सव्वा दोन एकरांत जवळपास 10 लाख रुपयाचे उत्पन्न
ठिबक सिंचनचा ऊसासाठी वापर करताना ऊसाच्या दोन ओळीत कलिंगड व हिरवी मिरची लागवड करून तिहेरी पिकातून सव्वा दोन एकरांत जवळपास 10 लाख रुपयाचे उत्पन्न घेण्याची किमया नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अमोल सीताराम मोरे या तरुणाने करून दाखवली.
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वांबोरी गावात अमोल सीताराम मोरे यांचे एकत्र कुटुंब आहे. वडील सीताराम मोरे हे पोस्टमन आहेत. त्यांना एकुण 12 एकर जमीन आहे. त्यापैकी फक्त 5 एकर जमीन सुपीक आहे. उर्वरित माळरानची हलकी जमीन. त्यांना दोन मुले मोठा मुलगा संगणक अभियंता म्हणून अमेरिकेत नोकरी करतो. धाकटा मुलगा अमोल 12 वी शिकत असतांना वडिलांची बदली झाली. त्यामुळे शेतीची संपुर्ण जबाबदारी अमोलवर पडली. शेतीमध्ये पारंपरिक पिके घेतली जातात. त्यामध्ये मूग, तूर, गहु, ज्वारी, हरभरा व नगदी उत्पन्न म्हणून ऊस पिक घेतले जात असे. अमोलनेही त्यात खंड पडू दिला नाही. उसाचे उत्पादन एकरी सरासरी 50 ते 55 टन येत होते. मोठा भाऊ होता तोपर्यंत शेती कामाचा ताण कमी होता. पण तो परदेशात गेला आणी अमोल वर कामाचा ताण वाढला.
सेंद्रिय व रासायनिक शेतीची सांगड, पाण्यामुळे उस हे शास्वत पिक
गावाजवळ उजनी धरणाचे बॅक वॉटर आहे, तेथून 8 हजार फुट जलवहिनी टाकुन पाणी आणले. शेतात दोन विंधन विहिरी 200 व 250 फुट घेतलेल्या आहेत. त्यामुळे शाश्वत पिक म्हणजे ऊस. जवळच दोन साखर कारखाने. मा. अजितदादा पवार यांचा अंबालिंका शुगर, व दुसरा दौंड शुगर. त्यामुळे 5 एकर मध्ये 5 ते 6 लाख रुपयाचे हमखास उत्पन्न असे. पण अमोलला अजुन उत्पन्न हवे होते. त्यातही रासायनिक खते वापरावर होणारा भरमसाठ खर्च कमी करायचा होता. त्यातच त्यांना सुभाष पाळेकर यांचे झीरो बजेट शेती वरील व्याख्यान एकावयास मिळाले. त्यातुन एक वर्ष तशी शेती केली. (2017/18) पण उत्पन्न कमी झाले. त्यामुळे सेंद्रिय व रासायनिक अशी योग्य सांगड घालुन शेती केली. उसात 8 फूट अंतरावर जोड ओळीत ऊस आहे. त्यामुळे मधल्या मोकळ्या जमिनीवर कलिंगड व मिरची लागवड करण्याचा निर्णय झाला. खरीप चांगले आले. नोव्हेंबर मधे ऊस ही कारखान्याने नेला होता.
पाण्यासाठी शेततळे व ठिबक सिंचनाचा वापर
शेतात 3 गीर, 3 जर्सी व 2 खिल्लार जातीच्या गाई आहेत. मात्र बैल जोडी नाही. शेती यंत्राने केली जाते. बोअरवेलचे पाणी तपासले ते क्षारयुक्त आहे, त्याचा परिणाम पिकावर तर होत होताच, पण जमीन ही क्षारयुक्त झाली, त्यामुळे उत्पादनात घट येऊ लागली. म्हणुन 35×35 मीटर शेत तलाव तयार करून त्यात नदीमधुन आणलेली जलवाहिनी जोडली. पाणीसाठा करून ठेवला. त्यांचा वापर त्यांनी पिकाला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केला त्यामुळे शेतात तण नियंत्रणात राहिले आणि पिकांना संतुलित पाणी दिले गेल्याने वाढही चांगली झाली.
अंतरपिक लागवड
डिसेंबर मध्ये उसाच्या मधली सरी नांगरणी करून घेऊन रोटाव्हेटरने जमीन तयार केली. सरी काढण्यापूर्वी 5 ट्रॉली शेणखत, 30 गोणी कोंबडी खत, 10 गोणी लिंबोली पेंड. डी ए पी 2 गोणी, पोटॅश 1 गोणी, बेनसल्फ 50 किलो व येरामील 50 किलो जमिनीत मिसळले. त्यानंतर साडेचार फुट रुंद व दिड फूट उंचीचे बेड तयार केले. त्यावर 16 एम. एम. चे ठिबक दोन बाजुने टाकून घेतल्या. त्यावर 50 मायक्रोनचे मल्चिंग कापड टाकून दोन्ही बाजूने सव्वा फुटावर होल पाडले. कलिंगडचे तयार रोप दौंड तालुक्यातील नर्सरी मधुन एका नामांकित कंपनीचे मॅक्स जातीचे 3 रुपये प्रति नग प्रमाणे 9000 रोपे आणली. तर हिरवी मिरचीचे अजून एका स्थानिक कंपनीचे 2000 रोप 1.30 प्रति नग प्रमाणे आणले. रोपे लागवडी पूर्वी ड्रीपने पाणी सोडून सायंकाळी बेड ओले करून घेतले. दि. 3 जाने. 2020 रोजी 8300 रोपांची लागवड केली. त्यात झालेली तुट भरून काढण्यासाठी उर्वरित रोपांपैकी 300 रोपे लागली. त्यानंतर दि. 11 जाने. रोजी दुसर्या बाजूस मिरचीचे रोप लागवड केली. त्याचीही तुट भरून काढली.
खते व औषधांचे नियोजन
येथून पुढे सुरू झाले खते व औषधांचे नियोजन. कारण 65 दिवसात कलिंगड विक्रीसाठी तयार होणार होते. तर मिरची दिड महिन्यात विक्रीला येणार होती. त्यात प्रत्येक आठवड्यात वातावरणात बदल होत होते. बर अमोल यांची उसात एका वेळे इतर दोन पिके घेण्याची ही पाहिलीच वेळ होती. पण त्यांनी वेगवेगळे कृषी अधिकारी व उत्पादक शेतकरी यांचे मार्गदर्शन घेऊन खते व औषध यांचे वेळा पत्रक तयार केले होते. रोपे लागवडीनंतर प्रत्येक दोन दिवसाने बाविस्टीन + ह्युॅमीक अॅसिड चे ड्रीन्चींग केले. संपुर्ण शेतात निळे, पिवळे सापळे लावले. मिर्ची लागवडी पूर्वी बायो 303 ची प्रति लिटर पाण्यात 1 मी. लि. प्रमाणे फवारणी केली. त्यातच इतर औषध मिसळले. दि. 10 जाने. ला पुन्हा एक्टरा 150 व ह्युॅमीक चे ड्रीन्चींग केले. 18 जाने. रोजी स्थानिक बाजारातील किटक नाशक फवारणी केली. तत्पूर्वी 13 रोजी बुरशी नाशक व कीटकनाशक फवारणी केली होती. याशिवाय प्रत्येक 3 दिवसाला ठिबक मधुन जिवामृत देणे 40 दिवसा पर्यंत सुरू ठेवले होते. हे जिवामृत शेतातच तयार केले होते.
त्या शिवाय त्याच्या दोन फवारणी ही केल्या होत्या. यासह वसंत दादा शुगर ने तयार केलेले बुरशी नाशक च्या 4 दिवसाच्या अंतराने 12 फवारणी केल्या. के. व्ही. के. बारामती येथून आणलेले के एस बी. 200 लिटर पाण्यात टाकुन त्यात 4 किलो गुळ व 10 किलो सरकी पेंड मिसळून प्रत्येक 4 दिवसाने 15 ते 20 मिनिटे ठिबक मधून 4 वेळेस सोडले. व नंतर 5 मिनिटे पाणी सोडले. ठिबक संचांमुळे खते आणि पाणी यांचे योग्य संतुलन साधने शक्य झाले असे ते म्हणतात.
कोरोना विषाणू आणि बाजारभाव
पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशी नाशक व ट्रायकोडर्माची फवारणी दोन वेळा केली. वातावरणातील बदलामुळे गोगलगाईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेंड गोळी टाकली. याशिवाय प्रकाश सापळे, गंध सापळे लावल्यामुळे पांढरी माशी नियंत्रनात राहिली. कलिंगड चा प्लॉट 65 दिवसात तोडणीस आला. 4 ते 6 किलोचे फळ तयार झाले. पण कोरोना विषाणूमुळे भाव तर पडलेच, पण व्यापारी खरेदी करीना झाले. शेवटी दि. 15 मार्च रोजी 6 रुपये प्रती किलो प्रमाणे खरेदीदार भेटला. 17 तारखेला हा माल गुजरातला विक्रीसाठी गेला. एकुण वजन 45 टन भरले. याच कालावधीत मिरची तोडीस आली होती. पहिला तोडा 500 किलो तर दुसरी तोड 800 किलो निघाली. प्रति किलो 30 रुपये दराने मिरची विकली जात आहे.
या तीन महिन्याच्या काळात ऊस पिकाला कोणतीही खत दिले नाही. किंवा वेगळे पाणी दिले नाही. तरीही वाढ खुप जोमाने झाली. शेवटी ऊसाची छाटनी करावी लागली. आता त्याला 10 ते 12 फुटवे आहेत. त्यामुळे सव्वा दोन एकर मध्ये ऊस 130 ते 140 टन होईल असा अंदाज आहे. उसाचा पहिला खोडवा होता. तिन्ही पिकांना मिळून 15 मार्च पर्यंत दिड लाख रुपये खर्च आला आहे. मिर्ची व ऊस यावर अजुन 20 ते 30 हजार रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. तरिही एकुण खर्च पावणेदोन लाख रुपये होईल असा अंदाज आहे.
उत्पन्न
एकूण उत्पन्न किती यावर अमोल मोरे हसुन म्हणाले तुम्हीच ठरवा. कारण बाजारात सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही मला मिर्चीचे दोन तोडीत 35 हजार रु. मिळाले तर कलिंगडाच्या विक्रीतून पावणे तीन लाख रुपये मिळाले आहेत. ऊस पिकातून किमान 2500 रुपये भाव धरला तरी साडेतीन लाख होतात. मिर्ची जुनअखेर पर्यंत विक्री होणार आहे. म्हणजे सर्व मिळुन 10 लाख रुपये उत्पन्न मिळणारच असा विश्वास त्यांना वाटतो. शेतीच्या कामात त्यांना वडील सीताराम मोरे याचे मार्गदर्शन मिळाले. तर आई सौ. अहिल्याबाई व पत्नी सौ. सारिका यांची शेती कामात प्रत्यक्ष साथ मिळाली, त्यामुळे तालुका स्तरावर महिला दिनी सौ. सारिका यांचा सौ. सुनंदा ताई रोहित पवार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
शेतकर्यांना मार्गदर्शन करताना अमोल मोरे. म्हणतात,. शेतकर्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याचा सेंद्रिय खता बरोबर समतोल राखला पाहिजे. जमिनीतील जिवाणू वाढले पाहिजेत. त्याचबरोबर कोणत्याही हंगामात पाण्याचा कमी वापर करीत मिश्र पिक घेतली तर कधीच नुकसान होत नाही.
अमोल मोरे,
वांबोरी ता. कर्जत जि. नगर
मोबा.नं. 09890763455