्षामधे माझ्या आवडीच्या कामामधून घेतलेला आनंद व अनुभवातून माझे हे व्यक्तिगत मत मी आपणास सांगू इच्छितो. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून उत्पन्नाचा उत्तम स्रोत म्हणून हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर आहे.
श्री राजू मंडल
कोसबाड टेकडी चिंबवे
तालुका डहाणू जि. पालघर
श्री. राजू मंडल, मो. 9923713678,