जेवढ्या क्षेत्रात लोक घर बांधतात तेवढ्यात कुटुंब सांभाळण्याची किमया अनोर्याच्या ज्ञानेश्वर पाटील यांनी करून दाखविली आहे. अर्थात त्यामागे आहे त्यांची आणि कुटुंबाची मेहनत.
दहा-पंधरा एकर जमीन असूनही नापिकी आणि त्यातून उभ्या राहिलेल्या कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या असंख्य शेतकर्यांची उदाहरणे समोर असताना पाच एकरात कोण सुखाने जगू शकतो? हा प्रश्न पडतोच. त्याचे उत्तर शोधायला मात्र जळगाव जिल्हयातील धरणगाव तालुक्यात जावे लागेल. या तालुक्यात अनोरे हे दीड दोन हजार लोकवस्तीचे गाव. बहुदा सगळे शेतकरी आणि शेतमजूर मेहनती लोकांचे गाव म्हणून तालुक्यात प्रसिद्ध त्याला कारण आहे. अळूची शेती अळूचे उत्पादन आणि विक्रीच्या बळावर समाधानी जीवन जगणार्या या गावातील ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील यांची ही कथा.
अळूच्या लागवडीने दिली साथ
आई-वडील, दोन भाऊ बहिणी असा परिवार ज्ञानेश्वर पाटील बी. कॉम. शिकले पण नोकरीचा विचारही न करता घराच्या शेतात राबू लागले. आपल्या 3 एकर शेतीत आई वडलांसोबत दोन्ही भाऊ काम करायचे. घरचे काम आटोपले की नंतर दुसर्या शेतकर्यांकडे मजुरी करायचे. कापूस, ज्वारी हीच पिके घेण्याची परंपरा त्याच्याही कुटुंबात चालत आलेली. पण थोड्याशा क्षेत्रात अळू लागवड आणि विक्री करून शेती फायद्याची करणारे अनेक मित्र ज्ञानेश्वर पाटील पाहत होते. आपणही अळूची पाने विकायचा धंदा करावा असे ठरवून त्यात त्यांनी उडी घेतली. यात पैसा आहे हे लक्षात आल्यानंतर स्वतः च्या शेतात अळूची लागवड करायला सुरुवात केली. यात चागला जम बसला आणि 3 एकराची शेती 6 एकराची झाली. अळू, पुदीना आणि गवती चहा
ज्ञानेश्वर पाटील 5 गुठे क्षेत्राची विभागणी 3 गुठयात अळू, 1 गुठा पुदीना आणि 1 गुठा गवती चहा अशी करतात. जून ते सप्टेंबर हा या पिकासाठी तेजीचा हंगाम असतो. तसेच सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात गवती चहाचा भरपूर मागणी असते तर उन्हाळ्यात पुदिन्याचा खूप मागणी असते.
स्वतः च करतात विक्री
दररोज सुमारे 500 ते 700 अळू पाने, 50 पुदीना जुड्या व गवती चहा मोटार सायकलीवर लादून ते जळगाव गाठतात. तेथे बळीराम पेठेत एक जागा ठरलेली आहे. सकाळी 6 ते 9 वाजे दरम्यान ते किरकोळ विक्री करून घरी परत येतात यातून महिन्याला खर्च वजा जाता 12 हजार रुपये कमाई करतात.
लागवड पद्धत
पावसाळ्याच्या प्रारंभी गादी वाफ्यावर अळू लागवड करावी लागते. लागवडीनंतर 40 दिवसातच पाने तोडणीस तयार होतात जून ते डिसेंबर हा मुख्य हंगाम असतो. या काळात 20 तोडण्या होतात. हिवाळ्यात प्लॉट बसतो. उन्हाळ्यात कंद जगविण्यावर भर दिला जातो. पुढच्या हंगामाच्या लागवडीसाठी नवीन क्षेत्र निवडावे लागते.
रोगविरहित पारंपरिक पीक
फारच अल्प प्रमाणात पिकाच्या गरजेनुसार स्फुरद पोटेंश व नत्र खत दयावे लागते, एकूण नैसर्गिक वातावरणावर या पिकाचे पोषण होत असल्याने खत औषधावर अत्यल्प खर्च होतो. गवती चहा आणि पुदीना लागवड अळू कंदा सारखीच गादी वाफ्यावर केली जाते व या पीकांवर रोगराई नसते. या कमी क्षेत्रावर व कमी उत्पादन खर्चाच्या पिकाच्या लागवडीमुळे व मेहनतीच्या बळावर पाटील यानी प्रगती साधली आहे.
पात्रासाठी प्रसिद्ध
अनोरे येथील अळूची पाने
जळगाव ते सुरत रेल्वे मार्गावर प्रसिद्ध आहेत. या मार्गावरील प्रत्येक स्थानावरील कॅन्टीन वर अळूच्या पानांपासून पात्रा
(खादय पदार्थ) तयार करून विकला जातो. त्यासाठी लागणारी अळूची पाने
अनोरे येथीलच असतात असे ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.
अळू लागवडीमुळे आमच्या कुटुंबाचे दिवस पालटले
आधी आम्हाला दररोज दुसर्याच्या शेतात मजुरी ने कामाला जावे लागे. मजुरी तर थांबलीच शिवाय नवीन 3 एकर शेत आम्ही विकत घेऊ शकलो 3 गुंठे अळू व एकेक गुंठे गवती चहा पुदिनाने आमचे जीवनच बदलून टाकले आहे. कमी क्षेत्र यासाठी गुुंतत असल्याने थोड्याशा पाण्यात पीक घेता येते. पत्नी आणि मुलाचे मला कामात भरपूर सहकार्य मिळते. पहाटे कष्ट आणि किरकोळ विक्री करण्याची ज्यांची तयारी असेल त्या शेतकर्यांनी हे पीक घ्यावे. नक्कीच फायद्याचे आहे.
– ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील, मु.पो. अनोरे, ता. धरणगाव, जि. जळगाव. मो. 9923687351