झाडीच्या रोखानं टापांचा आवाज येत होता आणि सायंकाळच्या सूर्य-किरणांत राजांचं अश्वपथक नजरेत आलं. राजांच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यामागं राजांचं अश्वपथक दौडत होतं. मागं धुळीचा लोट उधळत होता.
अश्वपथक वाड्याच्या दरवाज्याशी येताच यशवंत धावला. त्यानं राजांच्या घोड्याची ओठाळी पकडली.
राजे स्मितवदनानं पायउतार झाले. राजांचं लक्ष ओठाळी धरलेल्या यशवंताकडं गेलं होतं. बाजी-फुलाजी राजांच्या सामोरे गेले.
त्यांच्या मुजऱ्याचा स्वीकार करीत असता राजांचं लक्ष यशवंतवर खिळलं आहे, हे बाजी, फुलाजींच्या ध्यानी आलं.
‘राजे! आपण आलात. आम्ही धन्य झालो.’
‘आम्ही वचन देतो, ते पाळतो.’ राजे यशवंतकडं बोट दाखवत विचारते झाले, ‘हा कोण?’
‘हा यशवंत जगदाळे! भोरच्या गुणाजी जगदाळेंचा मुलगा.’
‘चागला दिसतो.’
‘राजे! आपण अचूक पारख केलीत. तो उत्तम धारकरी आहे. पट्टा, तलवार, फरीगदगा यांत तो निष्णात आहे.’
‘वाटलंच! तुम्ही कौतुक केलंत, त्यातच सर्व आलं.’ राजांनी निर्वाळा दिला.
राजे वाड्याच्या प्रवेशद्वाराशी आले. राजांच्यावरून भाताचे मुटके ओवाळून टाकण्यात आले. पायांवर पाणी घालण्यात आलं. सोनाबाई, गौतमाबाईंनी तीन सुवासिनींसह राजांना ओवाळलं. कुंकुमतिलक लावलेले राजे वाड्यात आले.
राजे फुलाजींना म्हणाले.
‘ह्या औपचारिकपणाची काही गरज नव्हती.’
‘राजे! हा औपचारिकपणा नव्हे! जेव्हा आपला वीर घरी येतो, तेव्हा त्याचं असंच स्वागत केलं जातं.’
राजे वाड्यात येताना वाडा निरखीत होते. चौकात उभे असताना पागेतलं एक घोडं खिंकाळलं. शिवाजी राजांची पावलं नकळत पागेकडं वळली. पागेतली ती उमदी जनावरं पाहून राजांच्या मुखावर समाधान प्रगटलं. ते बाजींना म्हणाले,
‘आम्ही जेव्हा आमच्या पिताजींना भेटायला बेंगरूळला गेलो होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला एक संस्कृत श्लोक सांगितला होता.’
‘कोणता?’ फुलाजींनी विचारलं.
‘त्यांनी सांगितलं….
यस्याश्वा तस्य राज्यं, यस्याश्वा तस्य मेदिनी|
यस्याश्वा तस्य सौख्यं, यस्याश्वा तस्य साम्राज्यम्|
__ज्याच्या पदरी घोडा, त्याचं राज्य, त्याचं ऐश्वर्य, त्याचं सुख, त्याचं साम्राज्य!’
‘खरं आहे!’ बाजी म्हणाले.
‘त्याचमुळं आमचा एक कायदा आहे. आमच्या राज्यात ना कुणाच्या मालकीचा घोडा, ना कुणाचा वाडा. ती मालमत राज्याची. बाजी, हे परवडेल तुम्हांला?’
‘राजे! जिथं इमान टाकलं, तिथं घरादाराची मोजदाद कशाला?’
बाजी-फुलाजींसह बोलत राजे सदरेच्या पायऱ्यांजवळ आले. त्यांनी पायांतले चढाव काढले. सेवकांनी घंगाळातलं पाणी राजांच्या पायांवर घातलं.
राजे सदरेवर आले. सदरेच्या उजव्या बाजूला खास बैठक घातली होती. डाव्या सदरेवर बाजींची विश्वासू माणसं उभी होती. राजांचं लक्ष तात्याबा म्हसकरकडं गेलं. राजे सरळ त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना वाकून नमस्कार केला. त्या कृतीनं सारी सदर आश्चर्यचकित झाली.
राजे बोलत होते,
‘तात्याबा, बरे आहात ना?’
तात्याबा म्हणाले,
‘जी महाराज!’
न राहवून बाजींनी विचारलं,
‘राजे, आपण यांना ओळखता?’
राजे हसले,
‘बाजी! यांना आम्ही ओळखणार नाही, तर कोण ओळखणार!’
‘म्हणजे?’ फुलाजी म्हणाले.
‘जेव्हा आमचे पिताजी निजामशाहीत होते, तेव्हा त्यांच्या संगती आपले पिताजी आणि तात्याबा होते. बाजी खरं सांगायचं झालं, तर तात्याबा तुमचे नाहीत. आमचे आहेत.’
बाजींच्या डोक्यात प्रकाश पडत होता. तात्याबाचं वारंवार सदरेवर असणं, संगती रोहिडा गडावर येणं, गडाच्या शिबंदीची चौकशी करणं….
बाजी उद्गारले,
‘म्हणजे तात्याबा….’
‘खरं आहे.’ राजे सांगत होते, ‘तात्याबा आमचे हेर म्हटलंत, तरी आता काही बिघडणार नाही. बाजी, अशी लहान-थोर माणसं पाठीशी राहिली, तर देवांचं राज्य उभं करणं का कठीण!’
‘तात्याबा, चांगलाच चकवा दिला.’ फुलाजी म्हणाले.
‘तस न्हाई, धनी!’ तात्याबा म्हणाले, ‘पहिलं इमान राजाचं; दुसरं तुमचं! आता सगळी एकच झालासा, म्हणून कुठं म्हाताऱ्याला तोफंच्या तोंडी देऊ नकासा, म्हंजे मिळवली!’
तात्याबाच्या बोलण्यानं सारे मोकळेपणानं हसले.
राजे बैठकीवर विराजमान झाले. राजांच्या आज्ञेनं बाजी, फुलाजी राजांच्या शेजारी बसले.
राजे सांगत होते,
‘बाजी, फुलाजी, आमचा बारा मावळ आता कबज्यात आला, असं म्हणायला हरकत नाही. तुमचे बांदल देशमुख काय म्हणतात?’
‘आमचे नव्हे आपले!’ फुलाजी म्हणाले, ‘आपल्या दर्शनासाठी ते येणार आहेत.’
‘बाजी! रोहिड्याची तटबंदी भक्कम करून घ्या. ज्या वाटेनं आबाजी शिड्या लावून चढले, ती तटाची बाजू तोडून घ्या.’ राजांनी सांगितलं.
‘राजे! मी अनेक वेळा राजांना….’ बाजी चाचरले, ‘धन्यांना सांगितलं होत, पण त्यांनी ते मनावर घेतलं नाही.’
‘आमची वेळ चांगली, नाही तर रोहिडा घेणं येवढं सोपं नव्हतं. बाजी, तो दक्षिणेचा तट मजबूत करुन घ्या. पर्जन्यकाळी तटास झाड-झुडूप वाढतं. ते वरचेवर कापून काढा. तटाचं व तटाखालील गवत जाळून गड नेहमी नहाणावा लागतो, हे विसरू नका. बाजी, आम्ही इकडं येताना जासलोड गडावर गेलो होतो. गडाची जागा मोक्याची असूनही… तो आज ओस पडला आहे. त्याची उभारणी करायला हवी. तो किल्ला डागडुजी करून परत वसवायला हवा. किल्ला मजबूत करून मगच तुम्ही किल्ल्याखाली उतरणं. ही आमची पहिली कामगिरी आम्ही तुम्हांला देत आहोत. येथून आम्ही राजगडावर जाताच गडाच्या खर्चाची तरतूद करू.’
‘जशी आज्ञा!’ बाजी म्हणाले.
‘बाजी, आता आमच्यावर कोण, केव्हा चालून येईल, याचा भरवसा नाही. बारा मावळांतले बारा किल्ले मातब्बर बनवायला हवेत. शेवट आम्हांला राखणार, ते गड, किल्ले आणि दाट रानानं भरलेला आमचा मुलूख. तीच आमची ताकद!’
राजांना भेटायला बांदल देशमुख आले. राजांनी त्यांचा शेला-पागोटं देऊन सन्मान केला.
दुसरे दिवशी सकाळी राजे राजगडाकडं जायला निघाले. राजांना निरोप द्यायला बाजींची मुलं, फुलाजी, तात्याबा म्हसकर हजर होते. तात्याबाकडं पाहत बाजी म्हणाले,
‘राजे, एक विनंती आहे.’
‘बोला, बाजी!’
‘या तात्याबाला संगती घेऊन चला. आता आम्हांला याची भीती वाटते.’
सारे मोकळेपणानं हसले.
राजे बाजींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले,
‘बाजी, आता नुसता तात्याबाच नाही. न्यायचं झालं, तर तुम्हां दोघांनाही घेऊन जावं लागेल. येतो आम्ही…’
त्याच वेळी यशवंत जगदाळे पुढं झाला. त्यानं राजांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. राजांनी साऱ्यांचा निरोप घेतला आणि कोवळ्या किरणांत राजे राजगडाकडं दौड करू लागले.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )