पश्चिम महाराष्ट्रात पूर्वीच्या काळी खिलार वंश हा खूप प्रसिद्धीच्या शिखरावर होता. राजा – सर्जाची जोडी ही खिलार जोडी शिवाय कल्पनाच करवत नव्हती. बैल-गाडा शर्यंत म्हटली की खिलार जातीला काही पर्यायच नव्हता. राज्यातील देशी जनावरांमध्ये खिलार हा गोवंश सर्वात रुबाबदार व देखणा म्हणून ओळखला जातो. परंतु आता बैलगाडा शर्यत बंदी झाली आणि खिलार बैल पाळणे काही शेतकर्यांनी बंद केले. काही हौशी गोपालकांनी जास्तीच्या दुधासाठी खिलार जातीला पर्याय म्हणून गुजरातच्या गिर वंशाला पसंती दिली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हे वैभव नामशेष होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
पूर्वी ग्रामीण भागात गोठ्यात खिलार गाय असयचीच. ही गाय दूध कमी देत असली तरी, ती शरीरयष्टीने अतिशय चपळ आणि दिसायला सुंदर आहे. तसेच या गायीच्या बैलांनादेखील त्यांच्या काटक व चपळ गुणामुळे मोठी मागणी होती. राज्यात बैलगाडा शर्यत बंदी झाली आणि शेतकर्यांनी या जातीच्या बैलांकडे पाठ फिरवली की काय अशी स्थिति निर्माण झाली. त्याचप्रमाणे जास्त दूध निर्मितीसाठी या गोवंशावर काही संशोधन देखील झाले नाही. त्यामुळे शेजारील राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि दुधाच्या बाबतीत ब्राझील पर्यंत आपला नावलौकिक केलेल्या गिर जातीच्या गायींना आपल्या शेतकर्यांनी पसंती दिली. याचा परिणाम असा झाला गिर गो-वंशाची अतिरेक जाहिरात होऊन सर्वच शेतकरी हे जास्तीच्या दुधासाठी याच जातीचा वापर करू लागले. त्यामुळे आधीच अडगळीत पाडलेल्या खिलार गायीला गिर गायीमुळे अखेरची घरघर लागली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यांत्रिकीकरणामुळे बैलांचा कमी झालेला वापर, जास्त दूध देणार्या, देशी व परदेशी गो-वंशाची उपलब्धता आणि खिलार गो-वंशावर मोठ्या प्रमाणात न झालेले संशोधन यामुळे राज्याचे वैभव असणार्या खिलार गो-वंशाची दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा गो-वंश अशी स्थिती भविष्यात आली तर नवल नको. पश्चिम महाराष्ट्रातील काही खाजगी गोशाळा व गोपालक सोडले तर या वंशावर मोठ्या प्रमाणात दूध वाढीसाठी गिर प्रमाणे प्रयत्न झाले नाहीत. गिर गो-वंशाप्रमाणे जर राज्याची शान असलेल्या या जातीच्या संवर्धंनासाठी विशेष प्रयत्न केले तर नक्कीच सर्जा-राजाच्या जोडीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल यात शंका नाही.