बळ बुद्धी वेचुनिया शक्ती,
उदक चालवावे युक्ती – संत तुकाराम महाराज
पाण्याची अगदी चांगल्या पद्धतीने संत तुकोबारायांनी महती सांगितली आहे. जल ही जीवन है। असे आपण म्हणतो. अशा पद्धतीने पाण्याला आपण जीवन मानतो. भारतीयच नव्हे, तर जगभरातील प्रत्येक थोर संस्कृती पाण्याच्या काठावर बहरल्या, विकसीत झाल्या. व्यापाराने संपूर्ण जगावर कब्जा केला आहे. त्यामुळे जास्त पुरवठा या बाबीमुळे पाण्याचे शोषण होऊ लागले आहे. आजच्या काळात सर्वाधिक महत्त्व आले ते पाण्यालाच. शेती असो की उद्योग प्रत्येक ठिकाणी गरज असते ती पाण्याची. म्हणूनच पाण्याला विकासाचे इंधन म्हणून गौरविण्यात आलेले आहे. दुर्दैवाने असे म्हणावे लागत आहे की, हे इंधन आता आटायला लागले आहे. गरज अमर्याद प्रमाणात वाढत असताना पाऊस व पाणी कमी कमी होत चालले आहे. उपलब्ध पाणी अधिकाधिक शहाणपणानं वापरण्याची गरज भासू लागली आहे. पाण्याचा शहाणपणाने वापर म्हटल्यावर सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर ठिबक सिंचन येते. या ठिबक सिंचनाबाबत अॅग्रोवर्ल्ड च्या वाचकांसाठी खास माहिती.
जुने संदर्भ, आंतरजाल यात ठिबक सिंचनाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक उत्तम संदर्भ हाती लागले आहेत. अगदी प्राचीन काळापासून सिंचनाचा उपयोग होत आला आहे. शेतीसाठी सिंचनाचा उपयोग. ईजिप्त, बॅबिलोनिया, चीन, भारत इ. देशांत सिंचनावर आधारलेल्या शेतीमुळे मानवी संस्कृतीचा विकास होण्यास खूप मोठा हातभार लागलेला दिसतो आहे. पुरातन काळी मडक्याला छिद्रे पाडून रोपांच्या मुळाशी ते ठिबकणारे मडके ठेवायची पद्धत होती. सिंधू नदीकाठी पुरातन काळी असलेल्या संस्कृतिमधील झालेल्या उत्खननात असे मडके देखील आढळलेले आहेत. त्या आधी म्हणजे रामायण महाभारत घडायच्या ही आधी असे म्हणतात की, दधीच ऋषिंच्या आश्रमाच्या परिसरात लावलेल्या झाडांना त्याकाळी ठिबक सिंचन आणि मडक्याच्या झिरप पद्धतीने पाणी दिले जात असायचे. जैन धर्मात असि-मसि आणि कृषि ची कला शिकविणारे ऋषभदेव सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतीची कला जनतेला शिकवून संस्कृति आणि सभ्यता विकसीत केली आहे. त्यांच्या कार्याबाबत जैन धर्मग्रंथ आगम मध्ये उल्लेख आलेले आहेत. मुस्लीम धर्मग्रंथात देखील प्रथम प्रेषित हज़रत आदम अलैहिस्सलाम यांनी शेती केल्याचे नमूद आहे. हज़रत आदम व हव्वा अलैहिमुस्सलाम यांना स्वर्गातून पृथ्वीतलावर पाठविण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रश्न केला की आम्ही या ठिकाणी आलो तर खरे परंतु आमचे जीवन व्यापन कसे चालेल. त्यावेळी जिब्राइल अमीन यांनी स्वर्गातून आणलेल्या गव्हाच्या सात दाण्यांची छोटी पोटली आणली होती. त्याने सांगितले की अल्लाने दिलेल्या या दाण्यांचे खूप महत्त्व आहे.प्रती एक दाण्यात एक लाख दाणे उत्पन्न करण्याची क्षमता आहे. शेती आणि पाण्याचा त्यांनी सुयोग्य वापर केला आणि त्यातून यशस्वी शेती केल्याचे कुराण शरीफ या ग्रंथात सांगण्यात आले आहे. असे अनेक धर्मग्रंथात सांगण्यात आलेले आहे.
साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी ईजिप्तमध्ये नैसर्गिक सिंचनाची पद्धती सुरू झाल्याची नोंद झालेली आहे. इ. स. पू. 5,000 वर्षांपासून झाल्याचे पुरावे आहेत. तेथे नाईल नदीला दरवर्षी येणार्या पुरामुळे तिच्या किनार्यालगतच्या मोठ्या क्षेत्रावर पाणी पसरत असे. पूर ओसरल्यावर या क्षेत्रात तयार होणार्या चिखलात बिया पेरुन तेथे पीक घेतले जाई, तसेच पुरानंतर अनेक ठिकाणी डबक्यांच्या रुपात काही महिने पाणी साचून राहत असे. त्यामुळे असे पाणी उचलून घेऊन शेतीसाठी वापरण्याचे आदिम कृत्रिम सिंचन सुरु झाले असावे. जेथून पाणी वाहून निघून जाते असे मार्ग दगडमातीने बंद करून पाण्याचे साठे तयार करीत असावेत. यातून धरणाची कल्पना पुढे आली असावी. मीनीझ (इ.स. पू. 3168-3141) या ईजिप्तच्या राजाने नाईल नदीच्या किनार्यावर बंधारे बांधून पुराचे मानवनिर्मित नियंत्रण केले होते. अशा पद्धतीने नाईल नदीच्या खोर्यातील सिंचन पद्धती सुरु झाल्याची लेखी माहिती उपलब्ध आहे. सिंचन सुव्यवस्थित आणि सुलभ व्हावे म्हणून प्राचीन काळात विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आल्याचे दिसतात. उदाहरण द्यायचे झाले तर, बॅबिलोनियाचा राजा हा मुराबीयांच्या कारकीर्दीत (इ. स. पू. 1792-1750) कालवे व पाट बांधलेले होते. चीनमध्ये पहिला कालवा इ. स. पू. तिसर्या शतकात खोदण्यात आल्याची नोंद आहे. इ. स. पू. पहिल्या शतकात चीनमध्ये दुष्काळ निवारण व भात शेतीला पाणी देणे या कामांसाठी हानवंशीय सम्राट वूटि याने कालवे खोदण्याचे व तलाव बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या क्षेत्रात पाण्याची उलब्धता झाली आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा अगदी काटकसरीने वापर करण्यासाठी देखील सूचना त्याकाळी दिलेल्या होत्या. अमेरिका खंडांत यूरोपियन लोकांचा प्रवेश होण्याआधी तेथील मूळचे रहिवासी रेड इंडियन शेतीला पाणी देत असत. त्यांच्या सिंचनपद्घतींचा अभ्यास करुन यूरोपियन लोकांनी सुधारणा केल्या. भारतातील राजे-महाराजांनी देखील सिंचनाबाबत विचार आणि कृती केल्याचे आढळते. त्यात चाणक्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात सिंचनाविषयीची खूप सारी माहिती दिलेली आहे. इ. स. पू. तिसर्या शतकात मीगॅस्थिनीझ यांनी मसम्राट चंद्रगुप्ताच्या राज्यात सारा मुलुख कालव्यांनी व्यापलेला असून प्रजा धनधान् याच्याबाबतीत समृद्ध असलेली आढळलीफ असे लिहून ठेवले आहे. सम्राट चंद्रगुप्ताने शेतीसाठी पाणी उलब्ध करून दिले परंतु वारेमाप पाण्याचा वापर करू नये जेवढे गरजेचे आहे तेवढेच पाणी सार्वजनिक कालवे अथवा उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांपासून पाणी उचलावे असेही पाणी वापराच्या सूचना दिलेल्या होत्या. इ. स. पहिल्या शतकात भारतात चोल वंशातील राजांनी कावेरी नदीच्या महत्त्वाच्या ठिकाणी धरण बांधले होते. इ. स. दुसर्या शतकात करिकालया चोल राजाने कावेरी नदीवर महान अनईकट्टु (ग्रँडनिकट) हा बंधारा बांधला. चौदा व्या शतकात सतलज व यमुना या नद्यांपासून कालवे काढण्याचे काम तुघलक घराण्याच्या काळात झाले. एकोणिसाव्या शतकात पश्चिम यमुना कालवा, पूर्व यमुना कालवा व कावेरीचे कालवे काढण्यात आले. यानंतर उत्तरेत गंगा कालवा व बारी दोआब कालवा आणि दक्षिणेत गोदावरी वरही कालवे काढण्यात आले. पुण्याजवळील खडकवासला धरण, भोरजवळील जुनेव भाटघर येथील नवीन धरण आणि नीरा नदीचे कालवे, तसेच प्रवरा व गोदावरी या नद्यांवरील धरणे व कालवे हेही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधण्यात आले. सिंध प्रांत भारताचा भाग असतांना जगप्रसिद्घ सक्कर येथील सिंधू नदीवरचा बंधारा व जवळजवळ संपूर्ण सिंध प्रांत भिजेल असे कालवे ही विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधले गेले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पडलेल्या देशव्यापी दुष्काळानंतर भारताने एक सिंचन आयोग नियुक्त केला होता. त्यामध्ये केलेल्या शिफारशीव त्यानुसार सुरु झालेली पाहणी यामुळे देशातील सिंचन योजनांचा पाया घातला गेला.
जगात जर्मनीत झाला पहिला ठिबक सिंचनाचा प्रयोग
ठिबक संचाचा इतिहास फारच रंजक आहे. 1860 मध्ये जर्मनीत मातीच्या भाजलेल्या पाइपमधून सर्वप्रथम पिकाला पाणी देण्याचा प्रयोग केला गेला. तब्बल 160 वर्षांपूर्वी राबविलेल्या या प्रयोगाने आज अख्ख्या जगातील शेती तग धरून राहिली आहे. कमी पाणी असले तरी आज ठिबक सिंचनामुळे शेतीतून उत्पन्न काढणे शक्य झाले आहे. काही वर्षांपूर्वी पिकांना पाटचारी, दांडाने पाणी दिले जायचे. ठिबक संच हे फक्त मोजक्या शेतकर्याकडे असायचे; परंतु आजच्या स्थितीत बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनशिवाय शेती करू शकत नाहीत. ठिबक सिंचन काळाची गरज बनली आहे. ठिबक संचाचा शोध हा जर्मनी देशातील शास्त्रज्ञांनी लावला. ठिबक संचामुळेच आज इस्रायईलसारखे देशही शेती करू लागले
1860 सालात जर्मनीत काही शास्त्रज्ञ थेट पिकांच्या मुळाशी पाणी कसे देता येईल, यावर संशोधन करीत होते. त्यानुसार पहिल्यांदा मातीच्या भाजलेल्या पाइपमधून पाणी देण्याचा प्रयोग झाला. तब्बल 80 वर्षांनंतर म्हणजेच 1920 मध्ये लहान छिद्रे असलेले मातीचे पाइप पिकांना देण्यास वापरले गेले. 1920 मध्येच मिशिगन स्टेट विद्यापीठाच्या प्रा. ओ. ई. रोब यांनी लहान छिद्राच्या मातीच्या पाइपमधून जमिनीखाली पाणी देण्याचा पहिला प्रयोग केला. परंतु, तो काळ देशा-देशांमधील संघर्षाचा होता. ठिबकच्या सर्व संशोधनाकडे दुसर्या महायुद्धापर्यंत त्यामुळे
सर्वांचेच दुर्लक्ष झाले दिसते. दुसर्या महायुद्धानंतर प्लास्टिकच्या पाइपचा वापर सुरू झाला. तोपर्यंत भारतात सिमेंट पाईपद्वारे पाणी वाहून नेण्याची पद्धती वापरली जात होती.
ठिबकचे पहिले पेटंट घेणारे एस ब्लॉस
इस्त्राईल (हिब्रु) स्थित पेशाने अभियंता असलेले एस ब्लॉस म्हणजेच सिम्चा ब्लॉस यांनी ठिबक सिंचन पद्धतीत वापरल्या जात असलेल्या तोट्याचे पेटंट इ.स. 1952 मध्ये जगात पहिल्यांदा घेतले. एस. ब्लॉस यांनी सिद्ध असे केले की,झाडाच्या बुंध्याजवळ कमी दाबाने थेंब थेंब पद्धतीने पाणी दिले तर झाडाची वाढ अन्य सिंचन पद्धतीच्या तुलनेत त्वरेने व अत्यंत जोमदार होते असे सिद्ध केले. त्याने प्रयोगासाठी वाटणा हे पीक निवडले होते. याच जोडीला त्याने इतर कडधान्य, तेलबिया व फळझाडांवर देखील आपला प्रयोग चालविला होता. पुढे 1963 मध्ये डॉ. के. डार्टर यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सहकार्यानी प्लास्टिकच्या नळ्यांच्या साह्याने ठिबक पद्धतीची रचना, डिझाईन करून निरनिराळ्या पद्धतीच्या तोट्यांवर संशोधन व प्रयोग केले. त्यात दर ताशी किती पाणी झाडाला मिळावे याबाबत गणिती पद्धतीचा वापर करून तोट्यांची रचना केली व त्याबाबत प्रयोग केले. त्याविषयी जवळपास शंभरावर संशोधनात्मक लेख लिहून ते सादरही करण्यात आले. इस्राईलमध्ये या रोपट्याची भराभर वाढ होऊन ते लवकरच ऑस्ट्रेलिया, अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत पसरले. 1971 मध्ये ठिबक सिंचन पद्धतीबाबत आंतरराष्ट्रीय परिषद इस्राइल देशातील तेल अवीव या शहरात झाली. त्या वेळी जवळपास 24 प्रबंधांचे वाचन झाले. पुढे 1985 च्या नोव्हेंबर महिन्यात अशीच आंतरराष्ट्रीय सिंचन परिषद झाली. त्यात सुमारे 250 प्रबंधांचे सादरीकरण झाले. विशेष म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीचा अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या स्मेल इरिगेशन कंपनीने खरा प्रसार केला.
1984 पासून भारतात ठिबकवर संशोधन
अमेरिकेतील कंपनीने 1950 मध्ये पॉलिथिलीनच्या नळ्या तयार केल्या. पहिल्यांदा या नळ्यांचा वापर पिकांसाठी आणि तोही मर्यादित केला गेला. यासंबंधीचा पहिला शास्त्रीय प्रयोग एस. डेव्हिस या शास्त्रज्ञाने कॅलिफोर्निया राज्यातील पोमाना या ठिकाणी लिंबाच्या बागेवर 1963 मध्ये केला. संत्र्यांवर रिव्हरसाईड येथे 1964 मध्ये प्रयोग झाला. ठिबक सिंचन पद्धत 1970 ते 1984 या 14 वर्षांच्या कालावधीत चांगलीच फोफावली. 1984 पासून भारतातील कृषी विद्यापीठ तसेच इतर संस्था ठिबक सिंचनावर संशोधन करीत आहेत. तामिळनाडू कृषी विद्यापीठ (कोइंबतूर), वॉटर टेक्नॉलॉजी सेंटर, आयएआरआय, नवी दिल्ली, हरियाणा कृषी विद्यापीठ (हिस्सार), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी, महाराष्ट्र), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली, महाराष्ट्र) या विद्यापीठ व संस्थांनी ठिबक संचावर काम केले.
इस्त्राईलमधील सिंचन : सध्या जगात इस्त्राईलची सिंचन पद्घती अत्याधुनिक व अतिप्रगत आहे. इस्त्राईलमधील कृषी क्षेत्रात सु. 1.2 अब्ज घनमीटर पाणी दरवर्षी वापरले जाते. त्यापैकी सुमारे 90 कोटी घनमीटर पाणी गोडे असते. उर्वरित पाणी
नि:सारण (सांडपाणी), पुराचे पाणी, खारे पाणीव खार्या पाण्याच्या विहिरींतून मिळते. इस्त्राईलने आपल्याकडील मर्यादित पाण्याच्या स्रोताचा पुरेपूर वापर करुन घेण्यासाठी विविध सिंचन पद्घतींचा अवलंब केला आहे.
ठिबक सिंचन : ठिबक सिंचनाद्वारे एका तासात 1-20 लि.पर्यंत पाणी पुरविता येते ज्यात पाण्याचा जवळजवळ 95 टक्के पर्यंत वापर होतो. या पद्घतीचा वापर सरळ वाढणार्या पिकांच्या लागवडी करिता करतात.
सिंचन पद्घतींचे प्रचालन : या सर्व सिंचन पद्घती संगणकाद्वारे कार्यान्वित करता येतात. संगणकीकरणामुळे सत्काल प्रचालन, प्रचालनाच्या कार्यानाच्या शृंखला करता येतात. नियंत्रित प्रचालन अनेक तास काटेकोरपणे, विेशासार्हपणे व मनुष्यबळ वाचवून करता येते. जेव्हा संगणक प्रणाली ठराविक प्रमाणात पाणी व वरखते पुरविल्याची नोंद करते तेव्हा पुरवठा स्वयंचलितरीत्या बंद होतो. संगणकीकरणाद्वारे पाणी देण्याच्या पाळ्या देखील ठरविता येतात. प्रणालीत संवेदके देखील बसविलेली असतात, जे पाणी देण्याच्या योग्य वेळा ठरविण्यास मदत करतात.
जैन इरिगेशन आणि ठिबक सिंचन पद्धती…
जैन इरिगेशनच्या सिंचन क्षेत्रातील वाटचालीस 1986 साली अमेरिकेत, फ्रेस्नो येथे झालेल्या सूक्ष्म सिंचवावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कारणीभूत ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ट्रेड फेअरची जागतिक परिषद अमेरिकेतील फ्रेस्नो शहरात भरली होती. त्या प्रदर्शनातच जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांनी ठिबक सिंचनाचे, पाणी वाटप करणारं आणि शेतकर्यांना जास्त उत्पादन देणारं असं तंत्र पाहिले. ते तंत्र आत्मसात करण्यासाठी इस्त्राईलमधील कंपन्यांशी सहकार्याबाबत प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्याकाळी यश आले नाही. शेवटी, जेम्स हार्डी या इटालीयन कंपनीशी करार केला. हार्डी ही कंपनी त्यावेळची जगातील ठिबक सिंचन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी होती. जेम्स हार्डी समवेत करार झाल्यानंतर खर्या अर्थाने भवरलालजींची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली. भारतातील प्रभावी जलव्यवस्थापनाच्या इतिहासात जैन इरिगेशनचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री भवरलालजी जैन यांना भारतीय ठिबक सिंचनाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या या योगदानामुळेच. भारतातील सूक्ष्म सिंचनाचा विकास आणि जैन इरिगेशनच्या विकासात एक समान सुत्री धागा सापडतो. जैन इरिगेशन व्यतिरिक्त 30 वर्षांपूर्वी भारतात अनेकांनी ठिबक सिंचन आणण्याचा प्रयत्न केला. ही संकल्पना शेतकर्याला इतर कंपन्यांनी एका व्यापाराच्या, वस्तूच्या स्वरूपात विकली. यामुळे तिचा प्रसार झाला नाही. लोकशिक्षणाअभावी पाणी बचतीच्या या तंत्राला शेतकर्यांनी सुरूवातीला नाकारले. नेमका हाच धागा पकडून जैन इरिगेशनने सुरूवातीपासून लोकशिक्षणावर व कृषीविस्तारावर भर दिला. याचा परिणाम शेतकर्यांच्या जागृतीत झाला. सूक्ष्म सिंचनाच्या एकूण व्याप्तीत सद्यस्थिततीत भारतातील 55 टक्के वाटा हा एकट्या जैन इरिगेशनचा आहे. उरलेला 45 टक्के वाटा हा इतर कंपन्यात विभागलेला आहे. यावरून लोकांचा या कंपनीवर असणारा विेशास व्यक्त होतो. सूक्ष्म सिंचनाच्या क्षेत्रात भारतात 0.6 मिलीयन हेक्टर प्रती वर्ष एवढी वाढ होत आहे. यात विशेष म्हणजे जैन इरिगेशनचा वाटा 0.31 मिलीयन हेक्टर प्रती वर्ष एवढा! जैन इरिगेशनची भारतीय सिंचन क्षेत्रावर असणारी पकड याद्वारे स्पष्ट होते. आज जैन इरिगेशन एक बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्रातील शेतकर्यांशी असलेल्या बांधीलकीतून ही प्रगती साधणे शक्य झाले. शेती, शेतकरी आणि मातीशी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचे घट्ट नातं आहे. त्यांना शेती, खेडी आणि शेतकरी यांचे अर्थशास्त्र चांगले उमगले. गत काही दशकांत व आजही बर्याच ठिकाणी पारंपारिक पध्दतीने शेतीला पाणी दिले जाते. पाण्याच्या या मोकाट पध्दतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणातील अपव्यय टाळण्यासारखा आहे. जुन्या काळी मध्यम आणि गरीब शेतकर्यांना त्या वेळी प्रचलीत असलेल्या सिमेंट किंवा लोखंडी पाईप परवडण्यासारखे नव्हते. हे लक्षात घेवून भवरलालजी जैन यांनी पी.व्ही.सी पाईपचे उत्पादन करण्याचे ठरवले. शेतकर्यांना परवडणार्या याच्या किंमती असल्याने व गुणवत्तेतही त्या सरस ठरल्याने पी.व्ही.सी पाईपांची मागणी वाढली. जैन पाईपचे रोपटे नंतर इतके वाढले की त्याने वटवृक्षाचे रूप कधी धारण केले ते समजलेच नाही. सन 1980 ला कंपनीचे वार्षिक उत्पादन 500 टनांचे होते. हेच उत्पादन 1984 पर्यंत 23000 टन प्रतिवर्ष असे पोहोचले. पी.व्ही.सी. पाईपच्या देशातल्या पहिल्या दोन उत्पादकात जैन इरिगेशनची मोहोर लवकरच उमटली. आज जैन पी.व्ही.सी. पाईपांची क्षमता तब्बल 90750 टन प्रती वर्ष एवढी स्थिरावली आहे. आणि पी.ई.पाईपांचाही वापर सिंचनासाठी वाढतोय. भारतात 1970 च्या दशकापर्यंत राजकीय नेतृत्वालाही सूक्ष्म सिंचन या तंत्रप्रणालीची पूर्ण माहितीही नव्हती. नोकरशाहीला या अत्याधुनिक व पाण्याची बचत करणार्या प्रणालीशी काहीच देण-घेणे नव्हते. या सर्व पार्शभूमीवर सूक्ष्म सिंचन हा प्राधान्याचाआणि मन:पूर्वक निवडलेला आयुष्यभराचा व्यवसाय म्हणून त्यात भवरलालजी जैन यांनी उडी घ्यायचे ठरवले, आणि निश्चित दिशेने कंपनीची वाटचाल सुरू झाली.
आधी केले मग सांगितले..
भवरलालजी जैन यांनी ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान आधी स्वतः पारखून घेतले. भारतीय वातावरण, जमिनीच्या क्षेत्राचा विचार करता काही महत्त्वाचे बदल करून ते तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधी स्वतःच्या संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रात ठिबकचा प्रयोग केला. त्याबाबत उणिवा आणि लाभ याचा सारासार विचार केला. अथक प्रयत्न करून जैन हिल्स आणि वाकोदच्या शेतात ठिबकचे प्रयोग यशस्वी केले. आधी केले मग सांगितले या उक्ती प्रमाणे भवरलालजींच्या प्रयोगांना वेगळे असे अधिष्ठान लाभले. ठिबक सिंचनची संकल्पना शेतकर्यांपर्यंत पोहचवायची असल्यास पाणलोट विकासाची साथ त्याला द्यावीच लागते. ठिबक सिंचन हा कमी पाण्यात उत्तम शेतीचा मंत्र आहे परंतु,त्या आधी पाणी निर्माण करू शकणार्या पाणलोट विकासाचे तंत्र शेतकर्यांपर्यंत पोहचवावयास हवे, पाणलोट विकासाशिवाय ठिबक सिंचनाचे हे तंत्र शाश्वत विकासाचा पर्याय होऊ शकत नाही यासाठी जैन इरिगेशन कंपनीने चर्चासत्रे, प्रदर्शने आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. या विषयाशी ज्यांचा ज्यांचा म्हणून संबंध, संपर्क येत होता त्या सर्वांसमोर ह्या विषयाचे सादरीकरण झाले. त्यामध्ये बँका आल्या, शासकीय अधिकारी आले, मोठे अन् प्रगतीशील शेतकरी, लोकप्रतिनिधी आले, कृषी विद्यापीठे आली. या सर्व प्रयत्नांनी लोकांची मने खुली करायला कंपनीला जवळ जवळ दहा वर्षे लागली. त्यासाठी सतत खडतर प्रवास करावा लागला. बर्याच जणांना पटवून द्यावे लागले, आणि प्रात्यक्षिकांचा अवलंबही खूप करावा लागला. शेतकर्यांची आर्थिक स्थिती पहाता सिंचन यंत्रणेची सुरूवातीची भांडवली गुंतवणूक हा एक कळीचा मुद्दा होता. शेतकर्यांना थेट तगाईच्या रूपाने राज्य शासनाने हस्तक्षेप करण्याचीच खरी गरज होती. सरकारनेही शेतकर्यांच्या या कल्याणकारी मार्गाला प्रसंत केले. केवळ नफ्याचा विचार करून या व्यवसायात इतर उद्योजक घुसले. त्यांच्याकडे उत्पादनास योग्य अशी साधनसामग्री नव्हती ना विक्री-विपणनाची व्यवस्था, ना विक्रीपश्चात सेवेची सोय. शेतकर्यांना पुरेसे मार्गदर्शन व सेवा अशा उत्पादकांनी न दिल्यामुळे हा उद्योग बदनामही झाला. खरे पहाता यामध्ये सूक्ष्म सिंचन पध्दतीचा मुळीच दोष नव्हता. या उलट जैन इरिगेशन कंपनीने एका भव्य शेती संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिक केंद्राची उभारणी केली. त्यामध्ये हे तत्रं आणि त्याचे दैदिप्यमान फायदे प्रत्यक्ष प्रदर्शित केले. फक्त शेतकर्यांसाठीच …
सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे भवरलाल जैन यांच्याकार्याबद्दल विचार…
पाणी हा भाऊंच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय होता. पाण्यासंबंधी त्यांनी फार प्रदीर्घ चिंतन केले होते. जगातील अनेक देशांच्या पाणी प्रश्नासंबंधी त्यांनी अभ्यास केलेला होता. पाण्याचा काटकसरीने व वैज्ञानिक वापर करण्यावर त्यांचा फार भर होता. 1987 मध्ये भवरलालजींनी पहिल्यांदा इस्राईल मधून ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान भारतात आणले. त्यावेळेला त्यांनी या तंत्रज्ञानासंबंधी इस्राईलशी केलेला करार हे मोठे धाडसच मानले पाहिजे. कारण त्यावेळेपर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची बचत व काटकसर करायची याची कल्पना भारतातल्या शेतकर्यांना जवळपास नव्हती आणि हे नवे तंत्रज्ञान शेतकर्यांच्या गळी उतरविणे ही फारशी सोपी गोष्ट नव्हती. भाऊंनी या तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याचे आव्हान स्वीकारून त्यात ते यशस्वी झाले. आज भारतीय शेतीत व उत्पादन आणि उत्पादकता वाढीमध्ये जो आमूलाग्र बदल झालेला दिसतो त्यास ठिबक तुषार सिंचनाचे तंत्रज्ञान मुख्यत्वे कारणीभूत आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या विकासात भवरलालजींचा मोठा वाटा आहे.
नव्हे, तर शासकीय अधिकार्यांसाठी आणि शेतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी कंपनीने एका प्रशिक्षण केंद्राची तसेच उजळणी अभ्यासक्रमांचीही व्यवस्था केली. देशाच्या कानाकोपर्यातून लोक गटागटांनी इथे येऊन स्वत:च्या डोळ्यांनी या देदीप्यमान तंत्राचे अविश्वसनीय असे फायदे पाहू लागले. या सर्वांचा फारच गहन परिणाम झाला आणि अशा उद्योगांची निरोगी वाढ होऊ लागली. शेतकरी वर्ग आपणहून पुढे येऊन ही यंत्रणा मागू लागला. कंपनीला विक्रेत्यांचे जाळे आणखी खोलवर पसरवणे भाग पडले. अखेरीस सर्व देशभर कंपनीने जवळजवळ सर्व पिकांसाठी ठिबक सिंचनाची उपयुक्तता सिध्द करून दाखविली. उपलब्ध असलेल्या जमिनीतून कमी पाण्याचा वापर करून जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर ठिबक शिवाय पर्याय नाही हे तंत्र आता प्रत्येकाच्या लक्षात आले आहे. सिंचन वस्थापनात कृषीक्षेत्राचा अविभाज्य घटक म्हणूनच आज पाहिलं जातयं. याचे मूर्तीमंत उदाहरण द्यायचे झाले तर आंध्रप्रदेश सरकाने NO LIFT WITHOUT LIFT हे एकात्मिक सूत्र जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. पाण्याची कमतरता असणार्या राजस्थानात तर ठिबकशिवाय आज पर्यायच नाही. पाण्याची कमतरता कधीही न भासणार्या गंगा-यमुनेच्या प्रदेशातही ठिबक सिंचन अधिक शेती उत्पादनाचा मंत्र ठरला आहे. हिमाचल प्रदेशात सिंचन ही संकल्पनाच न पटण्यासारखी असतांना पाईपच्या जाळ्यांनी आणि ठिबकच्या थेंबांनी हेच शक्य करून दाखवलंय. सिंचनाला ठिबकची जोड असल्याशिवाय आपण शाश्वत विकासाकडे वाटचाल करूच शकत नाही. ठिबक सिंचनाबरोबर स्प्रिंकलर्सचाही प्रसार होत आहे. पाण्याची उपलब्धता आणि त्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी ठिबक आणि स्प्रिंकलर्सचा प्रसार अजूनही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. भारताच्या एकूण सिंचीत क्षेत्राच्या 5 टक्के पेक्षा कमी क्षेत्र आज ठिबक आणि स्प्रिंकलर्सच्या सहाय्याने सिंचित केले जाते. पाण्याची बचत करणारे हे तंत्र शेतकर्यांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. सर्वदूर शेतकर्यांपर्यंत हे तंत्र पोहोचण्यासाठी नवनव्या संकल्पनाही जैन इरिगेशन राबवित आहे. ठिबक सिंचन आणि सौर उर्जा यांचे गणित बसवण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे. ठिबकची कमी जाडीच्या पातळ नळीमुळे शेतकर्यांवरचा खर्चाचा बोजा कमी होईल. तसेच स्प्रिंकलर्सच्या रेनपोर्ट मॉडेलमध्ये नवनवीन सुधारणा आणून त्याची उपयोगिता वाढवण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न चालू आहेत. मागणीरूप सिंचनासाठी (on dimant irrigation ) लागणार्या आधुनिकतेवर भविष्यात कंपनी भर देऊन ती शेतकर्यांना परवडेल. कंपनीच्या प्रतिमेस साजेशी अशीच सेवा देत राहील कारण स्पर्धेपेक्षा शेतकर्यांना सर्वोत्तम सेवा हेच जैन इरिगेशनचं ब्रिद वाक्य आहे.
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भवरलालजी म्हणजे दूत – अण्णासाहेब शिंदे
मी वडिलांच्या कार्याचा उल्लेख करणे म्हणजे, सांगे वडिलांच्या कीर्ति असे होऊ शकते. परंतु आप्पासाहेब पवार आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या भेटीबाबतचा संदर्भ येथे देतो त्यावरून मोठ्याभाऊंच्या कार्याची ओळख वाचकांना होऊ शकेल. अमेरिकेत फ्रेस्नो शहरात 1986 ला ट्रेड फेअरची जागतिक परिषद अमेरिकेत भरली होती. त्यात शरद पवार साहेबांचे ज्येष्ठ बंधु डॉ. आप्पासाहेब पवार, तत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांची पहिल्यांदा आमच्या वडिलांसमवेत भेट झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेत आणि अण्णासाहेबांच्याच शब्दात बोलायचे झाले तर ते म्हणतात, भवरलालजी, आम्हाला असे वाटते, की तुमच्या निमित्ताने आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणीतरी एक दूत आला आहे!यावरून आमच्या वडिलांचे ठिबक सिंचनाच्या क्षेत्रात मोठे कार्य करण्याबाबत अण्णासाहेब शिंदे व आप्पासाहेब पवार यांची होती. असे जैन इरिगेशनचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन म्हणतात…
ठिबक म्हणजे शेतकर्यांच्या जीवनातील परिवर्तनाची नांदी
शेती-शेतकरी यांच्याशी बांधिलकी राखत, पाण्याच्या व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान आत्मसात करत शेतकर्यांना याबाबतचे मार्गदर्शन भाऊंनी अर्थात भवरलालजी जैन यांनी उपलब्ध करून दिले. आमचे वडिल म्हणायचे की, शेतकर्यांच्या चेहर्यावरील हास्य हाच माझा मोठा पुरस्कार! पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन, टिश्युकल्चर अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता शेतकर्यांच्या बांधापर्यंत करून दिली. ठिबक सिंचनाबाबत म्हणायचे झाले तर पाणी निम्म्यानं, उत्पादन दुपटीनं हे ब्रीद सत्यात उतरले. उत्पादन दुप्पट झाल्याने शेतकर्यांच्या खिशात पैसे खेळू लागले. ही झालेली प्रगती म्हणजे शेतकर्यांच्या जीवनातली परिवर्तनाची नांदी म्हणता येईल. शेतकर्यांना ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान आत्मसात करता यावे म्हणून जळगावच्या जैन हिल्स येथे एक हजार एकरावरील पीक प्रात्यक्षिक केंद्रासह आधुनिक उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र सुरू केले. आजचे जगप्रसिद्ध जैन हिल्स हे पूर्वीचे बरड माळरान, ना पाणी उपलब्ध, ना गवताचे पाते. परंतु श्रद्धेय भाऊंनी वॉटर शेड, वेस्ट लँड डेव्हलपमेन्टचा अनोखा प्रयोग केला. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की तो पाहण्यासाठी जगभरातील अभ्यासक भेटी देऊ लागले. ज्या ठिकाणी दरवर्षी 40-50 हजार शेतकरी नवीन शेती प्रगत तंत्रज्ञानाचे, प्रशिक्षणाचे धडे घेऊन आपल्या शेतावर हे तंत्रज्ञान राबवीत आहेत. त्यामुळेच ठिबक सिंचनाबाबत अभ्यास करणारे अभ्यासक येथे येतात व ठिबक सिंचनाबाबत शिकून जातात. एका अभ्यासकाने तर जैन हिल्स म्हणजे कृषि पंढरी, नंदनवन असे वर्णन केले आहे.
कहाणी कष्टलाटाच्या पाणलोटाची या भाऊंनी जैन हिल्सवर साकारलेल्या जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या कामांबाबत मार्गदर्शक असे पुस्तक लिहिले आहे. जैन हिल्स येथे करण्यात आलेल्या वॉटर शेड आणि वेस्ट लँड डेव्हलपमेंटबद्दल अगदी अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. पावसाचे पाणी जिथे पडेल तिथेच त्याचे संग्रहण व्हावे, धो धो पडणार्या पावसाचे वाहून जाणार्या पावसाच्या पाण्याची टेकड्यांच्या पायथ्याशी साठवण, तळे आणि पाझर तलावात जमा करण्याचे काम केले. जलसंधारण व मृदसंधारणाच्या माध्यमातून जैन हिल्सचा कायापालट कसा झाला त्याबाबतची केस स्टडी किंवा माहिती यात वाचावयास मिळते. जलसंधारणाच्याचे व्यापक कार्य म्हणजे कांताई बंधार्याची निर्मिती होय. जलसंधारण क्षेत्रात कंपनीचे आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंचे योगदान उल्लेखनीय महत्त्वपूर्ण आहे. जैन हिल्स येथील जलसंधारण, मृदसंधारणाचे हे मॉडेल ठरले. भाऊंच्या संकल्पनेतून स्वखर्चातून कांताई बंधार्याची निर्मिती केली. आपल्या उद्योगांच्या परिसरात पाणी अडवून ते जमिनीत जिरविले. हा पीपीपी म्हणजे पब्लिक, प्रायव्हेट पार्टर्नरशीपचा पहिलाच प्रयोग म्हणता येईल..
येथील मातीत ठिबक सिंचन रुजविण्याचे श्रेय आमच्या वडिलांना लोकं देतात. जैन ठिबक तंत्रज्ञानात महाराष्ट्र अग्रेसर राहिला. त्यासोबत कर्नाटक, आंध्र, तमीळनाडू, गुजराथ, मध्यप्रदेश या प्रांतामध्ये हे मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले व स्वीकारले जात आहे. या राज्यातील आणि विशेषतः जळगाव जैन हिल्स येथील पीक प्रात्यक्षिके बघून छत्तीसगड, आसाम, ओरिसा, हिमाचल प्रदेश, हरियाणा या प्रांतामध्ये ही प्रणाली अवलंबली जात आहे. ठिबकमुळे पाणी थेट मूळाशी, पाहिजे तिथे, पाहिजे तेवढं देता येते. आता तर ठिबक सिंचनाचे अद्ययावत तंत्रज्ञान ऑटोमेशन देखील शेतकर्यांच्या शेतात कार्यरत झाले आहे. मोबाईल किंवा संगणकावर घरी बसून ठिबक सिंचनाच्या पाळ्या, द्यावयाची खते यांचा प्रोग्राम केला जातो व एका क्लिकवर सगळे सिंचनाचे काम अचूकपणे करता येते. शेती व शेतकरी यांचेशी शेती प्रगत तंत्रज्ञानातून नाते घट्ट करताना भाऊंसमोर शेतकर्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. त्या म्हणजे शेती मालाचे फळझाडांचे, भाजीपाल्याचे उत्पादन! जैन पाईप, जैन ठिबक, स्प्रिंकस्र्, टिश्युकल्चर, सौर पंप इत्यादींच्या अवलंबामुळे उत्पादन वाढविले. शेतीमाल हा नाशवंत असतो या वाढीव उत्पादनाला हमीची बाजार पेठ पाहिजे. यासाठी मोठ्याभाऊंनी भाजीपाला व फळ प्रक्रिया उद्योग सुरू केले ज्याद्वारे शेतकर्यांना हक्काची हमीची बाजारपेठ उपलब्ध झाली. तसेच काही पिकामध्ये जसे केळी, डाळिंबसाठी दर्जेदार रोपे उपलब्ध नव्हती. त्यासाठी मोठ्याभाऊंनी उती संवर्धन प्रयोगशाळा उभी करून दर्जेदार उती संवर्धित (टिश्युकल्चर) रोपे शेतकर्यांना रास्त दरांत उपलब्ध करून दिली. शेतकर्यांना शेतावर कृषी ज्ञान उपलब्ध करून दिले.
शेती आणि शेतकरी यासाठी अविरत कष्ट करणारे ऋषितुल्य कर्मयोगी आमच्या वडिलांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत भरीव काम केले. शेतकर्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांचा सन्मानही केला. शेती व शेतकर्यांच्या जीवनात ठिबक सिंचनामुळे परिवर्तनाची नांदी ठरली असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
अशोक जैन
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.
लेखक जैन इरिगेशन येथे मिडीया विभागात कार्यरत आहेत. (लेखक-किशोर कुलकर्णी, 9422776759)