गडावर उठलेल्या किलकारी ऐकताच बाजी-फुलाजी ताडकन् उठले. क्षणभर त्यांनी आवाजाचा अंदाज घेतला. बाजी-फुलाजींनी अंगरखे चढवले. दुशेले आवळले. तलवार दुशेल्यात खोवली. बाजींनी हातात पट्टा चढवला. फुलाजींनी ढाल-तलवार हातात घेतली आणि दोघे वीर धावत घराबाहेर आले.
गडाचं रूप पाहून बाजींचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सारा किल्ला प्रकाशमान झाला होता. ठिकठिकाणी हातघाईच्या लढाया चालू होत्या. तलवारींचा खणखणाट आणि किंकाळ्या यांत ‘हर हर महादेव’चा आवाज उठत होता. त्या गोंधळात भर, म्हणूनच की काय, गंजीखान्यालगतच्या घरट्यांनी पेट घेतला होता. कापरासारखी घरं जळत होती. भेदरलेली बायका-मुलं आक्रोश करीत वाट फुटेल तिकडं धावत होती. गडाच्या उतरणीवर असलेलं प्रवेशद्वार सताड उघडलं होतं. गडावर एकच कल्होळ माजला होता.
खुद्द कृष्णाजी बांदल धावत वाड्याबाहेर आले. त्यांनीही पट्टा चढवला होता. बाजी-फुलाजींना पाहताच ते ओरडले,
‘तुम्ही दक्षिणेच्या तटाकडं बघा. आम्ही दरवाज्याशी जातो.’
किल्ल्याच्या दोन्ही बाजूंनी शिवाजी राजांचे मावळे गडात येत होते. शत्रू किती आहे, याचा अंदाज बादलांना येत नव्हता. अचानक झालेल्या हल्ल्यानं बांदल विस्कळीत झाले होते. बघता-बघता चौक्या गारद होत होत्या.
बाजी-फुलाजी दक्षिणेच्या तटाकडं धावत सुटले. संतापानं उग्र बनलेले कृष्णाजी बांदल दरवाज्याकडं जात असता आबाजी विश्वनाथनं त्यांना हेरलं. पट्टा चढवून त्यानं बादलांना गाठलं.
‘कोण तू!’ कृष्णाजी उद्गारले, ‘तू शिवाजीचा हेर, की हेजीब?’
‘दोन्ही!’ आबाजी हसून म्हणाला, ‘राजे, मैदानात उतरा.’
‘त्याचसाठी आलोय्. जय जगदंब!’
‘जय भवानी!’ म्हणत आबाजी पुढं सरसावला आणि दोघे एकमेकांवर प्राणपणानं तुटून पडले.
नागिणीच्या जिभा लवलवाव्यात, तशी पट्ट्यांची पाती दिसत होती. कृष्णाजी बांदल हा वयोवृद्ध वीर, तर आबाजी विश्वनाथ तरणाबांड. सळसळत्या रक्ताचा तरुण. कृष्णाजी बांदलांचे वार चुकवून मोहरा करणं सोपं नव्हतं. अनेक वेळा आबाजीला माघार घ्यावी लागत होती. त्यामुळं त्याचा त्वेष आणखीन वाढत होता. दोघांनाही जखमा होत होत्या; पण त्याचं भान कुणालाही नव्हतं. आबाजी ज्या संधीची वाट पाहत होता, ती संधी आबाजीला नकळत आली. कृष्णाजींचा पट्ट्याचा वार चुकवताच पट्टा खाली झुकला आणि त्याच वेळी आबाजीचा पट्टा कृष्णाजींच्या मानेवर उतरला. कृष्णाजी क्षणात ढासळले. धनी पडलेला पाहताच बांदलांचं बळ सरलं. पडलेल्या कृष्णाजींकडं पाहून आबाजी वळणार, तोच मेघांच्या गडगडाटाप्रमाणे आवाज आला,
‘जातोस कुठं? अजून मी इकडं उभा आहे!’
आबाजी गरकन् वळला.
समोर कर्दनकाळाप्रमाणे बाजी उभे होते. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात पट्टा होता. डोईचं पागोटं केव्हाच सरलं होतं. तांडवाचं तेज त्यांच्या मुखावर प्रगटलं होतं. धिप्पाड देहाचे बाजी आपल्या आरक्त नजरेनं आबाजीकडं पाहत होते.
क्षणात आबाजीनं ते आव्हान स्वीकारलं. पट्ट्याचा पवित्रा घेतला. आणि त्याच वेळी मागून कणखर आज्ञा झाली,
‘आबाजी, माग हो!’
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )