आनन शिंपी, चाळीसगाव
शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्पादन घेणार्या चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील किटकशास्त्रात एम. एस्सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या मंगेश महाले या तरुण शेतकर्याने खानदेशात पहिल्यांदाच जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची लागवड केली. या नावीण्यपूर्ण प्रयोगातून एकाच वर्षांत चांगले उत्पादन घेणार्या मंगेश महाले यांची जिरेनियमची शेती शेतकर्यांसाठी आदर्शवत ठरली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे गाव तसे शेतीच्या बाबतीत बागायतीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गावातून वाहणारी गिरणा नदी आणि गावापासून साधारणतः पाच किलोमीटरील नांद्रा गावाजवळच असलेल्या मन्याड धरणामुळे हा संपूर्ण परिसर सुपीक आहे. सायगाव येथील मंगेश महाले या ध्येयवेड्या तरुणाने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता, घरच्या अवघ्या चार एकर शेतात काही तरी वेगळे करण्याचा ध्यास घेतला. त्यामुळे शेतीच्या संदर्भातील विविध पुस्तके वाचण्यास त्यांनी सुरवात केली. शेतीला जोड व्यवसाय म्हणून केल्या जाणार्या कुक्कुटपालनाच्या विषयावर पक्षी अनुसंधान संस्थानतर्फे उत्तर प्रदेशातील बरेली येथे त्यांना प्रशिक्षणाला जाण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी त्यांना जिरेनियमची शेती पाहण्याचा योग आला. आपणही आपल्या भागात अशी शेती करावी या ध्येयाने मंगेश महाले यांनी जिरेनियम पिकाचा सखोल अभ्यास करण्यास सुरवात केली. या संदर्भात मिळणार्या वेगवेगळ्या माहितीनुसार, त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासह पुणे, नाशिक, अहमदनगर, संगमनेर, अकोले, सांगली, सातारा, कोल्हापूर, गडहिंगलज तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन सखोल अभ्यास केला. एका एकरात साधारणपणे साडेतीन ते सव्वा चार लाखांचे उत्पन्न एकाच वर्षात घेता येत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर जिरेनियम लागवडीचा त्यांनी पक्का निश्चय केला व गावी परतल्यानंतर त्या दृष्टीने तयारी सुुरु केली.
अशी केली लागवड
आपल्या शेतात जिरेनियमची लागवड करण्याचा विचार मंगेश महाले यांनी घरी सांगितल्यानंतर घरच्यांना हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याबाबत शंका होती. मात्र, मंगेश महाले यांचा आत्मविश्वास प्रबळ असल्याने त्यासाठी त्यांना बांधकाम अभियंता असलेल्या त्यांच्या मोठ्या भावासह आई- वडिलांनी मोलाची साथ दिली. नगर जिल्ह्यातून त्यांनी रोपे विकत आणली. जिरेनियमच्या लागवडीसंदर्भात जाणून घेतलेल्या माहितीनुसार त्यांनी पारंपरिक पद्धतीने सरळ पेरणी न करता, शेतात मातीचे बेड तयार करुन माथ्यावर जिरेनियमची रोपे लावली. जेणेकरुन या भागात पाऊस जास्त झाला तरी पाणी त्याच्या गुणधर्मानुसार या बेडवरुन निथरले जाईल. लागवडीनंतर त्यांनी या रोपांसाठी कुठल्याही रासायनिक खतांचा वापर केला नाही. तर राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलेली जिवाणू (जैविक) खते त्यांनी वापरली. शेताच्या मातीत असलेले अन्नद्रव्य झाडांना देण्याचे काम ही खते करीत असल्याने त्यांनी आर्थिकदृष्ट्या देखील परवडणार्या या खतांच्या वापरावरच सुरवातीपासून भर दिला. एका एकरात साधारणतः आठ ते दहा हजार रोपांची त्यांनी लागवड केली. ही रोपे चार चार फुटाच्या अंतरावर सरी पाडून केली. दोन रोपांमधील अंतर हे दीड फूट ठेवले. या रोपांना प्रमाणात पाणी देता यावे, यासाठी त्यांनी ठिबकची व्यवस्था केली. रोपांची लागवड केल्यापासून ते त्यांच्या काढणीपर्यंत दररोज मंगेश महाले यांनी या पिकांची जातीने काळजी घेतली. जिरेनियमवर केवळ मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ती होऊ नये यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. चार महिन्यानंतर जिरेनियमची शेती बहरली.
तेलाचे उत्पादन
जिरेनियमच्या तेलाला जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. कृषी विभागाच्या एका अहवालानुसार, या वनस्पतीची भारतात दर वर्षाला 200 ते 300 टनाची मागणी आहे. मात्र, सद्यःस्थितीत आपल्याकडे वर्षाला केवळ दहा टनाच्या आतच तेलाची निर्मिती होते. ज्याच्या खरेदीसाठी अनेक कंपन्यांमधून मागणी असते. हे तेल 13 हजार 500 रुपये किलो दराने या कंपन्या विकत घेतात. जिरेनियमपासून तेल काढण्यासाठी मंगेश महाले यांच्याकडे साधने नसल्याने त्यांनी श्रीरामपूर येथे तेल काढले. यापुढे आपणच तेलाची देखील निर्मिता करायची या उद्देशाने त्यांनी तेल काढणीचे यंत्र शेतातच बसवले. दोन टाक्यांच्या या यंत्रात सुमारे साडेतीनशे लिटर पाणी उकळून त्याची वाफ जिरेनियमला दिली जाते. वाफेवर शिजणार्या जिरेनियमपासून पाणीमिश्रीत तेल मिळते, जे जिरेनियमच्या पानांमधील ग्रंथीत असते. पाणी व तेल वेगवेगळे करण्यासाठी मंगेश महाले यांनी ऑईल सेपरेटर देखील शास्त्रोक्त पद्धतीने तयार करुन घेतला आहे. तेल आणि पाणी वेगवेगळे झाल्यानंतर जिरेनियमच्या पाण्याला गुलाब पाण्यासारखा सुगंध असल्याने हे पाणी देखील सहज विकले जाते. एका एकरात साधारणतः दहा किलो तेल निघत असल्याचे मंगेश महाले यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.
शेतकर्यांना मार्गदर्शन
सुरवातीला मंगेश महाले यांना वेड्यात काढणारे इतर शेतकरी आज त्यांचे उत्पादन पाहून अचंबित होतात. शेती निसर्गावर अवलंबून असली तरी कष्ट करण्याची जिद्द ठेवली तर शेतीतून भरघोस उत्पन्न कसे घेता येते, हेच मंगेश महाले यांनी जिरेनियमच्या शेतीतून दाखवून दिले आहे. आज त्यांची शेती पाहण्यासाठी जवळपासचेच नव्हे तर महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे शेतकरी भेट देण्यासाठी येतात. या सर्वांना मंगेश महाले हे पोटतिडकीने माहिती देऊन शेतकर्यांनी जिरेनियमची शेती करावी असा आवर्जुन सल्लाही देतात.
असे आहे जिरेनियम
जिरेनियम ही एक सुगंधी वनस्पती असून तिच्या पाल्यापासून तेल निर्मिती होते. या पिकाला कुठलाही जंगली प्राणी खात नाही. शिवाय त्यावर कुठलाही रोग पडत नसल्याने रासायनिक औषधांची फवारणी करण्याची गरज नाही. जिरेनियमचे शास्त्रीय नाव पेलागोनियम ग्रेवियोलेंस, जिरेनियम, रोज जिरेनियम असे आहे. त्याच्या सुधारीत जातींमध्ये रोज जिरेनियम, सीम पवन, बोरबन, बायो जी- 171 यांचा समावेश होतो. यात जेरेनियाल 16 टक्के, सेट्रोनेलाल 38 टक्के, सेट्रोनेल फॉर्मेट 10.4 टक्के तर लीनालुल 6.5 टक्के या रासायनिक घटकांचा समावेश होतो. जिरेनियम ही झुडुपवर्गीय बहुवार्षिक वनस्पती असुन विविध हवामानात वाढणारी, पाण्याच्या ताण सहन करणारी वनस्पती आहे. त्यामुळे जिरेनियमला जास्त आर्द्रता, पाऊस व धुके मानवत नाही. हलक्या ते भारी जमिनीमध्ये तसेच काळ्या कसदार, पाण्याच्या उत्तम निचरा होणार्या जमिनीत त्याची वाढ चांगली होते. एका एकरामध्ये 10 हजार ते 11 हजार रोपांची लागवड करता येते. ही रोपे 3 किंवा 4 फुट दोन सरींमधील अंतर ठेवून तर 1 ते दीड फूट रोपांमधील अंतर ठेवून करता येते. पाणी प्रमाणात देता यावे, यासाठी ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य आहे. एकदा लागवड केल्यानंतर 3 ते 5 वर्षे पीक येत राहते. एका एकरामध्ये एका वर्षात साधारणतः 40 टन बायोमास उत्पादनातून 30 ते 40 किलो तेल मिळते. एका वर्षात 3 ते 4 वेळा कापणीच्या हिशेबाने एका एकरात साधारणतः साडेतीन ते सव्वा चार लाखांपर्यंतचे उत्पन्न घेता येते.
जिरेनियमच्या तेलाचे उपयोग
जिरेनियमच्या तेलाला भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रचंड मागणी आहे. सौंदर्य प्रसाधने तयार करणार्या कंपन्यांसह पानमसाला उद्योग, साबण, अत्तर, सुगंधी उद्योग, सुगंधित उपचार आणि औषधी निर्माण कंपन्यांकडून हे तेल खरेदी केले जाते.
रोपांची केली निर्मिती
मंगेश महाले यांनी जिरेनियमच्या तेलाच्या उत्पादनासह त्यांच्या प्रमाणे इतर शेतकर्यांनाही जिरेनियमचे उत्पादन घेता यावे, यासाठी स्वतः आधुनिक पद्धतीने रोपे तयार करुन ती विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. या रोपांची लागवड केल्यानंतर वर्षातून चार वेळा त्याचा पाला कापता येतो. एका कापणीत साधारणपणे 10 ते 15 टन पाला निघतो आणि एक टन पाल्यापासून 1 किलो सुगंधी तेल निघते. मंगेश महाले हे इतर शेतकर्यांनी उत्पादीत केलेला पाला 500 रुपये टन या दराने विकत घेतात. रोपांच्या लागवडीपासून ते तेलाच्या उत्पादनापर्यंत ते स्वतः मार्गदर्शन करतात.
प्रचंड पाऊस होऊनही नुकसान शून्य
मंगेश महाले यांची शेती ज्या नांद्रा शिवारात आहे, त्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे व जवळच असलेल्या मन्याड धरणातील पाण्यामुळे परिसरातील अनेक शेतकर्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. बर्याच जणांचे पीक वाहून गेले तर काहींच्या शेतांमधील माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांद्रा भागालाच बसला होता. अशा परिस्थितीत मंगेश महाले यांच्या शेतात मात्र कुठलेही नुकसान झाले नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांनी पीक लागवडीचे केलेले उत्कृष्ठ नियोजन. सर्वसाधारणपणे शेतकरी कुठल्याही पिकाची लागवड करताना ती पारंपरिक पद्धतीने करतात. जमिन नांगरुन झाल्यानंतर सरळ त्यावर पेरणी केली जाते. मंगेश महाले यांनी मात्र त्यांच्यासह त्यांच्याजवळच असलेल्या काकांच्या शेतात मातीचे बेड तयार करुन लागवड केली. उंच भागावरील माथ्यावर लागवड केल्यामुळे त्यांच्या शेतात पाणी येऊनही ते थांबू शकले नाही. कारण त्यांनी या बेडचे असे नियोजन केले, की ज्यामुळे पाणी शेतात न थांबता पूर्णतः वाहून गेले. परिणामी, पिके सुरक्षित राहिली. शेतकर्यांनी योग्य नियोजन करुन लागवडीची नाविण्यपूर्ण पद्धत स्विकारली तर शेती नुकसानाची ठरूच शकत नाही असे मंगेश महाले.
शेती हा करायची म्हणून करण्याचा विषय अजिबात नाही. तर त्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी असावी. सोबतच काळानुरुप शेतीमध्ये बदलत जाणारे नवनवीन तंत्रज्ञान देखील आत्मसात करण्याची इच्छाशक्ती असावी. शेतीमधून लोकांना जे पाहिजे आहे ते पिकवले पाहिजे. अन्नधान्य केवळ घरापुरते उत्पादीत करावे तर बाजारातील गरज लक्षात घेऊन विशेषतः तरुण शेतकर्यांनी नाविण्याची कास धरणे गरजेचे आहे.
– मंगेश महाले, सायगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव
संपर्क ः 9561545284