राळा
राळ्याच्या पिकाला 500 ते 750 मि.मी. पाऊस लागतो. ज्वारी व मक्यापेक्षा कमी पाऊस याला लागतो. पण पाऊस वेळेवर पडणे आवश्यक असते. हे पीक अवर्षणाचा प्रतिकार बर्यापैकी करते. हे लवकर पक्व होत असल्यामुळे अवर्षण टाळते. प्रती हेक्टरी 5 ते 7 कि.बी लागते. रोपे जोमाने वाढतात. 56 ते 62 दिवसांत फुले येतात. नाचणी व कापसाबरोबर राळ्याची लागवड करता येते. या पिकापासून 15-20 टन हिरवा चारा व 3 ते 5 टन वैरण प्रती हेक्टरी मिळते. फुले येण्याच्या सुारास गवत कापले असता चांगली वैरण व मुरघास करता येतो. गवत अतिशय चवदार असते, पण हे घोड्यांना खाण्यायोग्य नाही. राळा हे तृणधान्य अतिशय प्राचीन काळापासून लागवडीत आहे. भारतात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. युरोपमध्ये 85% धान्य म्हणून व 6% कोंबड्यांना खाण्यासाठी पीक लावले जाते. अमेरिकेत मु‘यत: वैरणीसाठी पीक घेतले जाते. गुजरातमध्ये राळ्याचे पीक चार्यासाठी लावले जाते. हे झपाट्याने वाढते आणि जनावरांना पचेल, आवडेल असा चारा यापासून मिळतो. या पिकाला हलकी, कोरडी जमीन चालते, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात राळा येतो.
वरी
फार प्राचीन काळपासून तृणधान्य म्हणून वरीची लागवड केली जाते. हे पीक 500 ते 750 मि.मी.पावसाच्या प्रदेशात लावले जाते. वाळूमिश्रित गाळावर पीक चांगले येते. पुष्कळ प्रकारच्या जमिनीवर वरी वाढू शकते पण भारी चिकण जमिनीवर वाढण्यास अडचण येते. हे पीक मातीत सोडियम कार्बोनेटचे क्षार काही प्रमाणात सहन करते. बी फोकून लावले तर चालते पण बहुधा नांगराने पेरणी करतात. हेक्टरी 10 ते 11 किलो बियाणे लागते. फुले 68 दिवसांत येतात व पीक 90 ते 100 दिवसांत पक्व होते. वरी बहुधा धान्यासाठी पेरली जाते. पण चार्यासाठी चवळीबरोबर लावता येईल. रशियामध्ये लसूणघास प्रस्थापित व्हावा म्हणून त्याच्यामधून वरी लावतात. कोणत्याही तृणधान्यापेक्षा वरीला कमी पाणी लागते. कोंबड्या व इतर पक्ष्यांसाठी हे धान्य म्हणून लावले जाते. गुजरातमध्ये गुरांना खाण्यासाठी वरी लावली जाते. उन्हाळ्यात विहिरीच्या किंवा पाटाच्या पाण्यावर पीक चांगले येते. यावेळी हिरव्या चार्याची चणचण भासते. त्यावेळी उत्कृष्ट चारा या पिकापासून मिळतो.
वाटी, बारती
हे वर्षायू गवत पावसाळ्यात लावून ऑगस्टमध्ये कापतात. याचा चारा दुभत्या जनावरांसाठी उत्तम असतो. याचा मुरघास करता येतो. गुजरातेत पंचमहाल, अहमदाबाद व धुळे जिल्ह्यांत हे तृणधान्य पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
सावा
या गवताची उंची 30 ते 90 सें.मी. असते. जमिनीतून याची पुष्कळ खोडे निघतात. पाने गुळगुळीत असतात. याची लागवड पावसाळ्यात हलक्या तांबड्या मातीत करतात. कोकणात डोंगरउतारावरील जमिनीवर आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत घाटावर हे तृणधान्य लावतात. गुजरातमध्ये चार्यासाठी उन्हाळ्यात लावतात. फार प्राचीन काळापासून हे तृणधान्य लागवडीत आहे. धान्य, ओली वैरण, मुरघास तिन्हीसाठी याचा उपयाग होतो.